• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ८४

मी माझ्या येथील भाषणात या वाक्याचा पुनरुच्चार केला. सर्व आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निर्णयांना या विचाराची कसोटी लावली पाहिजे असे प्रतिपादिले.

या परिषदेमध्ये आफ्रिकन देशांतून आलेल्या प्रतिनिधींची नवी पिढी पाहून नव्या आशा वाढल्या. स्पष्टपणे बोलणारे हुशार लोक आहेत.

सायप्रसचे वित्तमंत्रि श्री. ए. पास्टलीदेस (A. Pastalides) हे भेटल्यामुळे अतिशय आनंद वाटला. गेल्या चार महिन्यांत सायप्रसमध्ये झालेल्या उलथापालथीमध्ये या सुसंस्कृत, मितभाषणी, गोड स्वभावाच्या पण सावध माणसाचे काय झाले असेल असा सारखा विचार माझ्या मनात येत होता. १९७० च्या निकोसियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ वित्तमंत्रि परिषदेचे ते चेअरमन होते व त्याच वेळी त्यांची माझी चांगली मैत्री झाली होती.

त्यांनाही मला भेटून खराखुरा आनंद वाटला. गव्हर्नर-जनलरच्या स्वागत-समारंभाच्यावेळी मुद्दाम वेळ काढून सायप्रस-बंडाळीच्या वेळच्या रोमहर्षक कहाण्या त्यांनी सांगितल्या.

आर्चबिशप पापकोरेस कसे पळाले, ८-१० दिवस ते सर्वजण आपापल्या घरी कसे बंदिस्त राहिले, इत्यादि हकीगती त्यांच्याच तोंडून ऐकताना एक वेगळा अनुभव आला.

सायप्रस अजून अस्वस्थ आहे. आर्चबिशपना पाठिंबा बहुमताचा असला तरी त्यांचे सायप्रसमध्ये येण्याने आज ज्या ऐक्याची गरज आहे ती टिकणारी नाही, असे त्यांना वाटते. तसे आर्चबिशपना भेटून सांगितले आहे.

काल 'स्टिंग' ही जुनी (मेक्सिकन) फिल्म पाहिली. भरपूर मनोरंजन होते. हजार लोकांसाठी बांधलेल्या चित्रपटगृहामध्ये २५-३० लोक प्रेक्षक म्हणून होते. टेलिव्हिजनने चित्रपटगृहांची हीच परिस्थिती सर्वत्र केली आहे म्हणतात! १९५१ मध्ये फ्रेंच प्रदर्शनामध्ये चित्रपटास उत्तमोत्तम चित्र म्हणून मानले होते. जुने चित्र म्हणून मुद्दाम गेलो होतो.

मुद्दाम वेळ काढून पार्लमेंटचे सभागृह पाहून आलो. बसण्याची पध्दति, आमच्या जुन्या पुण्याच्या कौन्सिल हॉलसारखी. समान रांगांमध्ये एकमेकांसमोर सरकार व प्रतिपक्ष बसतात. पंतप्रधान पहिल्या रांगेतील मध्यस्थानी बसतात. इमारत जुनी, ऐतिहासिक वाटते. आत सर्व आधुनिकता आहे. लायब्ररी उत्तम. पहिल्या स्त्री-सभासदाचा व लढाईत कामी आलेल्या पहिल्या एम्. पी. चा पुतळा कॉरिडॉरमध्ये होता. दर्शकांना ते मुद्दाम दाखविले जाते.

या सभागृहात मी एक अंत्यत चांगली प्रथा पाहिली. लढाईत कामी आलेल्या जवानांची स्मृति राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून अत्यंत सन्मानपूर्वक जागविते. अशा जवानांची नावे अनेक व्हॉल्यूममध्ये लिहून ते एका हॉलमध्ये मुद्दाम ठेवले आहेत. प्रत्येक दिवशी सकाळी, पार्लमेंटचा गार्डचा अधिकारी सन्मानपूर्वक प्रत्येक ग्रंथाचे पान उलटून अभिवादन (सॅल्यूट) करतो.

बुक-स्टॉल्स पाहिले. सगळीकडे अमेरिकन लेखकांचीच पुस्तके दिसली.

परिषद नित्यासारखीच झाली. काही नव्या ओळखी झाल्या. कॉमनवेल्थचे Opec वाले (तेली) सदस्य धनिकासारखे बोलू-वागू लागले आहेत. एका वर्षात किती चटकन आणि महत्त्वाचा बदल झाला आहे, याचा वारंवार अनुभव येतो.