यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-२४

नाटक हा एक ललित वाङ्मयाचा प्रकार आहे. आणि सा-या ललित वाङ्मयाचा प्रमुख उद्देश म्हणजे काही सत्य हे अनेक कल्पित प्रसंगांनी कलात्मक रीतीने समाजापुढे मांडणे व मनोरंजन करणे. नाटकही त्याला अपवाद नाही. प्रयोगरुपाने रंगभूमीवर उभे राहिलेले नाटकी दृश्यात्मक रुपाने साकार केलेले ते नाटक अशीही एक कल्पना आहे. परंतु एवढीच कल्पना गृहित धरली तर रंगभूमी आणि नाटक यामध्ये दुजाभाव कल्पिल्यासारखे होते. नाटककार नाटकाची रचना करतो. आपल्या नाटकाविषयी काही कल्पना निश्चित करतो. यातूनच शोक नाट्य, सुखान्त नाट्य, प्रहसन लिहिण्याचे स्थूलमानाने मनाशी ठरवतो आणि नंतर कथानक, स्वभावचित्रण, संघर्ष, संवाद आणि वातावरण निर्मितीच्या साहाय्याने एक कलाकृती नाटक रुपाने निर्माण करतो. नाटक आणि नाट्यप्रयोग या दोन्ही गोष्टी भिन्न नसून एकाच वस्तूची दोन कलात्मक रुपे आहेत.

नाटकातून मानवी जीवनाचे दर्शन चित्रित करणे हाच प्रमुख उद्देश असतो. या बरोबर 'नाना रसांचा' अनुभवही नाटकामुळे घेता येतो. विविध स्वभावाच्या व्यक्ती, त्यांचे परस्परसंबंध, त्यातून विकसित झालेले कथानक आणि त्याच्या साहाय्याने साकार होणारे विविध रस, यांच्या परस्पर संबंधातून नाट्य तयार होते. पण हे नाट्य कोणासाठी? ते पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी प्रेक्षक नसतील तर त्याचा उपयोग नाही. नाटक हे प्रेक्षकांशिवाय असूच शकत नाही. यशवंतराव चव्हाण लिहितात, "आपण नाटकाचा हा जो एवढा संसार मांडतो, त्यात रंग भरतो तो प्रेक्षकांमुळे. नाटककार, नट आणि प्रेक्षक हेच रंगभूमीचे तीन मूलभूत घटक आहेत." नट आपल्या अभिनयाद्वारे त्यातील पात्रांची व्यक्तिमत्वे. नाट्य व संघर्ष यांचे दर्शन घडवतात. नाटककाराला नाटक सुचते आणि तो त्याचे लेखन करतो. विविध अभिरुचीचे प्रेक्षक असणेही नाटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. रंगमंचावर चाललेल्या नाटकाला प्रेक्षकसुद्धा अनुकूल, प्रतिकूल दाद देतात. हशा,टाळ्या, शिट्ट्या, शांतता, सावधता, एकाग्रता या सगळ्या आदानप्रदानातून नाट्य खुलते, फुलते, रंगते म्हणून नाटकातील हे सर्व घटक महत्वाचे आहेत. शिवाय पडद्यामागे कितीतरी घटक असतात. उदा. नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना, ध्वनी, संगीत इ. म्हणून नाटक हा वाङ्मयप्रकार व्यामिश्र आहे तो या अर्थाने.

यशवंतराव चव्हाणांची नाट्यविषयक आणि नाटक या कलाप्रकाराची समज व अभिरुची किती सजग होती ते त्यांच्या न्यूयॉर्क, १२ ऑक्टोबर १९७५ च्या पत्रावरुन लक्षात येते. तेथे विदेश मंत्र्यांची परिषद होती. युनोमधील आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील चर्चा संपल्यानंतर रात्री ते नाटक पाहण्यासाठी गेले. या नाटकाला अभिप्राय ते असा नोंदवितात, "रात्री Same time New Year हे नाटक पाहिले. केवलसिंग व जयपाल पती-पत्नी आणि शरद काळे असे आम्ही गेलो होतो. एक नमुनेदार अमेरिकन नाटक आहे. पात्रे फक्त दोन. उत्कृष्ट कामे केली. २-२ तास फक्त दोन पात्रांनी नाटक असे रंगविले की सांगता सोय नाही. नाटकाचा विषय, मांडणी कलाकारांनी जीव ओतून केलेला अभिनय यामुळे नाटक फारच परिणामकारक होते. कॉमेडी आहे. विनोद भरपूर आहे. पण सर्व विनोद मूलत: जीवनातील गंभीर अनुभूतीतून निर्माण होतो. एका जोडप्याची विवाहबाह्य मैत्री, अकस्मात आपल्या गावापासून दूरच्या शहरी होते. दरवर्षी याच महिन्यात एका Week-end ला ते सतत २५ वर्षे भेटत राहिले. सहा सीन्स आहेत. दर पार वर्षांनी भेट प्रत्येक प्रवेशामध्ये दाखविली आहे. २५ वर्षातल्या परिस्थितीत, वयाता, स्वभावात, मनात, झालेले फरक दाखविले आहेत. पण मैत्री अतूट आहे. शेवटी त्यातले गृहस्थ वृद्धपणी लग्नाची इच्छा व्यक्त करतात आणि स्त्री म्हणते 'I Cannot' कुटुंबाविषयीचा जिव्हाळा, नव-याबद्दल आदर ही कारणे सांगते आणि ती खरी असतात. तो रागावतो आणि निघून जातो. पण लगेच परततो आणि मैत्री संथपणे पुन्हा सुरु राहते. म्हटले तर मजा म्हटले तर एका गंभीर प्रसंगाचे चित्रण होते."