• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (76)

फ्रान्समधील पॅरिस हे मला युरोपच्या संस्कृतीचे, केंद्र वाटले. एका अर्थाने युरोपच्या संस्कृतीचे, हे शहर केंद्रच होते. व्हर्सेलिसच्या पॅलेसमध्ये नेपोलियनच्या कर्तृत्वाचे दर्शन आजही घडते. नेपोलियनच्या वेळच्या परिस्थितीचे चित्र या ठिकाणी सजीवतेने उभे करण्यात आले आहे. या शहरातील ऐतिहासिक इमारती, उत्तुंग शिल्पकला, भव्य इमारती, वस्तुसंग्रहालये हे सर्व व्यवस्थित आणि नीट-नेटक्या अवस्थेत असलेले दिसून आले. फ्रान्सच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्रिपद जेव्हा आँद्रे मॉर्ला यांच्याकडे सोपविण्यात आले, त्या वेळी या मंत्र्याने या सर्व शिल्पकलावास्तूंची मलिनता, जुनेपणा झटकून टाकून, त्या सर्व ताज्या टवटवीत बनविल्या. शहर मोठे सुंदर आहे. वस्तुसंग्रहालयातील जुनी चित्रकला पाहताना मन मोहून जाते. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका सुंदर चर्चसमोरील सुमारे अर्धा एकर जागेतील कलाकारांचा बाजार पाहताना पाय तेथेच अडखळतात. या पटांगणात कलाकार मंडळी लहान लहान तंबू उभारून, त्या ठिकाणी चित्रे रेखाटीत असतात. हे एक मोठे अजब ठिकाण आहे. चित्रे रेखाटणा-या या कलाकारांचे हात मोठ्या कुशलपणाने फिरत असतात. पाहणारेही अवतीभोवती भटकत असतात. मला हा मेळावा फार लक्षवेधी वाटला. माझी ही आवड ध्यानात ठेवून या मेळाव्याचे तेथील चित्रकाराने काढलेले एक चित्र माझ्या एका तरुण मित्राने नंतर मला भेट म्हणून दिले. मी मोठ्या चवीने माझ्या बैठकीच्या दालनात ते लावून टाकले आहे.

जगातल्या या मोठ्या शहरांतून फिरताना माझ्या असे लक्षात आले, की या महत्त्वाच्या शहरांना नदीकाठ आहे. सागराचा प्रचंड जलाशय पाहून मन प्रसन्न होते, हे तर खरेच; पण नद्यांचे काठ मला त्यापेक्षाही सुंदर दिसतात. नदीची मला फार भुरळ पडते. मी नदीकाठचा आहे, त्याचा हा परिणाम असेल कदाचित. पण नदीचे जलाशयाने भरलेले पात्र आणि तीरांवरील हिरवीगार वृक्षराजी, पिकाने भरलेली शेते पाहून माझ्या मनाला नदीकाठाचीच भुरळ अधिक पडते. मोठमोठ्या नद्यांचे किनारे व्यवस्थित राहतील याकडे परदेशांतील मंडळींनी जे खास लक्ष दिलेले दिसते, ते लक्षात येते. नद्यांचा उपयोग प्रामुख्याने शेती, वीज आणि जलवाहतूक यांसाठीच केला जातो. नदीच्या पाण्याबद्दल या लोकांना जबरदस्त प्रेम आहे.

व्हिएन्ना, झेकोस्लोव्हाकिया, युगोस्लाव्हिया आणि तेथून अन्य देशांत वाहत जाणारी विशाल डॅन्यूब नदी, रशियातील प्रचंड व्होल्गा नदी, उत्तर-पूर्व आफ्रिकेतून युगांडा, इथियोपिया, सुदान, इजिप्त, आदी देशांतून भूमध्य समुद्रापर्यंत वाहत जाणारी मोठी नदी नाईल-ब्ल्यू नाईल, सेंट लॉरेन्स नदी, सैबेरियातील दक्षिणेतून निघून उत्तर समुद्राकडे जाणारी ओब (जलश) नदी ही सुद्धा एक जबरदस्त नदी आहे. सैबेरियातील नेवासेब्रिस्क हे एक मोठे वाढते शहर आहे. या शहरापासून थोड्या अंतरावर ओब नदीला कोयनेसारखे एक प्रचंड धरण बांधले आहे. मध्य आफ्रिकेतील कांगो आणि निगर नदी, झांबियामधील झंबिया नदी - या सर्वच नद्या प्रचंड असून या नद्यांच्या पाण्याचा उपयोग मानवी जीवन भौतिक अर्थाने संपन्न बनवण्यासाठी केला जात आहे. आस्वानसारखे प्रचंड धरण अलीकडे बांधले गेले; परंतु युरोपात नदीच्या पाण्याचा उपयोग शेती, उद्योग, वीज आणि वाहतूक यांसाठी करावयाचा, हे फार पूर्वीपासून सुरू आहे.