यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch १९

तुझी साद तुझे आशीर्वाद प्राणांचे दुवे मेळवीत गेले
तुझी साथ तुझे आशीर्वाद घर भरून दिवे लावून गेले.. (ना. धों. महानोर)

यशवंतरावांचा नि माझा दहा वर्षांचा सहवास, तसा थोडा, पण कितीतरी मोठा.  काय लिहावं, किती लिहावं, काही सांगता येईल, काही शब्दांच्या पलीकडलं आहे.  एवढ्या मोठ्या मनाचा, उंचीचा, जीवनाच्या सर्वांगाची समृद्धता-विशालता असलेला माणूस नव्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिणामांचे भान ठेवून देशाच्या, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा ऐश्वर्यसंपन्न, सुजाण शिल्पकार.  सह्याद्रीच्या छातीचा आणि फलराणीतल्या नाजूक, सुगंधी शब्दबंधातला सुसंस्कृत नेता.  शेवटपर्यंत सामान्य माणसातला नेता.  अलवार, कोवळ्या कविहृदयाचा रसिक घरंदाज.

कविता, साहित्य या निमित्तानं आता फक्त थोडं ॠणानुबंधातलं सांगतो.

डिसेंबर १९७४ इचलकरंजी साहित्य संमेलन.

पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वार्‍यावर
गंधभार
भरलेले ओचे
झाडातून लदबदले
बहर कांचनाचे
घन वाजत गाजत ये
थेंब अमृताचे

दोन कविता वाचण्याची मर्यादा कवीला होती.  तीस हजार रसिकांच्या पुढे कोणाचेही काही चालेना.  रसिकांच्या आग्रहाने मी पाच-सहा कविता वाचल्या.  दुसर्‍या दिवशीही वाचल्या.  व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ कवी होते. समोर रसिकांत भाऊसाहेब खांडेकरांपासून माडगूळकर इत्यादी, आणखी यशवंतराव चव्हाण.  मी कविसंमेलन खूप गाजविले होते.

रात्री नऊ वाजता कुमार गंधर्वांचं गाणं होतं.  मंडपाजवळ मला रणजीत देसाई घ्यायला आले.  तेथील मुक्कामावर मला चव्हाणसाहेबांनी बोलाविल्याचं सांगितलं.  माझी त्यांची साधी ओळखही नव्हती.  मी बुजल्यासारखा गेलो.  यशवंतराव चव्हाणांनी जवळ घेऊन मिठी मारली.  कविता, राहणं, उद्योग, घरचं सगळं विचारलं.  हजार वस्तीच्या खेड्यात मी राहतो व घरी कोणीही शिकलेलं नाही हे ते पुन्हा इतरांना सांगत होते.

यशवंतराव त्या वेळी परराष्ट्रमंत्री होते.  त्यांनी कोल्हापूरला जाणं रद्द केलं व रात्री माझी व अनेक कवींची मैफल झाली.  बोरकर, अनिल, पाडगावकर इत्यादी, तसेच दुर्गाताई, पु.ल.देशपांडे, कुरुंदकर इत्यादी मिळून शंभर लोकांमधली कधीही न विसरावी अशी ती मैफल.  त्यांच्या माझ्या ॠणानुबंधाचा हा पहिला धागा.

त्यानंतर बरोबर महिन्याभराने माझ्या जिल्ह्यात एका साखर कारखान्याच्या उद्धाटनासाठी यशवंतराव असले.  सोबत मुख्यमंत्री नाईकसाहेब व मंत्रिमंडळ. मला बोलावून आणायला अगोदरच सांगितलं होतं.

सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाभर फिरले.  परंतु त्यांना चव्हाणसाहेबांनी सांगितलेला तो फार मोठा कवी सापडेना !  समारंभ आटोपल्यानंतर गर्दीत घुसून मी नमस्कारासाठी समोर गेलो तर त्यांनी मला सोडलेच नाही.  आमचे आमदार, खासदार, मंत्री थंडगार झाले.  दोन दिवस फिरून ते थकले होते.

'अहो, हा तर पंचविशीतला पोरगा, पळसखेडचा, हा कुठला थोर कवी वगैरे' आमचे लोक.  माझ्या खेड्यात धावाधाव, जेवणानंतर पुन्हा शेती, घरचं व गप्पा झाल्या.

चव्हाणसाहेबांनी माझ्या कविता समोरच्या रसिकांना पाठ म्हणून दाखविल्या.  नंतर मी म्हटल्या वगैरे.  ही रसिकता, साहित्यप्रेम व माणसावर, कलेवर जीव ओवाळून टाकणं फक्त त्यांच्याजवळंच होतं.