यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३१ प्रकरण ४

प्रकरण ४ - ललितगद्याचे आकलन व समीक्षा

चरित्रविषयक विचार

चरित्र व आत्मचरित्र हा एक लोकप्रिय असा ललितेतर वाङ्मय प्रकार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मराठीतील इतर वाङ्मयप्रकाराप्रमाणेच याही वाङमयप्रकाराने मराठी साहित्य सृष्टीत फार मोलाची भर घातली आहे. वरवर पाहता सोपा वाटणारा पण प्रत्यक्ष लेखनात तितकाच अवघड असणारा हा वाङ्मयप्रकार आहे. कलात्मक दृष्ट्या हा वाङ्मयप्रकार हाताळणे अवघड आहे. कारण चरित्रात ख-या व्यक्तीची जीवनगाथा असते. त्यामुळे ते अधिक वस्तुनिष्ठ असते. असंख्य उपलब्ध अशा बाह्य पुराव्यांच्या आधारे व्यक्तीच्या बाह्यांगाकडून अंतरंगाकडे चरित्र जात असते. उपलब्ध माहितीवरून आणि चरित्रनायकाच्या उक्तींच्या आणि कृतीच्या आधारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे चित्र चरित्रकाराला रेखाटावे लागते. चरित्राची थोडक्यात व्याख्या 'सत्यपूर्ण व कलात्मक व्यक्तिदर्शन' अशी करता येईल. सातत्याने सत्याचे भान राखून एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा कालानुसार, घटनानुसार वा विषयानुरुप साधार विश्लेषणात्मक वा परिचयात्मक इतिहास व त्या आधारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा आलेख सामान्य चरित्रलेखात रेखाटलेला असतो.' ती व्यक्ती ज्या काळाशी व समाजाशी एकरुप झालेली असते त्यांच्याशी तिचे अतूट नाते जडलेले असते. चरित्राचा संबंध व्यक्ती आणि व्यक्तीच्या जीवनातील घडामोडी एवढ्यापुरताच मर्यादित असतो. एखादा थोर पुरुष त्याचे असामान्य कर्तृत्व, त्याचे लोकविलक्षण वागणे, त्याला आलेले विविध प्रकारचे अनुभव यांचे ज्ञान करून घेण्याची जिज्ञासा वाचकांना नेहमीच असते. एखादे चांगले चरित्र वाचताना आपण त्या त्या श्रेष्ठ व्यक्तींचे जीवन जगत असतो. थोडक्यात 'चरित्र वाङ्मय' हे अनेक अंगांनी सुजाण वाचकाला आकर्षून घेते. यशवंतराव चव्हाणांसारखा जाणकार वाचक सुद्धा याला अपवाद नव्हता. अशा या साहित्य प्रकाराचे सामर्थ्य, त्याच्या रचनेची वैशिष्टये, निर्मितीमागच्या प्रेरणा काय असाव्यात याबाबत यशवंतरावांचे विचार व मर्यादा जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. रुढार्थाने यशवंतरावांना चरित्रकार म्हणून संबोधता येईल की नाही याविषयी शंका वाटते. कारण लघुनिबंधकार, टीकाकार, आत्मचरित्रकार अशा विविध नात्यांनी यशवंतरावांनी मराठी साहित्याची बहुमोल सेवा केली आहे. यशवंतरावांच्या लेखनाची सारी वैशिष्टये त्यांच्या या विविध लेखन संभारात दिसून येतात. यशवंतरावांचे एकूण साहित्य डोळ्यांखालून घातले तर त्यांच्या नावे चरित्र ग्रंथ या रकान्यात एकही ग्रंथ आढळत नाही आणि म्हणूनच यशवंतरावांना सर्वार्थाने चरित्रकार म्हणावे की नाही असा संभ्रम निर्माण होतो. त्यांच्या साहित्यात चरित्रविषयक पुस्तक एकही नसले तरी त्यांनी चरित्रविषयक लेख मात्र पुष्कळ लिहिले आहेत. यशवंतरावांचे चरित्र, चारित्र्य व साहित्य या सर्वांवर विचारांच्या आणि आचारांच्या दृष्टीने चिरस्थायी छाप असलेल्या अनेक चरित्रकारांच्या चरित्रांचा प्रभाव जाणवतो. यशवंतरावांच्या कार्य व कर्तृत्वाची सुरुवातच मुळी महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, छ. शिवाजीमहाराज, छ. शाहू महाराज, लो. टिळक, म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरु यांसारख्या दिग्गज व्यक्तींपासून स्फूर्ती घेऊन झालेली आहे आणि म्हणूनच या थोर विभूतींविषयी प्रसंगानुरूप चरित्रपर लेख लिहून ठेवावे अथवा त्यांच्याबद्दल आपले मत व्यक्त करावे यात खचित औचित्य होते. त्यांनी लिहिलेल्या चरित्र लेखांचे स्वरुप तसे पाहिले तर अत्यंत संक्षिप्त होते. चरित्रलेखन करायचे म्हणून त्यांनी चरित्रलेखन केलेले दिसत नाही, तर त्यांनी जे थोडे फार चरित्रलेखन केले आहे त्यामध्ये ठरवून, निश्चित करून, बेतून असे फार कमी लिहिले आहे. स्थूल मानाने राजकीय, सामाजिक, वैचारिक अशा रीतीने काही स्फुटलेखन करताना मनाशी काही निश्चय बाळगून यशवंतराव लिहित असल्याचे आढळते. साहजिकच कुणा थोरा मोठ्याचे चरित्रलेखन करावे, ते अमुकच एका हेतूच्या सिद्धीसाठी असावे. ते अमुक अमुक रीतीचे असावे असा काही विचार यशवंतरावांच्या हातून जे नकळत चरित्रलेखन झाले आहे त्याबाबत दिसून येते नाही. लेखनाची हौस आणि आपल्याला सांगावेसे वाटते ते सांगण्याचा दांडगा उत्साह हाच यामध्ये प्रमुख असा भाग आढळतो. परिणामी चरित्र लेखनाविषयी तंत्रमंत्राचा विचार करून यशवंतरावांनी चरित्र लेखन अथवा चरित्रलेखनावर भाष्य केले नाही. पण जे थोडेफार या वाङ्मयप्रकाराबाबत लेखन केले आहे त्यामध्ये चरित्रलेखनाचे तंत्रमंत्रविषयक विशेष आढळतात हे विसरता येत नाही.