• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६६

महाराष्ट्रात शिक्षणाच्या आड गरीबी येऊ नये म्हणून त्यावेळच्या सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या. त्या सवलती घेणा-या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर 'गुणांची वाढ' केली पाहिजे. विद्यार्थी हा महत्त्वाकांक्षी असला पाहिजे. सर्व समाजात समरस होण्याची प्रवृत्ती त्याने अंगीकारली पाहिजे. कारण शिक्षणासाठी सरकारने खर्च केलेला पैसा हा गरीब समाजाकडून येतो. याची जाणीव ठेवून केवळ 'फुकट शिक्षण' हे फुकट शिक्षण होता कामा नये. विद्यार्थ्यात कर्तृत्व व परिश्रम करण्याची तयारी पाहिजे असे मार्गदर्शन ते करतात. यशवंतरावांचा गरीब विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावरून स्पष्ट होतो. समाजामध्ये असलेल्या कठीण परंपरा व रुढी झुगारून देऊन शिक्षणाचे महत्त्व महाराष्ट्राच्या जनतेस पटवून देण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा या संदर्भात २५ ऑगस्ट १९६० रोजी 'लोकशाहीतील नियोजन' या विषयावर विधानसभेत केलेल्या भाषणात ते अधिक भर देऊन म्हणतात, "सामाजिक सुखसोयीकडे दुर्लक्ष होता कामा नये ही गोष्ट मी मान्य करतो. आणि त्यातल्या त्यात शिक्षणाकडे तर मुळीच होता कामा नये. मी 'च' भाषेत बोलणार नाही. परंतु शिक्षणाची बाब इतकी महत्त्वाची आहे की त्यासंबंधी 'च' च्या भाषेत मला बोलावे लागत आहे. आपल्याला नवीन पिढी निर्माण करावयाची आहे. म्हणून मी सांगू इच्छितो की शिक्षणाच्या बाबीकडे मुळीच दुर्लक्ष होणार नाही. मी ही गोष्ट मुद्दाम आग्रहपूर्वक सांगतो आहे." यशवंतरावांची शिक्षणविषयक भूमिका किती निकोप, किती आशावादी तशीच कार्यप्रवण आहे याची साक्ष त्यांच्या वरील विचारांतून प्रत्ययास येते.

यशवंतरावांचे शिक्षण विषयावरील विचार आधुनिक स्वरुपाचे आहेत. त्यांची बोलीभाषा बोजड नाही. त्यांच्या स्वभावाचा साधेपणा जसा आकर्षक आहे तशीच त्यांची बोलीभाषा हृदयाची पकड घेणारी आहे. त्यांची शिक्षण व सामाजिक विषयावरील भाषणे चाळताना त्यांच्या या भाषणांतील सौंदर्यस्थळे एकामागून एका पाहावयास मिळतात. तसेच त्यांचे त्या विषयांवरील विवेचन वा भाष्य अथवा विषयाची मांडणी ते इतक्या सोप्या रीतीने करतात आणि त्यासाठी ते इतकी सहजसुंदर भाषा वापरतात की त्यातून सामान्य वाचकालाही खराखुरा अर्थबोध झाल्याशिवाय राहात नाही. महाबळेश्वर येथे इ.स. १९६० साली कार्यकर्त्यांच्या शिबिराच्या समारोपप्रसंगी ते म्हणाले होते, "मी आपणास सांगू इच्छितो की, शिक्षणाकडे निव्वळ सामाजिक गरजेच्या दृष्टीने मी पाहात नाही. माझ्या मते शिक्षण हे आर्थिक विकासाचे एक मूलभूत साधन आहे. आमच्यामध्ये शक्ती निर्माण करण्याकरिता आमच्याजवळ मनुष्यबळाशिवाय दुसरे काही साधन नसल्यामुळे आम्हाला या साधनाचा विकास करण्यासाठी त्याला शिक्षणाची जोड द्यावयाची आहे. खेड्यात बिजली नेऊन पोहोचविल्याशिवाय ज्याप्रमाणे शेतीचा विकास होणार नाही त्याचप्रमाणे आमचा नापीक पडलेला मनुष्यबळाचा हा जो मोठा साधनसंपत्तीचा भाग आहे त्यात शिक्षणाची बिजली नेल्याशिवाय नवसामर्थ्य निर्माण होणार नाही. शिक्षणाकडे पाहण्याचा माझा स्वत:चा हा असा दृष्टिकोन आहे. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती करण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा आहे, शेतीचे औद्योगिकरण करण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शिक्षणाचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे." यशवंतरावांचे स्वत:चे ध्येयस्वरुपच जण या शब्दात सामावले आहे असे म्हणता येईल. समाजाला विचारांचे ज्ञानदान करणे हेच यशवंतरावांच्या शैक्षणिक भाषणाचे सूत्र बनले. हे ज्ञानदान करताना सामाजिक परिवर्तनाची जी त्यांना आच लागलेली होती त्यामुळे या परिवर्तनासाठी सदैव कार्यरत राहण्याचे व्रत त्यांनी त्यावेली अंगीकारले आहे. त्यासाठी वेळोवेळी असंख्य प्रश्नांची चर्चा केली. या चर्चेतून त्यांनी जे जे विचार मांडले आहेत ते धारदार झाले आहेत. ते आवाहन करणारेच नव्हे तर आव्हान देणारेही ठरले आहेत ते म्हणतात, "शिक्षणातून केवळ ज्ञानाची उपासना वा बुद्धीची जोपासनाच करून चालणार नाही, तर भावनांची प्रगल्भता आणि अंत:करणाचा मोठेपणा अंगी असणे आवश्यक आहे." शैक्षणिक विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 'वाणी' या एकाच साधनाचा भरपूर उपयोग केला आहे. विचार आणि उच्चार याबाबत ते विलक्षण निर्भय होते. ही निर्भयशीलता त्यांच्या अनेक विचारांतून स्पष्ट होते. स्वत:ला योग्य वाटणा-या विचारांचा हिरिरिने पुरस्कार करणे हे त्यांनी जीवनाचे व्रत मानले होते.  तसे ते मानले होते म्हणूनच त्यांचे विचार सामान्यांपर्यंत येऊन पोहोचले. शिक्षण क्षेत्रात यशवंतरावांना जे चांगले वाईट जाणवले, अनुभव घेतले ते लोकांच्या समोर ठेवून त्यांची जिज्ञासा जागृत करण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. माणूस मनाने व विचाराने मुक्त व समर्त कसा होईल ही शिक्षणाची महत्त्वाची कसोटी आहे, असे ते सांगत.  शिक्षणाच्या संस्कारामुळे समाज संवेदनशील व सुसंस्कृत बनला पाहिजे. म्हणून ते सांगतात, "माणसाचे मन शिक्षणाच्या संस्काराने अधिक संपन्न केल्याशिवाय समजा ख-या अर्थाने समाज बनत नाही." शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रमुख समर्थ साधन आहे. त्यामुळे सामाजिक विषमता नाहीशी करण्यासाठी शिक्षणाविषयी निराशा असता कामा नये. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीय विचारवंतांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्या दृष्टीने फार मोठे कार्य केल्याचे यशवंतराव सांगतात - त्यामध्ये महात्मा जोतिराव फुले, दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकरशेट, छत्रपती शाहू महाराज, विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख आदींनी शिक्षण प्रसाराचे कार्य केल्याचा उल्लेख यशवंतराव आवर्जून करतात.