समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, त्यांच्यात स्वाभिमान जागृत करण्यासाठी शिक्षण हेच अत्यावश्यक साधन आहे असे यशवंतरावांनी सांगितले. एवढेच नव्हे तर समाजातील आर्थिक विषमता नाहीशी करायची असेल तर त्या विषमतेचे मूळ असलेली बौद्धिक किंवा मानसिक विषमताही नष्ट झाली पाहिजे. त्याशिवाय समाजाची खरी प्रगती होणार नाही असे ते ठासून सांगत. म्हणून सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बुद्धीच्या क्षेत्रात आणि ज्ञानाच्या क्षेत्रात वाढ झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांना शिक्षण दिल्याशिवाय ते घडून येणार नाही. शिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये प्रगती केल्याशिवाय देशाची औद्योगिक प्रगती होणे अशक्य आहे. म्हणून शिक्षणाकडे व्यापारी दृष्टिकोनातून न पाहता माणूस मनाने, विचाराने, मुक्त व समर्थ होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. हे ज्ञान प्रसाराचे कार्य पुढे नेटाने चालविण्याची विनंती ते करतात. ते याविषयी म्हणतात,"शिक्षणाचा हा प्रचंड प्रवाह महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात व प्रत्येक खेड्यात पोहोचला पाहिजे आणि त्यातून खेड्यातील नवीन पिढी सुशिक्षित झाली पाहिजे. शिक्षणाद्वारा होणारी ही क्रांती झालीच पाहिजे. असे एकही घर राहता कामा नये की, जेथे उच्च शिक्षणाची संधी पोहोचलेली नाही. ही शैक्षणिक क्रांती समाजामध्ये अशी जबरदस्त क्रांती निर्माण करेल की, ती शक्ती आपल्याला गप्प बसू देणार नाही. अडाणीपणाबरोबर भित्रेपणाही येतो. परंतु ज्यावेळी साठसत्तर टक्के समाज सुशिक्षित असतो, त्यावेली तो कुणापुढेही नमते घेत नाही. खरे-खोटे, योग्य-अयोग्य, हिताचे-गैरहिताचे हे सर्व तो आपल्या शिक्षणाच्या तराजूवर तोलून बघतो. घराघरामध्ये असे तराजू लागल्यावर जे घडेल ते चांगलेच असेल." असे विचार त्यांनी नागपूर येथे विदर्भ विकास परिषदेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यक्त केले. यशवंतराव विशेषत: गरीब जनतेला शिक्षण देण्यावर भर देतात. तसेच सर्वांना समान शिक्षणाची संधी मिळावी ही आग्रहाची भूमिका मांडताना दिसतात. म्हणून शिक्षणाची ज्ञानगंगा शेतक-यांपर्यंत पोहोचविल्याशिवाय विकासाची गंगा अवतरणार नाही असा विचार ते अनेक ठिकाणी मांडताना दिसतात. माणसाला अनेक संकटांतून मुक्त करण्याच्या दृष्टीने ज्ञान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. माणूस हेच शिक्षणाचे केंद्र असावे. निरक्षरता व अज्ञान यात रूतून बसलेल्या लोकांच्या बुद्धीचा विकास घडवून आणला पाहिजे. त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांना शिक्षित करणे ही काळाची गरज आहे. समाजाच्या वैचारिक आणि भावनिक विकासासाठी शिक्षण हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच त्यांच्या सांस्कृतिक विकासासाठीही आवश्यक आहे. यासाठी शिक्षणाची गुणात्मक वाढ झाली पाहिजे. ही गुणात्मक वाढ होण्यासाठी शिक्षणपद्धतीत सुधारणा कराव्या लागतील. अभ्यासक्रम, अध्यापन व परीक्षापद्धती इत्यादी गोष्टी बदलाव्या लागतील. म्हणजेच आपण मिळवलेले शिक्षण हे प्रत्यक्ष जीवनातील काही प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगी पडले पाहिजे. असे शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेऊन हे कार्य केले पाहिजे. संस्ताचालकांच्या कर्तबगारीवर आणि शहाणपणावर या गोष्टी अवलंबून आहेत ते म्हणतात, "पण मी आपल्याला सांगू इच्छितो की नुसत्या इमारती म्हणजे शिक्षणसंस्था नव्हेत. त्या संस्थांमध्ये काम करणारी जी माणसे आहेत, त्यांना प्रेरणा देणारे जे विचार आहेत, जे ध्येयवाद आहेत, ती माणसे, ते ध्येयवाद म्हणजेच या संस्था. ते ध्येयवाद, ते विचार, त्या कल्पना आपण जिवंत ठेवल्या पाहिजेत. आपल्या मनात नित्य स्मरल्या पाहिजेत. परंतु हे ध्येयवाद, हे विचार, आणि कल्पना आपल्या मनापर्यंत पोहोचल्या म्हणजे आपले काम संपले असे नाही. विचारांनी आम्ही विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत खरोखरी किती पोहोचलो आहोत हेही पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.... ही ज्ञानाची, शिक्षणाची, विचारांची, कल्पनांची, ध्येयवादाची ज्योत एकदा प्रज्वलित होऊन वाढली आणि कायम स्थिरावली की, हिंदुस्थानचे जीवन सुधारले आणि स्थिरावले असे तुम्हा-आम्हाला म्हणता येईल." असे विचार त्यांनी यशवंतर बेसिक ट्रेनिंग कॉलेजच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी वर्धा येथे व्यक्त केले आहेत. यशवंतरावांनी शिक्षक आणि त्यांच्या अध्यापनपद्धतीबाबतही येथे सूचना केल्या आहेत. तसेच संस्थाचालकांनीसुद्धा शैक्षणिक ध्येयधोरणाचा पाठपुरावा करून त्यांची ध्येयधोरणे यशस्वी करावीत, असा ते सल्ला देतात.