• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (119)

आज आम्ही त्यांची शंभरावी साजरी करतो आहोत; आणि आनंदाची गोष्ट ही, की पुणे विश्वविद्यालयाने त्यात एक प्रकारचा पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्रातील आमचे हे अग्रगण्य विश्वविद्यालय. पुण्यासारख्या आमच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये महाराष्ट्रातील एका थोर समाजसेवकाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आपली श्रद्धांजली त्यांना वाहावी, अशा वेळी मी एक कार्यकर्ता म्हणून हजर राहिलो, याच्याबद्दल मला फार मोठे समाधान आहे. ते जीवन इतके उच्च आणि उदात्त होते, की त्याच्या अत्यंत निकट जाऊन पोहोचण्याचे भाग्य लाभणे अवघड होते. तरी पण ही गोष्ट कबूल केली पाहिजे, की मी व्यक्तिश: एक भाग्यवान माणूस आहे, की मला त्यांना भेटावयाची संधी मिळाली होती. फार तरुणपणी त्यांच्याकडे जाऊन काही तास घालविण्याची संधी मिळाली होती. अगदी अनोळखीपणे त्यांच्याकडे गेलो, माझ्या गावच्या अस्पृश्योद्धाराच्या कामाकरिता तुम्ही आले पाहिजे, असा बालहट्ट धरून मी त्यांच्याजवळ बसलो. त्यांनी तो माझा बालहट्ट पुरा केला होता. एक थोर माणूस एका लहानशा गावातील वीस वर्षांच्या अनोळखी मुलाचा आग्रह मान्य करून माझ्या गावी आला होता. हरिजन वस्तीत मला नाईट स्कूल काढावयाचे होते. त्याकरिता मी त्यांना निमंत्रण द्यायला आलो होतो. प्रथमत: त्यांनी मला नाही म्हणून सांगितले. पण पुन्हा म्हणाले, 'थांब जरा. मला तुझ्याशी बोलू दे.' दहा-बारा तास त्यांच्या संगतीत घालविले. खरे म्हणजे, माझी उलटतपासणीच केली त्यांनी त्या वेळी. शेवटी त्यांनी येण्याचे मान्य केले आणि मला असे वाटले, की मला जणू स्वर्ग मिळाला. माझ्या आमंत्रणाने एवढा मोठा माणूस माझ्या छोट्या गावी आला. त्यांना न्यावयाला त्या काळी माझ्याकडे गाडी नव्हती किंवा गाडी देण्याची शक्ती असणा-या कोणा माणसाशी माझी ओळखही नव्हती. ते माझ्या गावी पुण्याहून रेल्वेने आले. स्टेशनवरून टांग्याने गावात आले व माझ्याबरोबर पायी चालले, हरिजन वाड्यामध्ये आले. हृदय भरून त्यांनी आपले विचार सांगितले. हे सगळे जुने आठवले, म्हणजे मला असे वाटते, की आपले आयुष्य अत्यंत संपन्न आहे. या एका थोर पुरुषाच्या थोडे-फार निकट येण्याची आपल्याला संधी मिळाली, त्यामुळे जीवनामध्ये एक प्रकारची संस्कारसंपन्नता प्राप्त झाली.

आपल्यामध्ये समाजशास्त्राचा सखोल अभ्यास केलेली व्यासंगी विद्वान माणसे पुष्कळ आहेत. महर्षी शिंदे यांनी या विषयावर थोडे-फार लिहिले आहे, ते आपल्यासमोर आहे. त्यांचे जे कार्य आहे व त्यांनी जे लिहिले आहे, ते इतके मौलिक आहे, की आजच्या विद्वानाला ते वाचावे लागेल, त्याचे परिशीलन करावे लागेल; आजच्या परिस्थितीशी ते तुलनेने तपासून घ्यावे लागेल, हे खरे. त्यांचे काही निष्कर्ष आजच्या विद्वानांच्या वा संशोधकांच्या कसोटीला कदाचित उतरणार नाहीत. परंतु ज्या निष्ठेने व प्रेरणेने त्यांनी हे सर्व कार्य केले, ती मूळ प्रेरणा आजही तितकीच मार्गदर्शक आहे, असे माझे स्वत:चे तरी मत आहे.