मराठी नाट्यसृष्टीची निष्ठेने सेवा करण्यासाठी फार मोठी कामगिरी त्या काळात मामा वरेरकरांनी केली. जवळजवळ पाच दशके वरेरकरांनी नाट्यलेखन केले. त्यांच्या नाटकांची संख्या जवळपास ५० त्यातह पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक असे विविध नाट्यविषयक त्यांनी हाताळले. त्यांची नाट्यलेखनकला मुख्यत: समाजाभिमुख आणि प्रचारकी वृत्तीची आहे. त्यांच्या नाट्यलेखनाबाबत यशवंतराव लिहितात, "मामासाहेब वरेरकर हे आणखी एक थोर सामाजिक नाटककार ! हुंड्यापासून धर्मांतरापर्यंतचे विषय आणि गिरणीतल्या मजुरापासून साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष निवडल्या गेलेल्या पण टांग्याच्या भाड्याला महाग असलेल्या प्रामाणिक साहित्यिकांपर्यंतची निरनिराळ्या थरांतील पात्रे त्यांनी कुशलतेने हाताळली. ताजे विषय, चुटचुटीत टीका आणि खुसखुशीत संवाद हे त्यांच्या लेखणीचे प्रमुख विशेष मामासाहेब वरेरकर वृद्ध झाले, तरी प्रौढत्वी निज शैशवास जपणे' हा त्यांचा बाणा आहे त्यांची कला चिरतरुण आहे हे सिद्ध करण्यास 'भूमिकन्या सीता' या नाटकाचा उल्लेख पुरेसा होईल." समाजात वेळोवेळी जी आंदोलने झाली त्यांचे पडसाद त्या आंदोलनासंबधीची वरेवरकरांची भूमिका त्यांच्या नाटकात अवतरते. वरेरकरांनी एकांक प्रवेशी नाटके लिहिण्याचा पायंडा पाडला. नाटकातील संगीताचा अतिरेक कमी करून मर्यादित पदांची योजना केली. वरेरकरांची नाटके समकालीन सामाजिक विषयांवर असल्याने यशवंतरावांना ही नाटके अधिक भावस्पर्शी वाटली.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठी नाटक आणि रंगभूमी यांचे क्षेत्र व्यापक झालेले दिसते. वाङ्मय म्हणूनही नाटकाचा प्रांत जीवनाच्या विविध अनुभवांचे समर्थ दर्शन घडविणारा झालेला आहे. रंगभूमीच्या उद्धारासाठी अनेक नवीन नाट्यसंस्था निर्माण झाल्या. या संस्थांच्या माध्यमामुळे अनेक नाटके बसविली जाऊ लागली. मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेने स्वतंत्र नाट्यगृहे उभारली. जुन्या नटांच्या सहकार्याने जुनी नाटकेही बसवली जाऊ लागली. १९५४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य स्पर्धेत साहित्य संघाने केलेल्या 'भाऊबंदकी' या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले. या यशाने डॉ. भालेराव यांच्या नाट्यसेवेचा आणि दुर्गा खोटे, केशवराव दाते. इ. कलावंताचा तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी गौरव केल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात यशवंतरावा लिहितात, "त्यावेळी पहिले पारितोषिक 'भाऊबंदकी'नाटकाने पटकविले. मराठी रंगभूमीच्या थोर परंपरेचा असा गौरवपूर्वक बहुमान करून भारताच्या राजधानीतील श्रोतृवर्गाने आपल्या रसिकतेची साक्ष पटविली आहे." १९५५ मध्ये नवे मुंबई राज्य अस्तित्वात आले. या सरकारने नाटकांवरील कर रद्द केला. ही मराठी रंगभूमीच्या विकासातील महत्त्वाची घटना आहे. नाटकातून येणा-या उत्पन्नावर ३३ टक्के कर भरावा लागत असल्याने नाटक करणारे कोलमडून जात असत. याच वर्षी सरकारी नाट्यमहोत्सव सुरु झाले. अनेक नाट्यसंस्था उदयास आल्या. सरकारी उत्तेजन व निमसरकारी पातळीवरच्या नाट्यस्पर्धा, नाटयसंमेलने, नाट्यप्रशिक्षण, शिबिरे अशा अनेकविध उपक्रमांतून मराठी नाटकाला पुन्हा एकदा बहर येऊ लागला. दूरदर्शन,रेडिओ ही नवीन माध्यमे मराठी नाटकाला मिळाली. त्यामुळे नाटककार आणि नाटकांची संख्या वाढली. गावोगावी हौशी नाटकसंस्था स्थापन झआल्या. या संस्थांच्या माध्यमातून विविध नाटके स्पर्धेसाठी बसवली जाऊ लागली. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रात नाटकाने चांगलेच मूळ धरले. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोप-यात नवे नाटककार आणि नवे नाट्यकलावंत निर्माण झाले. या नवनाटककारांबाबत यशवंतराव लिहितात. " अगदी अलीकडच्या काळात श्री पु.ल.देशपांडे यांची 'तुझे आहे तजपाशी' व 'सुंदर मी होणार, श्री. बाळ कोल्हटकर यांचे 'दुरितांचे तिमिर जावो', श्री मराठे यांचे 'होनाजी बाळा', श्री विद्याधर गोखले यांचे 'पंडितराव जगन्नाथ', श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे 'चंद्रनभीचा ढळला' इत्यादि नाटकांनी विलक्षण लोकप्रियता मिळविली. या प्रकाराच्या नाट्यकृतीमुळे मराठी रंगभूमीवर एक नवीन पर्वकाळ येऊ पाहात आहे. त्याचे आपण स्वागत करुया." मराठी रंगभूमी बराच काल कथानक, संवाद, संगीत यांच्या साच्यात अडकून पडलेली होती. कृत्रिमतेच्या चौकटीतून मुक्त होऊ पाहणा-या नव्या मराठी रंगभूमीचे यशवंतरावांनी स्वागत केले आहे. नाट्यवाङ्मयात स्त्री शिक्षण, प्रौढ विवाह इ. सामाजिक चळवळींचे चित्रण तत्कालीन राजकीय जीवनाचे प्रतिबिंब नाटकातून उमटले. हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यांची समस्या, शेतक-यांचे प्रश्न आदी असंख्य प्रश्न सामाजिक नाटकातून मांडण्यात आले. कितीतरी नाटककार व नाटकमंडळ्या अशा स्वरुपाची नाट्यनिर्मिती करत होती. त्याचेही स्वागत यशवंतराव करतात.