४३ क्विबेक
२७ सप्टेंबर, १९७४
मिनिस्टर्सची मीटिंग चालू असतानाच मोकळा (किंवा कंटाळवाणा) वाटलेल्या वेळात यापूर्वीचे लिहिले.
आज सकाळी ओटावाहून सरकारी विमान भरून कॉमनवेल्थ देशांचे बहुतेक वित्तमंत्रि येथे पोहोचले. Miss Lind Sowrd नावाची संपर्काधिकारी म्हणून आमच्या ग्रूपचे मार्गदर्शन करीत आहे.
फ्रेंच लोक या प्रांतात प्रथम आले म्हणून येथे त्यांचे व त्यांच्या भाषेचे प्रभुत्व आहे. येथे सर्व काही फ्रेंच आहे. प्रांताभिमान म्हणजे काय आहे ते येथे आल्याशिवाय समजणार नाही.
सर्वच युरोपियन देशांमध्ये ही प्रवृत्ती वाढती आहे. विशेषत: इंग्लंडमध्ये तर या स्वतंत्रतेच्या भावनेची तीव्रता जास्तच दिसते. याचे नवल वाटते. साम्राज्याची राजकीय शक्ती, प्रतिष्ठा आणि आर्थिक सुबत्तेमध्ये योग्य ती भागीदारी असल्यामुळे कदाचित या भावना झाकल्या व दबल्या गेल्या असतील. परंतु आता ही राष्ट्रे एका अर्थाने दुय्यम दर्जाची झाल्यामुळे ती अवस्था राहिली नाही.
नॉर्दर्न सी - उत्तर सागरामध्ये सापडलेल्या तेलाच्या प्रचंड साठयामुळे स्कॉटलंडमध्ये नव्या राष्ट्रवादाची फुटीर चळवळ अंग धरून राहिली आहे. निवडणुकीतील यशासाठी या वृत्तीशी तडजोड करण्याची सर्व प्रमुख पक्षांची तयारी दिसते.
इंग्लंडच्या डेलिगेशनचे प्रमुख श्री. मिचेल यांनी आपल्या देशाच्या सर्व नेत्यांवर, माझ्याशी झालेल्या खाजगी बोलण्यात स्पष्ट टीका केली आणि हे महाअरिष्ट आहे असे बोलून दाखविले.
हीथ व विल्सन या दोघांवर लोकांचा व त्यांच्या पक्षाचाही खराखुरा विश्वास (ट्रस्ट) नाही व लिबरल पक्षाची धोरणे, त्यांची कार्यशक्ति व तिचा अभाव ही दोन्ही सिध्द झालेली नाहीत. त्यामुळे त्यांची खरी माहिती नाही.
नेतृत्वाची, दुर्दैवाने अशी परिस्थिती असल्यामुळे Identity of the nation is fast ebbing away असे अत्यंत कारुण्यपूर्ण उद्गार काढले. हे जगातले नवे ट्रेंड्स् आहेत. भारताच्या संदर्भात याचे अन्वयार्थ तपासले पाहिजेत.
सेंट लॉरेन्स, केवढी प्रचंड नदी आहे! जगातल्या मोठया नद्यांपैकी नदी आहे. नदीकाठचे उंच खडकाळ टेकडीवरील शहर. नदीच्या काठी असलेली सुंदर नवी-जुनी शहरे, लांबच लांब विस्तीर्ण हिरवीगार मैदाने मन मोहून टाकतात. थंडी होती तरी या हिरवळीवरच्या आखीवरेखीव वाटांवरून नदीकाठापर्यंत दोन मैल चालून आलो.
नदीचा काठ म्हटला म्हणजे मला माझे बालपण व युवावस्था यांची तीव्र आठवण येते. नदीकाठचे, माझ्या हॉटेलच्या खोलीमधून दृश्य पहात पहातच हे लिहीत आहे.
कालपासून कॅनडामध्ये बऱ्याच बुक-स्टॉल्सवर गेलो. काही फ्रेंच व बहुतेक अमेरिकन लेखकांची पुस्तके प्रामुख्याने दिसली. माझ्या बरोबरच्या येथील लोकांना, कॅनॅडियन लेखक व त्यांची पुस्तके सुचवा असे मी सांगितले. लिंडाने एक लिस्ट दिली आहे. दोन पुस्तके हायकमिशनर श्री. वाजपेयी यांनी माझ्याकरिता विकत घेतली. प्रवासात परत जाताना जरूर वाचणार आहे.
आता परत रिसेप्शन व रात्री भोजन आहे. उद्या सकाळी ६ वाजता निघून वॉशिंग्टनसाठी विमान पकडावयाचे आहे. पुढे आता वॉशिंग्टनमधून लिहीन.