• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (120)

या थोर पुरुषाचे कार्य जरी आपण पुरे करू शकलो नाही, तरी निदान त्याची शंभरावी आपण साजरी करून आपले कर्तव्य आपण पुरे केले, अशी आपली खोटी समजूत करून घेतली, तर आपणा सर्वांची मोठी फसगत होईल. शंभरावी साजरी करणे ही एक औपचारिकता ठरावयाची नसेल, तर आम्ही स्वत:ला बजावले पाहिजे, की महर्षी शिंदे यांनी ज्या प्रश्नाला हात घातला, तो प्रश्न आजही सुटलेला नाही. दलितोद्धाराच्या व सामाजिक न्यायाच्या निष्ठेने ते बाहेर पडले. तो प्रश्न आजही सुटलेला नाही. वस्तुत: तो प्रश्न आज अत्यंत तीव्र स्वरूपात आमच्यापुढे उभा आहे. ज्यांना आम्ही दलित म्हणून वागविले, ते आता स्वत:ला दलित मानीत नाहीत. ते मनाने व बुद्धीने मुक्त झाले आहेत. ते आता बंडाचे निशाण घेऊन उभे राहिले आहेत. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा व अत्यंत अग्रक्रमाचा असा प्रश्न आहे. येत्या दहा-पाच वर्षांसाठी या प्रश्नाला प्रथम अग्रक्रम द्यावा लागेल, इतक्या तातडीचा हा प्रश्न बनला आहे. महर्षी शिंद्यांची आठवण जर महाराष्ट्राला करून द्यावयाची असेल, तर निदान महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अपु-या राहिलेल्या कार्याची आठवण तुम्ही-आम्ही ठेवली पाहिजे.

आम्ही अभिमानाने सांगतो, की आगरकर, म. फुले, डॉ. आंबेडकर, महर्षी शिंदे यांच्यासारखी थोर माणसे आमच्यात निर्माण झाली. परंतु समाजाच्या खालच्या थरातील माणसावर अन्यायअत्याचार झाल्याच्या - कधी कधी त्यांच्या हत्येच्याही - बातम्या जेव्हा लोक वाचतात, ऐकतात, तेव्हा बाहेरील माणसे आम्हांला त्यांबाबत विचारतात, त्या वेळी मी तरी शरमेने मान खाली घालतो. काही सांगता येत नाही. उत्तर देता येत नाही. कुणी म्हणतात, तुम्ही तर महाराष्ट्राचे नेते आणि हे असे का? कसले नेते ! कसला पुढारीपणा !! सामाजिक न्यायाची चीड मनामनामध्ये आम्ही चेतवीत नाही, तोपर्यन्त या नेतेपणाला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात सामाजिक मन अजूनही भंगलेले आहे. मी हा विचार महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या वेळीही बोललो होतो. त्याचीच मी आज पुनरावृत्ती करीत आहे. हे भंगलेले मन जोडून एकजीव करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली नाही, तर या सर्व मोठ्या पुरुषांचे वंशज आहोत, हे सांगण्याचा व त्यांची स्मारके करण्याचा आम्हाला अधिकार नाही.