• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (81)

भारत हा काही तरी धार्मिक, पारलौकिक गोष्टींचा विचार करणारा, अध्यात्मवादी देश आहे, अशी काही अस्पष्ट कल्पना अजूनही ब-याच पाश्चात्त्यांच्या मनात घर करून आहे. हा एक प्राचीन संस्कृतीचा देश आहे, अशी कल्पना आहे. आधुनिक भारताच्या आर्थिक, वैज्ञानिक कर्तृत्वाची माहिती तुलनेने त्यांना कमीच आहे. आधुनिक भारताच्या जीवनाची माहिती देण्याचा आमचा सतत प्रयत्न सुरू आहे. भारत आणि मेक्सिको, जमेकासारखे लांबचे देश यांतील मोठे अंतर ही एक अडचण जाणवते. परंतु तरीही आमच्यासारखे भारतीय तेथे पोहोचतात, तेव्हा त्यांना नव्या भारताची - स्वतंत्र भारताची - माहिती मिळते. यापुढच्या काळात व्यापार, आर्थिक व्यवहार ज्या प्रमाणात वाढतील, त्या प्रमाणात हे अंतर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. कॅरेबियन सी देशांत आणि मेक्सिकोसारख्या ठिकाणी लोकांनी गांधी-नेहरू यांचे पुतळे उभारले आहेत. या नेत्यांनी स्वातंत्र्याचे विचार दिले, त्याचा परिणाम येथे उमटला आहे. जुन्या पिढीतले लोक त्यांना मानतात. गांधी-नेहरू-टागोर या त्यांच्या प्रेरणा आहेत. नव्या प्रेरणा तेथवर पोहोचविणे हेच यापुढचे काम आहे, असे सर्व प्रवासानंतर माझे मत बनले.

भारताच्या परराष्ट्र-नीतीबद्दलच्या धोरणाने पाश्चात्त्य जगात आता चांगलेच मूळ धरले आहे, याची जाणीवही परदेशच्या प्रवासात सातत्याने होत राहते. जागतिक लष्करी गटबाजीपासून अलिप्त राहून, देशहिताच्या दृष्टीने स्वतंत्र निर्णय घेण्याचे धोरण पं. नेहरुंनी पुरस्कारले, त्यावेळी उलट-सुलट टीका होत राहिल्या. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तंटे तडजोडीच्या मार्गाने सुटावेत, असा भारतीय नेत्यांचा कळकळीचा प्रयत्न होता. पं. नेहरूंनी त्या दृष्टीने जे प्रयत्न केले, त्यांमुळे जागतिक राजकारणात पंडितजींना आणि पर्यायाने भारताला मानाचे स्थान मिळाले; भारताला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने देशातील जनतेचा स्वाभिमानही द्विगुणित झाला. पंडितजींच्या या स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणामुळे परदेशांतील बड्या राष्ट्रांकडून भारताला मदतीचा ओघ सुरू राहण्यास मदत झाली; आणि त्यामुळे देशाच्या अंतर्गत गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते आर्थिक धोरण आखणे भारताला शक्य झाले. अलिप्ततावादी धोरणाबद्दल पाश्चात्त्यांचे काही आक्षेप होते, टीका केल्या जात होत्या, अमेरिकेचे मुत्सद्दी शंका व्यक्त करीत होते, तर रशिया सहानुभूती दाखवीत होता. तरी पण पं. नेहरूंनी जाणीवपूर्वक आपल्या धोरणाचा पाठलाग चालूच ठेवला. भविष्यकाळात या धोरणाला भरघोस पाठिंबा मिळेल, असे चिन्ह काही लोकांना दिसत नव्हते. आज मात्र पं. नेहरूंनी सुरू केलेली अलिप्ततावादाची परराष्ट्रनीतीच योग्य असल्याचा पडताळा येऊ लागला आहे.