अशा प्रकारे समाधीचे सर्व काम भक्कम, कलापूर्ण व अतिशय आकर्षक झाले आहे. समाधीची स्लॅब टाकण्यापूर्वी त्यामध्ये एक 'ताम्रमंजुषा' ठेवलेली आहे. तीमध्ये यशवंतरावांचे साहित्य, त्यांच्यासंबंधीचे ग्रंथ, त्यांची भाषणे, लेख, नियतकालिके, विशेषांक, पत्रे, फोटो, रक्षा आदी वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या ताम्रमंजुषेवर चारही बाजूस त्यांचे जीवनचरित्र, व त्यांचे मौलिक विचार कोरलेले आहेत.
समाधीच्या दक्षिण-पूर्व कोपर्यात ५० बाय २३ फूट या मापाची पक्की इमारत (पर्णकुटी) बांधण्यात आली आहे. त्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च झाला आहे. माजी क्रीडा राज्यमंत्री श्री. शामराव आष्टेकर यांच्या प्रयत्नाने शासनाकडून नगरपालिकेस दीड लाख रुपयांचे अनुदान आमदार फंडातून मंजूर झाले होते. संगमेश्वराच्या मंदिरापासून किल्ल्याच्या पाणदरवाजापर्यंत जाणार्या नियोजित घाटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या घाटाच्या कामासाठी पाच लाख रुपये खर्च झाला आहे.
'यशवंत उद्यान' साडेसात एकर जागेत असून उद्यानाच्या बंदिस्तपणासाठी सर्व बाजूंनी भक्कम असे कंपाऊंड करण्यात आलेले आहे. कोटाच्या दक्षिण भागाकडे छोटीशी रिटेनिंग वॉल बांधण्यात आली आहे. त्यावरच बसण्याची सोय व जागोजागी गॅलरीज करण्यात आल्या आहेत.
उद्यानाच्या प्रमुख प्रवेशद्वाराकडून समाधीकडे जाण्यासाठी १५ फूट रुंदीचा रस्ताही केलेला आहे. त्याच्या दुतर्फा विविध शोभीवंत फुले येणार्या पाच फूट रुंदीच्या फ्लावर बेडस् तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या दोन्ही बाजूस सिल्व्हर ओकची झाडे लावलेली आहे. या रस्त्याच्या दक्षिणेस विस्तीर्ण पटांगणामध्ये अद्ययावत उद्यान तयार करण्यात आले आहे. त्याचे आराखडे पुण्याचे नामवंत गार्डन आर्किटेक्ट जयंत धारप यांनी तयार केले आहेत. त्यामध्ये विशिष्ट आकार असणारे गोलाकार, नागमोडी रस्ते आखण्यात आले आहेत. बाकीच्या संपूर्ण भागामध्ये विस्तीर्ण अशी हिरवळ तयार करण्यात आली आहे. या हिरवळीचा आकार गोलाकार, नागमोडी अशा विशिष्ट प्रकारचा आहे. तसेच झाडाच्या नागमोडी आकाराच्या विविध ओळी विशिष्ट आकारात लावलेल्या आहेत. ही झाडे लावताना विशिष्ट आकार व विशिष्ट ॠतूत फुलांचा बहार असणारी अशी झाडे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये शिरीष, कांचन, बहावा, कौशिया, बॉटल, ब्रश, गुलमोहर, पांगारा, सिंगापूर चेअरी, चिचकारी अशी वैशिष्ट्यपूर्ण झाडे निवडण्यात आली आहेत.
या उद्यानामध्ये विशिष्ट प्रकारची विद्युत प्रकाशाची योजना फिलिप्स या नामवंत कंपनीकडून तयार करून घेण्यात आली आहे. सभोवारच्या सर्व टप्प्यांचे कामही पूर्ण झालेले आहे.
उद्यानाच्या दक्षिण बाजूला पंतकोटाच्या तिरक्या भागावर निलगिरीची झाडे लावलेली आहेत. त्यामुळे तो भाग हिरवी भिंत असल्यासारखा भासतो आहे. उतार संपल्यानंतर रिटेनिंग वॉल व उतारामध्ये विविध फुलांची लहान लहान रोपे लावण्यात आली आहेत. बागेच्या या विस्तीर्ण जागेमध्ये काही ठिकाणी विशिष्ट आकाराचे झगमगते कांरज्यांची योजना केलेली आहे.
उद्यानाच्या एका कोपर्यामध्ये लहान मुलांची अद्ययावत खेळणी बसविण्यात आली आहेत. बागेतील विस्तीर्ण हिरवळ, झाडे, फुलझाडे यांना पाणी देण्यासाठी सर्वत्र पॉप-अपस्पिंक्लर्स बसवून घेण्यात आली आहे. हे स्पिंक्लर्सही विशिष्ट आकाराचे व हिरव्या रंगाच्या हिरवळीमध्ये मिसळून जाणारे आहेत. बटन दाबले की ते जमिनीच्या वर येतात आणि पाणी फवारतात व परत जमिनीत जातात. या विस्तीर्ण उद्यानाच्या पश्चिम बाजूस जुन्या पाणदरवाजातून येणार्या उद्ध्वस्त घाटाच्या जागी काळ्या घडीव दगडाचा नवीन अद्ययावत पद्धतीने घाट बांधण्यात आला आहे. या घाटावर खानापुरी फरशी बसविलेली आहे. याशिवाय हरळीही लावलेली आहे. घाटाच्या पश्चिमेस विविध फुलांची रोपे लावण्यात आलेली आहेत. व टप्प्याटप्याचे फ्लावर बेडस् तयार करण्यात आले आहेत.
कृष्णा-कोयनेचा संगम हा पुरातन कालापासूनचा पवित्र संगम., पण साहेबांच्या या समाधीस्थानामुळे कृष्णाकाठचा हा सारा परिसरच बोलका बनलेला आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. मात्र सभोवतालच्या घनदाट वृक्षांचे सान्निध्य असल्याने समाधीच्या खुल्या दर्शनाने एक प्रकारची दिव्यत्वाची अनुभूती मिळते. म्हणून या संगमास पवित्र प्रयागतीर्थाचे पावित्र्य प्राप्त झालेले आहे. अनेक देशी-परदेशी पर्यटकांना आकर्षणाचे हे केंद्र झाल्याचे समाधान या समाधीस्थान व परिसरामुळे साकारले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. त्यामुळे हा कर्हाडचा एक सांस्कृतिक ठेवाच बनलेला आहे. आपले आत्मचरित्रच (कृष्णाकांठ) कृष्णा-कोयना नद्यांच्या परिसराला समर्पण करणार्या साहेबांचे चित्त येथे गुंतलेले होते. या सगळ्या परिसराच्या स्वाभाविक विकासासाठी ते व्यक्तिश: किती दक्ष होते हे या लेखाच्या प्रारंभी कर्हाडच्या नगराध्यक्षांना त्यांनी पाठविलेल्या व्यक्तिगत पत्रातून दिसून येते. साहेबांचे ते स्वप्न आता पूर्णपणे साकार झालेले आहे.