• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (80)

फामागुस्ता (Famagusta) या बंदराची आणखी एक निशाणी माझ्या मनात राहिली. या बंदराला तटबंदी आहे आणि तटबंदीवर 'ऑथेल्लो टॉवर' या नावाचा टॉवर आहे. शेक्सपिअरच्या 'ऑथेल्लो' या प्रसिद्ध नाटकाची पार्श्वभूमी म्हणजे हा टॉवर होय. शेक्सपिअरच्या 'ऑथेल्लो'मधील तो कृष्णवर्णी सरदार, की ज्याला त्याची गोरी प्रियकरीण, पत्नी डेस्डिमोनाबद्दल संशय आला आणि म्हणून त्याने त्या टॉवरवर तिचा गळा दाबून खून केला ! या घटनेची आठवण करून देणारा हा टॉवर तिथे उभा आहे. 'ऑथेल्लो टॉवर' हे त्याचे नाव.

टॉवरच्या समोर प्रचंड सागर आहे. पर्वतप्राय लाटा सागरात उसळत असतात. तो सारखा खळखळत असतो. टॉवरवर डेस्डिमोनाचा गळा दाबून तिच्याच प्रियकराने केलेल्या खुनाचे प्रतीक आणि खळाळणारा सागर यांचे तेथील चमत्कारिक मिश्रण काही वेगळेच सांगून जाते. सायप्रसमधील धर्माची संकटे, चर्च, मशिदी येतील-जातील; पण प्रीती आणि असूया या मानवी चिरंतर भावनांचा संघर्ष पाहिलेला साक्षीदार हा टॉवर येथे मुक्काम करूनच उभा आहे. येथील सागरही असूयेतून घडलेल्या अनेकानेक घटनांचा साक्षीदार आहे. धर्माची असूयाही त्याने पाहिली आणि डेस्डिमोनाचा गळा दाबून तिला निष्प्राण करणारी प्रीतीची असूयाही पाहिली. हा टॉवर आणि समोर खळाळणारा सागर यांच्याकडे आळीपाळीने पाहिले, तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहून असूयेने विकट हास्य करीत आहेत, असे मला भासले.

सायप्रसमध्ये असे काही गंभीर पाहिले. परंतु मनात निर्माण झालेले गांभीर्य बाजूला करणारे, आनंदाने भरलेले एक दृश्यही याच दौ-यात मला पाहायला मिळाले. हजारो माणसे आनंदाने, मोकळ्या मनाने जल्लोश करीत आहेत. स्वानंदात मग्न आहेत, असे होते हे दृश्य.

सर्व ग्रीक लोक सप्टेंबरच्या १२ ते २० तारखांच्या आठ दिवसांत 'वाईन फेस्टिव्हल' - मदिरोत्सव साजरा करतात. सायप्रसच्या दक्षिणेला 'लिमासिल' नावाचे एक प्रसिद्ध बंदर आहे. ते पाहायला गेलो होतो. तेव्हा मदिरोत्सव सुरू झाला होता. तरुण स्त्री-पुरुष, मध्यम वयाची माणसे उत्तम पोशाख करून या उत्सवासाठी आलेली असतात. हे सर्वजण मनमुराद मदिरापान करतात. नाचतात, बागडतात, हसतात. मोकळेपणाने आनंदीआनंद करतात. पण तिथे कसला बीभत्सपणा आढळत नाही. हे सारे जण काहीसे आपल्याच नशेत रममाण झालेले मला दिसले. समाजाने कधी तरी एकदा मोकळे बनून सामुदायिक आनंदोत्सव साजरा करण्याचा, खळखळून हसण्याचा हा उत्सव वर्षातून आठ दिवस होत असतो. सायप्रसमधील ग्रीक लोकांची ही जत्रा मला काहीशी वेगळीच वाटली. भारतातील अनेक जत्रा मी पाहिल्या आहेत, तरुण वयात या जत्रांत हिंडलोही आहे. पण हा मदिरोत्सव आणि तोही सामुदायिक. शेकडो, हजारो लोक एकत्र येऊन यथेच्छ मदिरापान करीत आहेत, मोकळेपणाने हसत आहेत, आनंद करीत आहेत, हे दृश्य मला नवीन होते.