• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (118)

अस्पृश्योद्धाराकरिता विचाराच्या दृष्टीने पहिला प्रयत्न करणारे जोतिबा फुले हे प्रवर्तक होते. त्यांनी काही क्रांतिकारक विचार सांगितले. पण या प्रश्नाला संघटितरीत्या तोंड दिले पाहिजे, असा प्रयत्न करण्यासाठी एक संस्था उभी करावी, असा प्रयत्न करणारे, माझ्या कल्पनेप्रमाणे हिंदुस्थानामध्ये कोणी असतील, मला माहीत नाही. माझे अज्ञान मी कबूल करतो, पण या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे पहिले गृहस्थ होते. त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस् मिशन ही संस्था काढली आणि हे काम सुरू केले. पुढे त्यांच्या कार्याला किती यश आले किंवा अपयश आले, याचे मूल्यमापन करणे फार कठीण आहे. कारण आज जगाची रीत अशी आहे, की जो यशस्वी, तो मोठा. या फूटपट्टीने जर मोजण्याचे आपण ठरविले, तर म्हटले पाहिजे, की विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन हे असफल जीवन आहे. पण ती फूटपट्टी चुकीची पट्टी आहे.

त्यांनी बुद्धिनिष्ठेच्या निकषावर स्वत:चे विचार नक्की केले होते. घासूनपुसून स्वच्छ केले होते. नुसतेच निष्ठेने मान्य केले, असे नव्हे, तर त्या विचारांना अनुकूल असे स्वत:चे जीवन घडविण्याचा प्रयत्न केला; आणि त्याप्रमाणे इतरांचे जीवन घडविण्याकरिता संस्था स्थापन केली. सुदैव महाराष्ट्राचे, की आम्हाला अशी अभिमानास्पद माणसे लाभली. अशी लोकविलक्षण माणसे स्वत:च्याच एक प्रकारच्या ध्येयवादाच्या वेडामध्ये, स्वत:च्या लोकसेवेच्या छंदामध्ये रममाण होतात. हा एक छंद आहे व त्याबाबत जग काय म्हणते, याचा त्यांनी विचार केला नाही. कोणी काही म्हणत असले, तरी आपले कार्य चालूच ठेवावयाचे, हा त्यांचा बाणा होता. त्यांचा अवमान किती झाला, त्यांना गरिबीचे क्षण किती सहन करावे लागले. मित्रांनी, नातेवाइकांनी किती दुर्लक्षिले, जी संस्था त्यांनी आपल्या आयुष्यातील सगळे क्षणन् क्षण देऊन वाढवावयाचा प्रयत्न केला, त्या संस्थेने किती अवमानित केले, याची त्यांनी फिकीर केली नाही. जर कधी वाटले, तर त्यांनी इतरांना समजाविण्याचा प्रयत्न केला. पण आपले काम त्यांनी कधी सोडले नाही. अशी बुद्धिनिष्ठ, ध्येयनिष्ठ, सेवानिष्ठ, कर्तृत्ववान, प्रतिभावान आणि पराक्रमी माणसे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये निर्माण झाल्यामुळे आम्हाला एक महाराष्ट्रपण आलेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता म्हणून जी म्हणतात, ती हीच!

एखादा चित्रकार जर कुंचल्याने त्या अस्मितेचे चित्र काढू शकला, तर फारच चांगले आहे. एखादा उत्तम साहित्यिकही कदाचित आपल्या लालित्यपूर्ण वाणी-लेखणीने तिचे सुंदर वर्णनही करील. पण ही अस्मिता अनेक शतकांतून, अनेक पुरुषांच्या कर्तृत्ववान जीवनांतून, त्यांनी दिलेल्या संस्कारांतून जडतघडत आलेली अशी एक अमूर्त शक्ती तुमच्या-आमच्या अंत:करणांत वास करते आहे, तीच आपली महाराष्ट्राची अस्मिता, असे मी मानतो. ही अस्मिता घडवणारी जी काही कर्तृत्ववान माणसे होऊन गेली, त्यांमध्ये या महर्षींचे फार मोठे मानाचे स्थान आहे, अशी माझी स्वत:ची भावना आहे.