इतिहासाचे एक पान. १२०

द्वैभाषिकाच्या नव्या मंत्रिमंडळांतून भाऊसाहेब हिरे, विदर्भसिंह मानले जाणारे ब्रिजलाल बियाणी आणि पूर्वीच्या हैदराबाद राज्याचे गृहमंत्री आणि मराठवाड्यांतले एक नेते दिगंबरराव बिंदु यांना ऐनजिनसी वगळून, त्यांनी सा-यांनाच पहिला धक्का दिला. ते तीनहि नेते आपापल्या विभागांतील समर्थ नेते असूनहि त्यांना मंत्रिमंडळांतून वगळून आपल्या स्वत:ळा तिन्ही बाजूंनी त्यांनी ताण लावून घेतले होते. मुख्य मंत्री म्हणून अननुभवी असलेल्या परिस्थितींत सुरूवातीलाच यशवंतरावांनी बेबनाव आणि वाद निर्माण करणारा हा त्रिकोण आपल्याभोवतीं कां निर्माण केला, याचं आकलन सहजासहजीं होणं कठीण ठरलं. या तिन्ही नेत्यांची प्रवृत्ति वेगवेगळी असल्यानं, त्यां वगळल्यामुळे कांही समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्र यांच्यातील समतोल ढासळण्याच धोका होता; परंतु यशवंतरावांनी या सर्वांचं गणित करून त्याचीं उत्तरंहि तयार ठेवल्यानं त्यांच मार्ग निर्धोक बनला.

भाऊसाहेब हिरे हे राजकारणांत स्वयंप्रेरित होते. ब्रिजलाल बियाणी हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आणि मराठवाड्याचे जिल्हे विदर्भांत सामील करून घेऊन स्वतंत्र विदर्भ-राज्य स्थापन करण्याची आकांक्षा बाळगणारे महत्त्वाकांक्षी नेते होते. दिगंबरराव बिंदु हे द्वैभाषिकाच्या प्रारंभापासूनच बाजूला राहिलेले होते. या पार्श्वभूमीवरच यशवतंरावांना मंत्रिमंडळाचा नवा संच एकमुखी, एकजीव असा तयार करायचा होता. महाराष्ट्र आणि गुजरात यांना एकत्रित आणून निर्माण करण्यांत आलेलं द्वैभाषिक प्रामाणिकपणें राबवण्याची त्यांची जिद्द होती. द्वैभाषिकाबाबत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही ठिकाणच्या जनतेची भावना चांगुलपणाची, परस्पर-सहकार्याची, परस्परपूरक अशी राहील आणि आपापल्या विभागाचा विकास साध्य करण्यामध्ये त्यांची मदत होऊन दोघांनाहि आपल्या कला-गुणांचा आणि साहसी प्रयत्नांचा ठसा उमटवतां येईल असं वातावरण निर्माण करण्याचं स्वप्न त्यांच्या मनासमोर होतं. त्या दृष्टीनं धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी व्हायची, तर मंत्रिमंडळाचा एक आवाज राहील अशीच मंत्रिमंडळाची रचना त्यांना अभिप्रेत होती.

भाऊसाहेब हिरे आणि ब्रिजलाल बियाणी यांना मंत्रिमंडळांतून बाजूला ठेवतांना त्यांना दहादा विचार करावा लागलाच असेल. कारण हिरे ज्येष्ठ काँग्रेस-नेते आणि पूर्वीच्या मंत्रिमंडळांतले सहकारी या नात्यानं यशवंतरावांच्या मनांत त्यांच्याविषयी आदराचीच भावना होती. भाऊसाहेबांची राजकीय प्रतिमा डागळली जाऊं नये यासाठी त्यांनी बुद्धिपुरस्सर प्रयत्नहि केले होते. काँग्रेस-पक्षांतील अल्पमत असलेल्या गटाच्या हातचं हिरे जेव्हा बाहुलं बनूं लागेल, त्या वेळीं म्हणजे त्रिराज्याची योजना, द्वैभाषिकाचा पर्याय याच्या हालचाली सुरू असतांनाच चव्हाण यांनी त्यांना वेळोवेळीं इशारा देण्याचं काम केलं. अल्पमताच्या गटांतील मंडळींनी हिरे यांच्याभोवतीं पद्धतशीर जाळं विणण्याचं काम सुरू ठेवलं होतं. विशिष्ट पद्धतीनं सुखासीन जीवन व्यतीत करणा-या व्यक्ति भाऊसाहेब हिरे यांच्याकडे उद्याचे मुख्य मंत्री या भावनेनं पहात होत्या. यशवंतरावांची प्रतिमा उजळ होत आहे असं पाहिल्यानंतर तर या मंडळींनी पत्ते पिसण्यास सुरूवात करून हुकमी डाव टाकण्याचीहि तयारी केली; परंतु तो डाव यशवंतरावांनी उलटवला.

या सर्व प्रकरणामध्ये हिरे यांचा मात्र विशिष्ट मन:पिंड बनला होता. काँग्रेस-पक्षांतील ते तर श्रेष्ठ होतेच, परंतु त्यांचा मंत्रिमंडळांत समावेश करण्याचा प्रसंग निर्माण झाला त्या वेळीं यशवंतरावांनी व्यवहारी विचार केलेला आढळतो. हिरे यांचं सहकार्य तर त्यांना हवंच होतं; परंतु मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा बाळगून पावलं टाकत राहिलेले हिरे, द्वैभाषिकाच्या मंत्रिमंडळांत एक साधे मंत्री म्हणून कितपत रस घेतील, ही शंका यशवंतरावांच्या मनांत निर्माण होणं स्वाभाविक होतं. आपण वयानं मोठे आणि पक्षांतील आपला दर्जाहि मोठा, हा गंड हिरे यांच्या मनांत कायमचाच रहाणारा असल्यानं, मंत्रिमंडळाचा संच एकमुखी बनवण्याच्या कामीं ही परिस्थिति हितकारी ठरूं शकेल काय आणि झालं गेलं विसरून ते एकजीव बनतील काय, हाहि विचार त्यांच्या मनांत उभा राहिला असला पाहिजे. भाऊसाहेब हिरे यांना वगळल्याबद्दल यशवंतरावांने दोष देतांना ही वस्तुस्थिति विसरतां येणार नाही.