गेल्या चार-सहा दिवसात शेकडो मैलांचा प्रवास मी मोटारीने केला आणि त्यात कोणत्याही भागात जा, शेती जीवनाशी संबंधित सर्व सामाजिक जीवन कसे एकसारखे वाटते. एका प्रांतातील खेडे दुसऱ्या प्रांतातील खेड्यासारखेच दिसते. शेतीची अवजारे, वाहने, शेतधंद्यावर जाण्यायेण्याच्या चालीरीती, शेती करण्याची पद्धतीसुद्धा कशी एकसारखी आहे. नजरेत भरण्यासारखा फक्त एकच फरक ग्रामीण जीवनात दिसतो आणि तो म्हणजे स्त्रियांचा पेहेराव. त्या पेहेरावावरून मात्र सहजासहजी फरक लक्षात येतो.
अमरेलीला डॉ. जीवराज यांचा स्वत:चा बंगला आहे. शेजारीच त्यांचे दोन चुलत बंधू स्वतंत्र बंगल्यात रहातात. त्यांचे वडील बंधू ८० वर्षांचे असावेत. जुने मान्यतेचे कुटुंब असावे अशा चालीरीती दिसल्या. त्यांच्या दोन विधवा बहिणीही तेथे भेटल्या. 'गावाकडची' साधी माणसं दिसली ती. त्यांचे थोरले बंधू व थोरली बहीण ही अगदी ऐन जुन्या साध्या काठेवाडी जीवनाची प्रतीके आहेत. गेल्या ५० वर्षात हिंदी जीवनांत किती विलक्षण फरक झाला आहे, याचे उत्तम चित्र डॉ. जीवराज यांच्या एका कुटुंबाच्या निरीक्षणावरून येईल. जीवराजभाईंची थोरली बहीण, त्यांच्या पत्नी सौ. हंसाबेन, त्यांची कन्या व त्यांच्या घरी गेल्या दोन-तीन वर्षात आलेली त्यांची गौरकाय अमेरिकन स्नुषा या सर्वांना एकाच कुटुंबाचे संबंधित दुवे मानले तर किती मनोरंजक चित्र समोर उभे राहते नाही!
गुजराथी जिल्ह्यात पहिल्याप्रथम हिंदीत बोलण्याचा प्रसंग आज होता. परंतु निभावून नेला. त्यानंतर तीन सभांतून मी माझ्या हिंदीतून बोललो. श्री. पानसे नावाचे समाजवादी गृहस्थ येथे आहेत. त्यांनी मोठाच पेचप्रसंग निर्माण करण्याचा घाट घातला होता. डॉ. जीवराज प्रतिष्ठेला बळी पडतात की काय असे प्रथम वाटू लागले होते, पण शेवटी सभेत जाऊन बोलण्यास तयार झाले. निदर्शनासाठी जमलेल्या लोकसमुदायाची आम्ही आमची प्रचारसभा बनविली! एक दिवस तरी संपला. उद्याचे उद्या.
-यशवंतराव
वर्षाची सुरुवात
प्रवासानेच
महाराष्ट्रात १९५३ वर्ष हे दुष्काळी वर्ष होतं. यशवंतराव पुरवठा खात्याचे मंत्री. अन्नधान्याची टंचाई होती. रेशनिंगच्या त्या काळात पुरेशा धान्यपुरवठ्याअभावी लोकांची उपासमार सुरू होती. राज्यातल्या निरनिराळ्या भागातून मागण्या सुरू झाल्या होत्या. कार्यकर्ते तारा पाठवून, फोन करून धान्य पुरवठ्याची तसदी देत राहिले. त्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून गव्हाचा साठा उपलब्ध करून घेण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.
त्याच वेळी हैद्राबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन होण्याचे घाटत होते. केंद्रस्थानी पुरवठा आणि अन्न मंत्री श्री. किडवाई असताना त्यांनी हैद्राबाद अधिवेशनानंतर महाराष्ट्रातील दुष्काळी भागात येण्याचा विचार असल्याचे कळविले. दौऱ्यासाठी चार दिवस देऊ केले. दुष्काळी स्थिती असताना केंद्राची ही चालढकल महाराष्ट्रात असंतोष निर्माण करणारी तर होतीच; हैद्राबादचे अधिवेशन होईपर्यंत आणि अन्नमंत्र्यांचा दौरा, पहाणी होईपर्यंत लोकांची उपासमार वाढणार होती. केंद्राकडून आर्थिक मदत मिळविण्याचा महाराष्ट्राने प्रयत्न केला तेव्हा त्यावेळचे केंद्रीय अर्थमंत्री श्री. चिंतामणराव देशमुख यांनी अडसर घातला. महाराष्ट्रात दिल्लीहून उलटसुलट माहिती मिळत राहिल्याने पुरवठा मंत्र्यासमोर रोज नवी प्रश्नचिन्हे उमटू लागली. केंद्रीय अन्नमंत्री दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत तर त्यांना जमले तर पंचमहाल आणि विजापूर येथेही न्यावे असा मुख्यमंत्र्यांनी सांगावा दिला. चार दिवसात हे जमणार कसे असा प्रश्न यशवंतरावांना भेडसावत राहिला. रेशनिंगसाठी धान्य उपलब्ध करून देणे, केंद्राकडे विनवणी करणे आणि अर्थमंत्र्यांचा अडसर दूर करणे अशा त्रिकोणात असताना त्यांनी ज्या हालचाली केल्या, विचार केला आणि महत्प्रयासाने धान्य संपादन केले या संदर्भातील विविध नोंदी त्यांनी त्या त्या वेळी करून ठेवल्या. एक जानेवारी १९५३ पासूनच या नोंदींना प्रारंभ होतो -