विदेश दर्शन - १६२

८१ बाली (इंडोनेशिया)
२२ जुलै, १९७६

वर्षानुवर्षें ज्यासंबंधी वाचले - ऐकले ते बाली बेट आज पाहिले. दुपारी ११।(१-३०) जकर्ताहून निघालो. ३ वाजता पोहोचलो. दुपारचे जेवण विमानातच घेतले. विदेशमंत्रि डॉ. आदम मलिक आज त्यांचा वाढदिवस असतानाही या ट्रिपवर आमच्याबरोबर आलेले आहेत. मी बाली बेटावरील हिंदु-संस्कृति पहावी असा त्यांचा आग्रह गेल्या वर्षापासून होता.

विमानतळावर उतरताना आज अगदी बाली हिंदु-पध्दतीप्रमाणे स्वागत झाले.

दोन तरुण, महाभारतकालीन हिंदूंचा पेहेराव असावा तसा, अंगावर धारण करून राजस्वागत करण्यासाठी हातात छत्र-चामरे घेऊन आले होते.

त्याचप्रमाणे दोन प्रौढ कुमारी पुष्पमाला हाती धरून सामोऱ्या आल्या. कपाळावर कुंकू, गौरवर्णाकडे झुकणारी कांति, हिंदू विनम्रता - क्षणभर सर्व काही अगदी महाभारतकालीन वातावरणात असल्यासारखे वाटले.

या बाली स्टाइल स्वागतानंतर 'बाली-बीच' हॉटेलमध्ये आलो. सुरेख बीच आहे. माझ्या खोलीच्या गच्चीत गेल्यावर पूर्व दिशेला, पसरलेला जावा समुद्र दिसला. क्षितिजावर अंधुकसे एक बेट व त्याच्यावरचे डोंगररांगांचे आकार दिसत होते. समुद्राचे पाणी शांत व स्वच्छ दिसले.

उद्या सकाळी सूर्योदयाचे आत या समुद्रकाठच्या चौपाटीवर अनवाणी चालण्याचा विचार आहे. बाली बेटावरची समुद्राची रेती उघडया पायतळाला लागावी अशी इच्छा आहे. या भूमीवर नम्रतापूर्वक असेच चालले पाहिजे. हा हिंदूंचा मुलुख आहे. मी हे हिंदुत्ववादाच्या भावनेने नाही म्हणत - पण अजूनही येथे लाखो हिंदू परंपरागत कथांच्या आधारे चालत आलेली हिंदू संस्कृति जपत आहेत हे मी पाहिले.

चारच्या सुमाराला बाहेर पडून एका हिंदु कुटुंबाने चालविलेले हॅण्डिक्राफ्ट्सचे केन्द्र पाहिले. त्याने आपल्या घराची आखणी दाखविली. ही परंपरागत आहे. घराला दरवाजा आहे. आत जाताच मोकळे अंगण, ईशान्येच्या बाजूला एक मंदिर. सामान्यत: सुखवस्तु हिंदू असेच आहेत. हिंदू संस्कृति आपला जातपातीचा वारसा येथेही घेऊन आली आहे.

पण बेट फार सुंदर आहे. केरळ - कोकणामध्ये असावी अशी गर्द झाडे, जमीन उत्तम म्हणून शेती उत्तम. इंडोनेशियाच्या स्टँडर्डच्या तुलनेने हे लोक अतिशय उद्योगी आहेत. नटलेला निसर्ग इतका विपुल आहे की, येथे नृत्य, चित्रकला, यांसारख्या कला शतकानुशतके पोसल्या गेल्या त्यात काय आश्चर्य !