• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (79)

सायप्रसमध्ये ग्रीक आणि टर्किश असे दोन समाज आहेत. मी गेलो तेव्हा हे लहानसे बेट पाहण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दोन-तीन गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या. मी जे पाहिले, त्याबद्दल आता काही मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. पण जे पाहिले ते मात्र मनात राहिले आहे. तेथील ख्रिस्तपूर्व राजधानी 'सलामिस' ही सइन्स मध्ये आहे. येथे पूर्वी रोमन राज्य होते. ख्रिस्तपूर्व काळातील राजवाडे, थिएटर, स्नानगृह, तेथील पुस्तके वगैरे गोष्टी आजही पाहावयास उपलब्ध आहेत. राजवाड्यातील स्नानगृह पाहण्यासाठी गेलो, तेव्हा मला तिथे एक प्रतीक दिसले. आपल्याकडे जसे ब्रह्मा, विष्णु, महेश असे तिघांचे एकत्रित प्रतीक आहे, तसे ख्रिस्तपूर्व काळातील हे त्यांचे प्रतीक आहे. पण आश्चर्य असे, की या प्रतीकाची शिरे कापलेली होती. हा प्रकार पाहिल्यानंतर माझ्याबरोबर जी मार्गदर्शक स्त्री होती, तिच्याकडे याबाबत पृच्छा केली, तेव्हा ती म्हणाली,
'ख्रिश्चनांनी केलेला हा अत्याचार आहे. त्यांच्या विध्वंसक वृत्तीचा नमुना या अवस्थेत येथे उभा आहे.'

पुढे दोन तासांनी, अन्य ठिकाणे पाहत आम्ही, उत्तरेला असलेल्या फामागुस्ता या ठिकाणी पोहोचलो. फामागुस्ता हे बंदर असून, तेथे ग्रीक व टर्किश असे दोन्ही जमातींचे स्वतंत्र भाग आहेत. आम्ही टर्किश वस्तीत एक मशीद पाहण्यास गेलो. या मशिदीचे शिल्प मला चर्चसारखे दिसले. बाकी सर्व भाग चर्चसारखा आणि मध्येच एक मीनार अशी ही इमारत पाहून बरोबरच्या स्त्रीकडे चौकशी केली, तेव्हा तिने जे सांगितले, त्याने मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. ती म्हणाली,
'पूर्वी हे चर्च होते. इस्लाम धर्म येथे आला, तेव्हा त्यांनी चर्चची मशीद बनविली. इमारत तीच, फक्त एक मीनार उभारला. बस्स ! चर्चची मशीद बनली !'

या सर्व प्रकारावर आमची चर्चा सुरू असताना त्या स्त्रीने जे उद्गार काढले, ते मी माझ्याजवळ नोंद करून ठेवले आहेत.

'धर्माच्या नावाखाली मानव किती शतकांपासून हा अन्याय सहन करीत आहे?' असा तिचा सवाल होता आणि 'मानवाचे ते दु:ख अजूनही संपलेले नाही,' असा उत्तरार्ध तिने केला.

माझ्या मनात तिचे शब्द कोरले गेले. सगळ्याच धर्माचे हे असे आहे का, असा प्रश्न मी मग माझ्याच मनाला विचारला. सायप्रसमध्ये धार्मिक निष्ठेतून करण्यात आलेला विध्वंस मी नव्याने पाहत होतो; परंतु भारतात घडून गेलेले असे किती तरी विध्वंस मी त्याअगोदर पाहिले होते. अशा स्थितीत त्या स्त्रीच्या सवालाला मी काय उत्तर देणार ! ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम जेथून निघाला, तेथून त्यांनी आपल्याबरोबर आपली राज्येही जगभर नेली आणि जेथे गेले, तेथील पूर्वीच्या राज्यांचा, त्यांच्या धार्मिक प्रतीकांचा उच्छेद केला, हा इतिहास आहे. युरोपात तर धर्माच्या नावाखाली अनन्वित अत्याचार झाल्याच्या साक्षी आहेत.