विरंगुळा - २७

उज्जैनहून परत आल्यावर घाईघाईने जेवण उरकून बैठकीसाठी गेलो. प्राथमिक पंडितजी बोलले आणि नंतर घटनादुरुस्तीचे 'कंठाळे' काम सुरू झाले. सकाळीच तडजोडीची बोलणी होऊन वादग्रस्त प्रश्नाचा एकमताने निर्णय झाला होता असे दिसले. श्री. काका गाडगीळ वर्किंग कमिटीचे उपाध्यायाचे काम करीत होते. सभेतले एकंदर वातावरण निर्जीव होते. त्याला कोणाचाच उपाय नव्हता. परंतु काका ज्या निर्जीव पद्धतीने वारंवार 'माइक' पुढे येत होते आणि निर्जीव यंत्रासारखे बोलत होते त्यामुळे माझे तर अक्षरश: डोके दुखू लागले. एकदा तर त्यांनी अगदी लहान मुलासारखी चूक केली. एका कलमाखालची उपसूचना दुसऱ्या कलमाखाली वाचून दाखविली. पंडितजींच्या हे लक्षात येताच ते माईकजवळ येऊन सांगू लागले. बिचाऱ्या काकांना त्यांच्या कानांनी दगा दिला असल्यामुळे त्यांना पंडितजींचे बोलणे ऐकू येईना. माईकसमोर हे सर्व चालले असल्यामुळे सर्व सभागृहात ऐकू येत होते. त्यामुळे चांगलाच विनोद निर्माण झाला. हशा पिकला. शेवटी पंडितजींनी काकांना सांगण्याचा नाद सोडून दिला व आपणच सर्व खुलासा करून काकांनी काय गोंधळ निर्माण केला हे समजून सांगितले. काकांचा चेहरा पहाण्यासारखा होता.
 
आम्ही साडेसहाला बैठक सोडून पाच मैलावर असलेल्या 'कस्तुरबा ग्राम' पहाण्यासाठी निघून गेलो. एका सुंदर आंबराईत हे केंद्र वसलेले आहे. श्रीमती सुशीला पै या येथे प्रमुख आहेत. मनपसंत असे हे इथले वातावरण पाहून सर्व दिवसाचा श्रमपरिहार झाला आणि शेवटी रात्री घरी येऊन लिहितो आहे. पुन्हा उद्या सकाळी बैठक आहे. बहुतेक उद्या सर्व काम संपेल आणि परवा दिवसभर आम्ही काय करणार तेच कळत नाही.

इंदोरमध्ये येऊन इंदोरी पातळे पहाण्यासाठी बाजारात गेलोच नाही. बाहेरचे पाहुणे येतात ते जेथे उतरले असतील त्या ठिकाणी तेथील व्यापारी आपला निवडक माल त्यांच्या विक्रेत्यांबरोबर पाठवतात म्हणे! मी उतरलो होतो तेथे असाच एक विक्रेता आला. मी बैठकीला गेलो होतो. त्यामुळे त्या घरातल्याच मंडळींनी त्यांना बरी वाटली अशी साडी माझ्याकरिता खरेदी करून ठेवली. ती साडी त्यांनी माझ्याकडे दिली तेव्हा आश्चर्य वाटले. पण त्यांनी सारा खुलासा केला. मनात म्हटले, ठीक आहे. त्यांचे पैसे देऊन मोकळा झालो. मला वाटते, आयुष्यात स्वत:हून खरेदी केलेली ती एकच साडी!
-यशवंतराव
------------------------------------------------------------

इंदोरची बैठक संपवून १५ सप्टेंबरला ते बडोदा भागात जाण्यासाठी म्हणून रतलामला आले. इंदोरच्या बैठकीचा विषय डोक्यात होताच. ते लिहितात-
-----------------------------------------------------------------

रतलाम स्टेशन
१५ सप्टेंबर १९५२
 
इंदोर सफर पुरी करून बडोद्याला जाण्यासाठी रतलाम स्टेशनवर येऊन पोहोचलो. गाडीला अजून जवळ जवळ तीन तास अवकाश असल्यामुळे या वेळात पत्र लिहिण्याइतके चांगले काम कोणते?
 
कालचा सबंध दिवस ए. आय. सी. सी. चे बैठकीत घालविला. फक्त दुपारचे दोन तीन तास ऑफिसच्या, मुंबईहून आलेल्या कामात घालविला.