भाग तिसरा
पिकांना ठिबक पद्धतीने पाणी देण्याचे तंत्रविज्ञान तसे अगदीच अलीकडच्या काळातील आहे. म्हणून सुरुवातीच्या काळातील अडचणींमुळे बावरून जाण्याचे कारण नाही.
ठिबक पद्धतीचा प्रसार हा खर्या अर्थाने गेल्या दहा-पंधरा वर्षातीलच आहे. ठिबक पद्धतीच्या पेटंटची नोंदणी कॅलिफोर्नियातील एका उद्योजकाने सुमारे शंभर वर्षापूर्वी केलेली आढळते. तथापि, सबंध शतकात ठिबक पद्धतीचा विकास करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न झाले नाहीत. तथापि, १९६० सालापासून या पाणी देण्याच्या तंत्रविद्येकडे शास्त्रज्ञ, अभियंते, कृषितज्ज्ञ आणि उद्योजक यांचे विशेष लक्ष गेल्याचे आढळून येते. या नवीन तंत्रविद्येचा व्यापारी पद्धतीने उपयोग करण्यात व विस्तार करण्यात इझरायल या राष्ट्राने विशेष लक्ष दिले. इझरायलचा प्रदेश हा बव्हंशी राजस्थानच्या वाळवंटासारखा आणि कमी पाऊस पडणारा असल्यामुळे अशा प्रकारच्या आधुनिक आणि काटकसरीने पाणी वापरण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. इझरायल आपला भाजीपाला, फुले, फळे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करणारा देश असल्यामुळे आणि ठिबक पद्धतीने तंत्रविज्ञान उत्पादनक्षमता वाढविणारे असल्यामुळे निर्यातीच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे होते. हवाईतील ऊस उत्पादकांच्या संघटनेने त्यांच्या ऊस मळ्यांतील प्रयोग केंद्रावर ठिबक पद्धतीचा प्रयोग प्रथम १९५९ साली केला; तथापि व्यापारी तथापि, पद्धतीने ठिबक पद्धतीची सुरुवात १९७० ते १९७२ चे नंतरच हवाईतही झाल्याचे आढळून येते. हवाईत आता सुमारे ९० टक्के ऊस ठिबक पद्धतीने भिजवला जातो. आता मात्र या नवीन तंत्रविज्ञानाकडे जगातील पाण्याचा विशेष तुटवडा असलेल्या सर्व भागांतील जनतेचे व कृषितज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे. महाराष्ट्रात मी प्रथम जाहीररीतीने ठिबक पद्धतीची चर्चा केली त्या वेळेस ठिबक पद्धतीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले होते :
जमिनीची प्रत, पिकाचे अगर झाडाचे वय, मुळांची वाढ, पानांतून आणि जमिनीतून होणारे बाष्पीभवनाचे प्रमाण इत्यादी मूलभूत घटक लक्षात घेऊन रोपट्याच्या अगर झाडाच्या मुळाजवळ पिकाच्या गरजेएवढेच पाणी प्लॅस्टिक अगर पोलिथिनच्या लहान नळीने थेंबथेंब देणे या पद्धतीस ठिबक पद्धती म्हणून संबोधिले जाते.
' ठिबक पद्धतीने पाणी देण्याची पद्धती ही पाणी-व्यवस्थापन क्षेत्रातील क्रांतीच समजली पाहिजे. अणुशक्ती, इलेक्ट्रॉनिक्स लेसर किरणे, यंत्रमानव इत्यादीमुळे ज्याप्रमाणे मानवी इतिहासाला कलाटणी मिळत आहे, तद्वतच शेतीच्या भवितव्याला ठिबक पद्धतीमुळे ऐतिहासिक वळण मिळणार आहे. उसासारख्या पिकासही ठिबक पद्धतीने पाणी देणे शक्य झाल्यामुळे तर भविष्यकाळात संशोधकांच्या प्रयत्नानी बहुतेक सर्व पिकांना ठिबक पद्धतीने पाणी देणे शक्य होईल.' (महाराष्ट्र टाइम्समधील लेख).
पण ठिबक पद्धतीमुळे खरा दिलासा मिळणार आहे तो जिरायती शेती करणार्या शेतकर्यांना. महाराष्ट्रासारख्या दुष्काळी प्रदेशात सुद्धा परंपरागत पद्धतीने पाण्याचा वापर केला तरी सुमारे तीस टक्के जमीन ओलिताखाली येऊ शकेल असे महाराष्ट्र पाटबंधारे आयोगाने मत व्यक्त केले. ठिबक पद्धतीने सरासरी पन्नास टक्के पाण्याची बचत होते असे गृहीत धरले तरी तात्विक दृष्ट्या महाराष्ट्रातील साठ टक्के जमिन ओलिताखाली येऊ शकेल.