• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (117)

मध्यंतरी त्यांच्यावर स्पेन्सर वगैरे विचारवंतांचा परिणाम असल्यामुळे ते काहीसे नास्तिक झाले होते; आणि विद्यार्थिदशेमध्ये नास्तिक असण्याची अशी एक फॅशन असतेच. परंतु त्यांच्या घरी भागवतधर्माची परंपरा होती. वडिलांनी नावच विठ्ठल ठेवले होते. तेव्हा भागवतधर्माची परंपरा होती, हे सांगायला काही वेगळ्या पुराव्याची जरुरी नाही. ते उपासना करीत असत; परंतु ते काही धर्मभोळे नव्हते. संशोधक होते, परंतु पढीक पंडित नव्हते. राष्ट्रभक्त होते, परंतु राजकारणी नव्हते. असा वरवर विरोधी वाटणारा मोठा विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा हा माणूस होता.

आता पाठीमागे वळून पाहिल्यानंतर हे सर्व काही विरोधाभासासारखे वाटते. पण ख-या अर्थाने त्यात विरोधाभास नव्हता. त्यांचे जीवन नित्य वाहत राहणा-या जिवंत झ-यासारखे होते. त्याला थांबविण्याचा प्रयत्न कुणाला शक्य नव्हता. कधी लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तरी त्याची त्यांनी पर्वा केली नाही. स्वत:चे विचार, संस्कार व व्यासंग यांच्या आधारे त्यांची मते बनली होती आणि ती त्यांनी अत्यंत निर्भीडपणे मांडली. स्वत: अत्यंत प्रामाणिक. जी गोष्ट मनाला पटेल, ती स्वच्छपणे बोलावी आणि त्यानंतर त्यासंबंधी चिंता करू नये, असा त्यांचा स्वभाव होता.

त्यांनी मराठी आणि कानडीसंबंधीची मीमांसा केली आहे. मला नाही वाटत, की महाराष्ट्रातील राजकारणाच्या आघाडीवर असलेली कोणी माणसे आज त्यातील विचार मान्य करायला राजकारणी म्हणून तयार होतील. त्या सगळ्या मतांशी मी सहमत आहे, असे म्हणायला मलाही धीर होत नाही, हे प्रामाणिकपणे सांगायला काही हरकत नाही. परंतु त्यांनी निर्भीडपणे मराठी कसे आले व कोठून आले, त्याची मीमांसा केली आहे. त्याचप्रमाणे भारताची संस्कृती महान आहे, हे खरे, परंतु भारताची संस्कृती म्हणजे निव्वळ आर्यसंस्कृती आहे का, आणि आर्य येण्यापूर्वी भारतामध्ये कोणती संस्कृती होती? भारतात आर्य येण्यापूर्वी जी माणसे होती, त्यांच्याही पूर्वी तेथे कोणी दुसरी माणसे असतीलच ना? आज हिंदुस्थानामध्ये जो कोणी वंश आहे, त्याचा कोणी एक पूर्वज आहे का? असे अनेक मर्मभेदी मूलभूत प्रश्न त्यांनी हाताळले आहेत. एके ठिकाणी असे म्हटले आहे, की असा कोणी माणूस छातीवर हात ठेवून सांगू शकेल का, की मी एकाच वंशाचा आहे. फार अवघड आहे. फार तर आम्ही असा दावा करू, की पाच-सात हजार वर्षांचा इतिहास असलेल्या संस्कृतीचा हा प्राचीन देश आहे. परंतु जर कोणी म्हणेल, की माझा एकच वंश हजारो वर्षे अगदी बिनचूक, शुद्ध राहिलेला असा आहे, तरी ती खोटी घमेंड ठरेल. हा दावा करणारे कोणी भेटणारच नाहीत, असे नाही; परंतु ते बुद्धीस पटणारे नाही, असे शिंदे यांनी सगळ्याच प्रश्नांमध्ये खोल जाऊन सांगितले आहे. पण हा सगळा बुद्धीचा विलास करीत असताना ते मानवी सहानुभूती विसरले नाहीत, हे सगळ्यांत महत्त्वाचे आहे. इतके अत्यंत कठीण अशा सामाजिकशास्त्राचे, व्यासंगाचे संशोधन चालू होते; पण हे संशोधन चालू असताना सामाजिकशास्त्र ज्याच्या जीवनाभोवती जमलेले आहे, त्या माणसाला ते विसरले नव्हते. त्या माणसाचे जीवन, त्या माणसाच्या आजच्या समस्या यासाठी त्यांनी स्वत:चा सबंध जन्म वाहिला.