• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (74)

परदेशांतून परतल्यावर, भारतीय माणसे परदेशांतील माणसांबद्दल, त्यांच्या वृत्तीबद्दल, त्यांच्या भारतीयत्वाबद्दल प्रश्न विचारतात, तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटते. परदेशांत पिढ्यान् पिढ्या स्थायिक झालेल्या भारतीयाला आपल्यासमोर उभा करून ही मंडळी त्याच्याशी तुलना करतात आणि त्यांची भारतीय संस्कृती, भाषा, रीतिरिवाज, राष्ट्रनिष्ठा शाबूत आहे का, आणि नसेल, तर भारत सरकार त्याबाबतीत कोणती भूमिका स्वीकारणार आहे, असेही विचारतात.

माझे म्हणणे असे, की परदेशांतील भारतीयांच्या मनात आपल्या पूर्वजांची, प्राचीन इतिहासाची आठवण कायम असल्याने आजच्या भारताने त्या सर्वांशी संस्थात्मक संबंध ठेवण्याचे प्रयत्न करावेत. भारत सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. संगीत, हिंदी नृत्य, भाषा, वाङ्मय-पुरवठा यांद्वारे हा जिव्हाळा कायम टिकविण्याचा प्रयत्न आहे. शिक्षणासाठी किंवा अन्य सांस्कृतिक कार्यासाठी त्यांना भारतात बोलाविण्यातही येते. माझ्यासारखी मंडळी त्या त्या देशाला भेट देतात, त्या वेळी तेथील भारतीय आवर्जून भेटीसाठी येतात. आम्हाला पाहून त्यांना आपल्या घरचाच कोणी तरी आला आहे, अशी भावना निर्माण होते आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी त्याचे दर्शनही घडते. वर्षानुवर्षे दूरवर राहत असलेल्या भारतीयांना पाहून आपल्यालाही आनंद होतो. पण ही झाली एक बाजू. भावनात्मक म्हणा, फार तर! परंतु दुसरी बाजू यापेक्षा मला अधिक महत्त्वाची वाटते.

भारताबाहेर पिढ्यान् पिढ्या ज्या कोणत्या देशात भारतीय नागरिक या ना त्या कारणासाठी स्थायिक झालेले आहेत, त्यांनी त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे, हे उघड आहे. अशा स्थितीत त्यांचा देश कोणता? अर्थात ते ज्या देशाचे नागरिक बनले आहेत आणि नागरिकत्वाचे हक्क कायदेशीररीत्या उपभोगत आहेत, ते लोक त्याच देशाचे नागरिक ठरतात. ते ज्या देशात राहतात, तोच त्यांचा देश, राष्ट्र होय. कारण तेथील भाषा, चालीरीती, शिक्षण, राज्यपद्धती यांच्याशी समरस होऊनच ते तेथे राहत आहेत. जो मनुष्य ज्या देशाचा नागरिक बनला असेल, त्याने त्या देशाच्या प्रश्नांशी, हितसंबंधांशी, राजकारणाशी, समाजकारणाशी एकरूप होऊन, भागीदार बनूनच राहिले पाहिजे. भारतीय म्हणून वेगळेपणा जतन न करता त्या देशाचा नागरिक म्हणूनच त्याची वागणूक असावयास हवी. तो भारतीय आहे, म्हणून त्याने आपली संस्कृती, भाषा, देशाबद्दलचा जिव्हाळा, प्राचीनतेचा, इतिहासाचा अभिमान जरूर जतन करावा. पण हे सर्व त्याच्या किंवा कुटुंबाच्या मर्यादेपुरते असले पाहिजे, राहिले पाहिजे. हा स्वाभिमान त्या देशाच्या हिताच्या आड येता कामा नये. कारण त्याचा देश कोणता? तर तो ज्या देशाचा पिढ्यान् पिढ्या नागरिक बनला आहे, तो त्याचा देश. त्याला दोन्ही घोड्यांवर स्वार होता येणार नाही. मूळची संस्कृती, देश यासंबंधीचा जिव्हाळा असावा, पण प्राथम्य मात्र, तो ज्या देशाचा नागरिक, त्या देशालाच त्याने दिले पाहिजे. आमच्या दृष्टीने त्याला विरोध असण्याचे कारण नाही. उलट, तो नागरिक तेथेच समरस होऊन काम करीत राहिल्याने भारत आणि तो देश यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित होण्यास मदतच होईल. भारताला जगातल्या निरनिराळ्या राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करावयाचे आहेत. त्याला, मला वाटते, हा दृष्टिकोन अनुकूल ठरेल.