इतिहासाचे एक पान. ५६

अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यांतली कांही मंडळी मुंबईला गेलेलीच होती. इकडे साता-यांत भाऊसाहेब सोमण, गणपतराव अळतेकर, राधुअण्णा लिमये, आचार्य जावडेकर, शंकराव साठे, गणपतराव तपासे आदि दहा-पंधरा  पुढा-यांना ९ तारखेलाच अटक होऊन त्यांची येरवडा तुरुंगांत रवानगी झाली. यशवंतराव प्रभृति मंडळी कराडला पोंचली की त्या सर्वांना उचलण्याची पोलिसांनी तयारी करून ठेवली होती. सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली होती. पहिल्या रांगेंतल्या नेत्यांना आणि मागोमाग जिल्हा-पातळीवरील पुढा-यांना अटक करण्याचं सत्र सुरू झाल्यानं सर्वत्र हरताळ सुरू झाले. कराडला बाबूराव गोखले यांनी विद्यार्थ्यांसमोर भाषण करतांच त्यांनाहि पकडण्यांत आलं. जिल्ह्यांत सर्वच ठिकाणीं अशांततेचं वातावरण निर्माण झालं आणि पुढील मार्गदर्शनासाठी मुंबईला गेलेली मंडळी कधी परत येतात याकडे सर्वांचं लक्ष खिळून राहिलं.

मुंबईत सातारकर मंडळींचा मात्र वेगळाच व्यूह ठरला. ‘करेंगे या मरेंगे’ हा आदेश मिळाल्यानंतर आपणांला मरावं लागेल एवढाच विचार या नेत्यांच्या समोर होता. पण स्वातंत्र्यासाठी मरतांना ब्रिटिश सत्ता खिळखिळी करून मगच तशी वेळ आल्यास प्राणाची आहुति द्यायची, असं मुंबईच्या बैठकींत ठरवण्यांत आलं. ही बैठक रात्रीं झाली मुंबईतील पान-बाजारांतील एका चाळींत. यशवंतरावांचं तें निवासस्थान होतं. अधिवेशन संपलं आणि धरपकड सुरू होतांच ही बैठक झाली होती. त्या वेळी काशीनाथ देशमुख, के. डी. पाटील, शांताराम इनामदार, तात्यासाहेब कोरे वगैरे ३०० कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकींत असं ठरलं की, आपण स्वत: अटक करून घ्यायची नाही, तुरूंगांत जायचं नाही. बाहेर राहूनच लढत रहायचं. काँग्रेच्या वरिष्ठांकडून जसे आदेश येतील त्याप्रमाणे आपण वागावं, असं यशवंतरावांनी सर्वांना सांगितलं आणि देशांत एकसूत्री चळवळ होत रहावी यासाठी सर्वांनी तें मान्य केलं. पुढच्या कामासाठी जिल्ह्यांत कसं गुप्तपणानं पोंचायचं याचाहि बेत ठरला आणि पुढच्या दोन दिवसांतच मग ही मंडळी जिल्ह्यांत पोंचण्यासाठी मुंबईंतून गुप्तपणें पांगली.

सर्वजण जिल्ह्यांत सुखरूप परतले आहेत अशी खात्री करून घेऊन पुढे दोन दिवसांनी यशवंतरावांनी मुंबईहून परतलेल्या सर्वांची एक बैठक कराडला जमवली आणि या बैठकींत चळवळीच्या कामाचा तात्पुरता आराखडा ठरवला. त्यामध्ये, उघड सत्याग्रह करणारांची एक व भूमिगत होऊन काम करणारांची एक, अशा दोन संघटना बांधण्याचं निश्चित झालं. ही आखणी होतांच सभा-बैठका घेऊन सबंध जिल्ह्यांत ‘चले जाव’ ची हवा निर्माण करण्याचा उद्योग सुरू झाला. सदाशिव पेंढरकर, लक्ष्मणराव कासेगावकर, किसन वीर, डॉ. सोवनी, काशीनाथ देशमुख आदि कार्यकर्ते जिल्ह्यांत होते ते सर्व या मंडळींना येऊन मिळाले, त्याचबरोबर नव्या पिढींतले कार्यकर्ते गोळा झाले आणि हां हां म्हणतां सर्व जिल्हाभर उमद्या कार्यकर्त्यांचा एक नवा संच तयार झाला. कार्यकर्त्यांची या निमित्तानं एक नवी पिढीच तयार झाली.

सर्वत्र सभा सुरू करून वातावरण तयार करण्यांत पहिले पंधरां-वीस दिवस गेले. जाहीरपणानंच सभा होत राहिल्या. यशवंतरावांनी वाई तालुक्यांत कवटें इथे एक सभा घेतली. श्री. किसन वीर हे त्या वेळी हजर होते. या सभेंत भूमिगत अवस्थेंत राहून काय करायचं याचे आराखडे तयार झाले. त्या पहिल्या दोन आठवण्यांत कराड, सातारा, वाई, कोरेगाव, तासगाव, खानापूर, खटाव, पाटण, वाळें, शिराळें अशा सर्व तालुक्यांत मिळून जवळ जवळ दीडशे सभा झाल्या. या सर्व सभांना ग्रामस्थांची चांगली गर्दी असे. चळवळीला हळूहळू उठाव मिळूं लागला. निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या कामांची तयारी, आखणी करत गुप्तपणें हिंडत रहाणं हाच यशवंतरावांचा कार्यक्रम सुरू झाला. ज्येष्ठ नेते तुरुंगात गेले होते. यशवंतरावांसमोरहि निश्चित कार्यक्रम असा नव्हता. पण लोकांमध्ये अमाप उत्साह निर्माण झाला होता. त्यांतूनच मग सत्ता काबीज करण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम सुरू करण्याचं ठरलं. प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीं मामलेदार-कचेरीवर मोर्चा न्यायचा आणि मामलेदार-कचेरीवर झेंडा लावून तिचा ताबा घ्यायचा असा हा कार्यक्रम होता. जनतेनं सत्ता काबीज केली आहे याची प्रचीति सरकारला आणून देणं हा यामागे उद्देश होता. त्यानुसार कराड, पाटण, तासगाव आदि गावातून हजारों लोकांनी संघटित मोर्चे काढले. तासगावला तर मामलेदारांना गांधी-टोपी घालून झेंडावंदन करायला लावलं. वि. स. पागे, डॉ. सोवनी, चिंतोपंत काळे, कृष्णराव क-हाडे, नाना पाटील इत्यादि कार्यकर्ते या मोर्चात होते. तीन हजार शेतकरी, कामगार या मोर्चात मामील झाले. मोर्चातील प्रमुखांची धरपकड करण्यासाठी पोलिसांच्या पलटणी मामलेदार-कचेरीवर सज्ज असत. तिथे झटापट घडतांच, लाठीहल्ले, दगडफेक हे प्रकार घडूं लागले. मामलेदार-कचेरीप्रमाणेच गावोगावीं पाटलांच्या चावडीवरहि झेंडा फडकवण्याची लाट उसळली. ‘चले जाव’, ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणांनी प्रत्येक लहानमोठं गाव त्या काळांत दुमदुमून गेलं.