इतिहासाचे एक पान. २५५

बिचारे पटनाईक! मध्यरात्र होऊन गेली होती. पटनाईकहि मग मुकाटपणे घरी परतले.

यशवंतरावांना तो संपूर्ण आठवडा घाईगडबडीचा घालवावा लागला होता. दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून जाण्याचं जाहीर झाल्यापासूनच, निरोप-समारंभांची गर्दी उडाली होती. महाराष्ट्रांतला नेतृत्वाचा प्रश्र्न मार्गी लावायचा होता. चर्चा, बैठकी, समारंभ सारखे सुरू होते. आता दिल्लीत आल्यापासूनहि अजून त्यांना विश्रांति मिळाली नव्हती. त्यामुळे पटनाईकांना निरोप देतांच पलंगावर ते विश्रांतिसाठी पहुडले.

तो दिवस, आश्र्चर्याचे एकामागून एक धक्के देण्यासाठीच उगवला असावा. संरक्षणमंत्रिपदाची सूत्रं हाती घेण्यासाठी दिल्लीला आलेल्या चव्हाणांना एरवी, पटनाईकसारख्यांनी मुंबईला परतण्याचा सल्ला कशाला दिला असता! दिल्लीला आल्यापासून सुरू झालेल्या घटनांचा विचार करत करत यशवंतराव झोपेच्या आधीन होतात न होतात तोच मध्यरात्रीनंतर फोन खणखणूं लागला. हा फोन आला होता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या बातमीदाराकडून आणि त्याला चव्हाणांशीच बोलायचं होतं.

“एक अतिशय महत्वाची, तितकीच मजेशीर बातमी आहे, अन् ती फक्त मला तुम्हांलाच सांगायची आहे.”

तो बातमीदार फोनवरून बोलत होता.

नव्या संरक्षणमंत्र्यांच्या आगमनाचा मुहूर्त साधून चीनच्या सैनिकांनी आणखी एखादी भयंकर मुसंडी मारली असावी असंच यशवंतरावांच्या मनांत क्षणभर डोकावून गेलं. कांहीशा सचिंतपणानंच त्यांनी या बातमीदाराकडे चौकशी केली अन् बातमीदारानं त्यांना जे ऐकवलं, त्यामुळे तर त्यांना आश्र्चर्याचा धक्काच बसला!

“चीननं युध्दसमाप्ति जाहीर केली आहे अन् तीहि एकतर्फी!”

बातमीदारानं फोनवरून माहिती दिली. दिल्लीला पोचल्यापासून सुरू झालेल्या नाटकाचा हा उच्चांक-बिंदु होता. भरती आणि ओहोटीच्या क्षणाची एकाच वेळी अनुभूति देणारी अशी यशवंतरावांच्या जीवनांतली ती संध्याकाळ ठरली. चीननं एकतर्फी युध्दसमाप्ति केल्याचं पं. नेहरू आणि लालबहाद्दर शास्त्री यांना रात्र उलटून गेल्यावर दुस-या दिवशीच माहिती झालं. तोच हा दिवस, की ज्या दिवशी यशवंतरावांचा संरक्षणमंत्री म्हणून शपथविधि झाला.

नेफा आणि लडाखच्या युध्दभूमीस समक्ष भेट देऊन आणि तिथल्या युध्दोत्तर परिस्थितीची माहिती घेऊनच यशवंतरावांनी आपल्या संरक्षणमंत्रिपदाच्या कारकीर्दीचा शुभारंभ केला. या दोन्ही आघाड्यांना त्यांनी भेट दिली. काश्मीर आणि राजस्थानच्या सरहद्दीच्या भेटीहि त्यांनी लगोलग पूर्ण केल्या. युध्दाच्या आघाडीवर लढणा-या आणि तिथेच वास्तव्य करणा-या जवानांच्या, त्यांच्या अधिका-यांच्या हालअपेष्टा प्रत्यक्षांत पहाव्या आणि मुख्यतः त्यांच्यांत आणि संरक्षण-मंत्रालयांत जवळीक निर्माण करावी, हाच त्यांच्या या भेटीचा प्रमुख उद्देश होता.

या दौ-याच्या वेळी ते जवानांच्या प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी गेले, त्यांच्यांतच बसले, गप्पागोष्टी केल्या आणि त्यांच्यासमवेतच रवाना घेतला. त्या अगोदरच्या कांही घटनांमुळे लष्करी अधिकारी आणि जवान यांच्यांतल्या आत्मविश्र्वासाला कांहीसा तडा गेला होता. त्यांच्यांत कमालीची निराशा पसरली होती. आपला अवमान होत असल्याची भावना लष्कराच्या सर्वच थरांत निर्माण झालेली होती. ही सर्व गोंधळाची परिस्थिति बदलून या सर्वांची हिंमत शाबूत राखण्याचा प्रश्र्न होता.