विरंगुळा - २४

प्रस्थान ठेविले प्रवासांचे

स्वतंत्र भारताच्या घटनेचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला आणि त्यास अधिकृत मान्यता प्राप्त होऊन भारताची घटना अस्तित्वात आली. या घटनेनुसार देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक सन १९५२ ला झाली. ही निवडणूक जिंकून यशवंतराव पुन्हा आमदार बनले. त्यापूर्वी आमदार असताना त्यांनी पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मुंबईत मंत्रालयात काम केले होते.
 
बॅ. बाळासाहेब खेर यांच्या मुंबई इलाख्यातील पहिल्या मंत्रिमंडळात श्री. मोरारजी देसाई यांच्याकडे गृहखात्याचा कारभार होता. या खात्यातच यशवंतरावांना पार्लमेंटरी सेक्रटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मोरारजींचा विश्वास संपादन करून काही निर्णय स्वतंत्रपणे करण्याइतपत ते वाकबगार बनले. विशेषत: सामान्यांना ज्यामुळे दिलासा मिळेल असे निर्णय त्यांनी प्रामुख्याने केले. शासनाकडून मान्यता प्राप्त करून घेऊन तमाशा या लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. यातूनच नंतर 'तमाशा बोर्ड' अस्तित्वात आले. नागरी संरक्षणासाठी संरक्षणाच्या कामात नागरिकांना सामील करून घेता यावे यासाठी महाराष्ट्रात 'होमगार्ड संघटना' बांधणीचा निर्णय त्यांनी केला. त्यांची प्रशासकीय कामातील कुशलता, पारदर्शीपणा, स्वच्छ कारभार याचा ठसा मोरारजींच्या मनावर उमटला असावा.

१९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. १९४९ मध्ये येथे शेतकरी कामकरी पक्षाची स्थापना झाली. या नवीन पक्षाच्या स्थापनेत दत्ता देशमुख, पी. के. सावंत, भाऊसाहेब राऊत, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव असे मातब्बर राजकीय नेते होते. खेर मंत्रिमंडळाची धोरणे त्यावेळच्या मुंबई इलाख्यातील ग्रामीण जनतेला, बहुजन समाजाला मान्य नव्हती. खेर यांच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न काँग्रेस अंतर्गत एक गट करीत होता. त्याला प्रतिसाद मिळत नाही असे लक्षात येताच याच गटाने पुढाकार घेऊन शे. का. पक्षाची स्थापना केली. यशवंतराव हे ग्रामीण भागातून बहुजन समाजाचे प्रतिनिधी म्हणून राजकारणात आलेले असल्याने या गटाशी प्रारंभी संबंधित होते. राज्यकारभाराच्या धोरणात बदल घडावा यास त्यांची मान्यताही होती. परंतु असा बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला होऊन प्रादेशिक स्वरूपाचा नवा पक्ष निर्माण करणे त्यांना मान्य झाले नाही. त्यामुळे नवीन पक्षस्थापनेच्या कारवाईपासून ते अलिप्त राहिले.
 
१९४८ मधील महात्मा गांधींची हत्या आणि १९४९ ला शे. का. पक्षाचा उदय यातून येथील राजकीय वातावरण गुंतागुंतीचे आणि अस्थिर बनले. काँग्रेस पक्षाला हे मोठे आव्हाण होते. हे आव्हाण स्वीकारूनच निवडणुकीच्या संग्रामात काँग्रेसला मतदारांना सामोरे जावे लागले. या निवडणुकीत भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ अशा अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रचारसभांनी सर्व मतदारासंघ पिंजून काढले तेव्हा कुठे काँग्रेसची सरशी झाली. मोरारजींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. या मंत्रिमंडळात मोरारजींनी यशवंतरावांना मंत्री म्हणून स्थान दिले आणि त्यांच्याकडे पुरवठा खात्याचा कार्यभार दिला.