• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (75)

दुनियेच्या सफरीत मी अनेक लहान-मोठे देश पाहिले, परंतु त्यांतील काही देशांची स्मृती, विशिष्ट कारणामुळे, तेथे जे पाहिले, अनुभवले, ऐकले, त्यामुळे कायमची टिकून राहिली आहे. सामान्यत: मी जेथे जातो, तेथील इतिहासप्रसिद्ध स्थळे पाहतो आणि सांस्कृतिक जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

१९६३ साली प्रथमच मी रशियाला गेलो. त्या वेळी, मोकळेपणाने काही भागांत हिंडलो. रशियाच्या खुल्या मैदानातील इतिहास, भूगोल पाहिला. मॉस्कोतील प्रदर्शनात शेतीपासून, विज्ञानाच्या आधुनिक अंतराळ-उड्डाणापर्यंतची दालने पाहिली. लेनिन आणि टॉलस्टॉयच्या समाधींची दर्शने घेतली. व्होल्गा नदीच्या किना-यावरील दुस-या महायुद्धाच्या स्मारकांचा-दुर्दशेचा तो इतिहास पाहिला. हे स्मारक एका टेकडीवर जिवंत करणा-या कलावंतालाही भेटलो. टॉलस्टॉयने विश्वाचे चिंतन करण्यात सारी हयात घालविली, ते 'यस्ना पलाना' या ठिकाणचे त्यांचे निवासस्थान, ते जेथे बसले, बोलले, लिहिले, ते सारे जिवंतपणाने जसेच्या तसे जतन करून ठेवलेलेही पाहिले. टॉलस्टॉयचे हे स्मारक म्हणजे एक जिवंत, बोलके, रम्य, मनोहर असे तपोवन आहे. बालपणी टॉलस्टॉयने ज्या वृक्षांचे बीजारोपण केले, तेच वृक्ष आता त्याच्या समाधीवर चव-या ढाळत आहेत. फुलांचा वर्षाव करीत आहेत. ज्ञानाची दिव्य अनुभूती मिळावी, असे ते ठिकाण.

इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशांच्या भेटीमध्ये लंडन येथे, इंग्रजांनी जतन केलेले जुन्या इतिहासाचे दालन पाहताना या कर्तृत्ववान देशाच्या चारशे-पाचशे वर्षांच्या क्रियाशीलतेचे दर्शन घडून गेले. भारत हा जसा प्राचीन इतिहासाने भरलेला देश आहे आणि तेथे जुनी ऐतिहासिक कागदपत्रे पाहावयास मिळतात, त्याचप्रमाणे लंडनमधील हे इतिहासाचे दालन युरोपातील इतिहासाने भरलेले आहे. प्रयत्नातून, क्रियाशीलतेतून निघालेला हा इतिहास आहे. या लोकांनी समुद्र व्यापले, साम्राज्ये निर्माण केली. युरोपाचे जीवन घडविले. ते सर्व इथे पाहता येते. लंडनमधील जुने राजवाडे, वस्तुसंग्रहालये यांचे एक वेगळे आकर्षण आहे. लंडनमध्ये मी काही नाटके पाहिली; सुंदर नाटके पाहण्याचे लंडन हे उत्तम ठिकाण आहे. तेथील नाट्यजीवन मला प्रसन्न वाटले.

अमेरिकेच्या इतिहासाला तशी प्राचीनता नाही. अलीकडील तीनशे-चारशे वर्षांचा या राष्ट्राचा इतिहास आहे. परंतु आधुनिक जीवनातील विज्ञानाचा स्पर्श झालेल्या किंवा विज्ञानमय बनलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या पाहताना मनुष्य थक्क होतो. प्रामुख्याने मी तिथल्या शिक्षण-संस्था पाहिल्या. हॉर्वर्डसारखी विद्यापीठे पाहिली. डिफेन्स विभागातील एअर-फोर्स व नेव्हल अकादमी पाहिल्या, परंतु या सर्वांमध्ये जॉर्ज वॉशिंग्टनच्या निवासस्थानाने माझे मन आकर्षून घेतले. जॉर्ज वॉशिंग्टन तेव्हा जसा राहत होता, त्या वेळचे ते रूप जसेच्या तसे जतन करून ठेवले आहे. तो कसा राहत होता, कोठे झोपत होता, त्याचे ग्रंथालय, स्वयंपाकघर, तो बसत असे, ती बग्गी हे सर्व पाहण्यासारखे आहे. त्याचा तिथे बंगला आहे आणि सभोवती शेकडो एकर जमीन आहे. त्या बंगल्यात प्रवेश केला, की जॉर्ज वॉशिंग्टनच्या जीवनाचे संपूर्ण चित्र उभे राहते. मला हे ठिकाण फार आवडले. न्यूयॉर्क आणि लंडन येथील नाट्यमंदिरे आणि तेथे सुरू असलेली काही नाटके मी पाहिली. या दोन्ही शहरांतील नाट्य-कला-क्षेत्र मोठे भव्य आहे. मन प्रसन्न होते.