काळ्या तांबड मातीचा,
तिळा दगड धोंड्याला,
आम्ही भरला मरठ,
हिरव्या बिलोली झाडांना ॥
येता पावसाळी झड
न्हाली गुलाला माती,
पंख पिळ्या पानांत,
थेंब थेंब झाले मोती ॥
मोतीयाचा मळवट,
कळा भोगल्या भुईला,
किती वर्षांनी मिळाली,
ओटी फटक्या दुःखाला ॥
येऊ दे गा पिक पाणी,
जन्म दुःखाच्या कारणी,
सोनराळी मातीतला,
गंध भरू दे अस्मानी ॥
काळ बरबटं जळोनी,
गंगा वाहू दे निर्मळ,
लाख चांदण्या गोंदून,
कधी भरू दे आभाळ ॥
गोदा गंगोत्रीचं पाणी,
झालं पावन दांडात,
काळ्या गर्भार भूईला,
स्वप्न पडे चांदण्यात ॥
काळ्या तांबड मातीचा,
तिळा दगड धोंड्याला,
आम्ही भरला मरठ,
हिरव्या बिलोली झाडांना ॥
सौजन्य : प्रथम प्रकाशन 'महाराष्ट्र टाइम्स'