ऋणानुबंध (78)

या सर्वांनी आपला घाम, रक्त आणि कर्तृत्व यांतून देशाची बांधणी केली. हळूहळू त्यांच्यांत रोटी-बेटी व्यवहार सुरू झाले आणि मूळचे इंडियन, नंतर आलेले स्पॅनिश, इंग्रज, आफ्रिकी, पोर्तुगीज यांच्या मिश्रणातून एक चौथाच समाज निर्माण झाला आहे. अर्जेन्टिनामध्ये गो-या लोकांची संख्या जास्त आहे, तर मेक्सिकोमध्ये मूळचे इंडियन आणि गोरे यांच्या मिश्रणातून एका नव्या पिढीने जन्म घेतला आहे. एकूण हा सारा समाजच मल्टिरेशियल समाज बनला आहे. काही ठिकाणी गोरे अधिक आहेत, तर काही ठिकाणी काळे अधिक आहेत.

कॅनडामध्ये हिंडताना, कॅनडामधील काही नामवंत लेखकांनी लिहिलेले ग्रंथ खरेदी करण्यासाठी म्हणून मी काही पुस्तकांच्या दुकानांतून फेरफटका मारला. ओटावामध्ये असताना तेथील एका तरुण, तरतरीत अधिका-याबरोबर मी पुस्तकांच्या दुकानात गेलो. पुस्तकांची चांगली दुकाने आपल्याला पाहावयाची आहेत आणि पुस्तके खरेदी करावयाची आहेत, असे मी या अधिका-याला सांगितले होते. त्याने मला मोठ्या दुकानांतून फिरविले. हा तरुण अधिकारी पूर्वी भारतात आला होता आणि महाराष्ट्रात उरळी-कांचनला आठ-दहा दिवस राहिलेला होता. मोठा हुशार वाटला.

पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर, ग्रंथांवरून मी नजर टाकली आणि काहीही खरेदी न करता परत फिरू लागताच, माझ्या बरोबरच्या तरुणाला मोठे आश्चर्य वाटले.

'पुस्तक खरेदी करणार आहात ना?' त्याने विचारले.
'मला पाहिजे आहे, ते येथे दिसत नाही.' मी सांगितले.
यावर तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहतच राहिला.

वस्तुस्थिती अशी होती, की तेथे हारीने मांडलेले ग्रंथ हे अमेरिकन लेखकांचे होते. मला हवे होते कॅनडामधील लेखकांनी लिहिलेले ग्रंथ. पण मला असे आढळले, की अमेरिकन लेखकांनीच ग्रंथबाजाराचा बव्हंशी कबजा घेतलेला आहे. इंग्लंडमधील पुस्तकांच्या दुकानांतून मला इंग्रज लेखक आढळले; परंतु कॅनडामधील दुकानांत अमेरिकन लेखकांचा भरणाच अधिक दिसला.

कॅनेडियन लेखकांची माहिती मिळेल, म्हणून मोठ्या उत्साहाने मी खरेदीसाठी गेलो होतो. अखेर या तरुण अधिका-यासच कॅनडामधील लेखकांची यादी देण्यास मी सुचविले. अर्थात कॅनडामधील तीन-चार दिवसांच्या मुक्कामात मला जे दिसले, त्यावरून माझे हे मत बनले. संशोधन करून हे मत बनले आहे, असे नव्हे. कॅनेडियन लेखकांचीही पुस्तके अन्यत्र कोठे असू शकतील, परंतु मी गेलो, तेथील दुकानांत मला जो भरणा दिसला, तो मात्र अमेरिकन लेखकांचा होता.

या सा-या प्रवासात सायप्रसची भेट मात्र माझ्या लक्षात वेगळ्याच कारणाकरिता राहिली. सायप्रसचा प्रश्न तेव्हा वादग्रस्त बनला होता व सायप्रसच्या सरकारला शक्ती मिळावी आणि तेथील प्रमुख दोन समाजांत सहकार्य निर्माण व्हावे, असे भारताचे धोरण होते.