इंदिरा गांधींच्या बरोबर त्यांनी समझोता केला. त्यामुळे सिंडिकेटचे पुढारी त्यांच्यावर नाराज तर झालेच, शिवाय इंदिरा गांधींच्या गोटातही या धरसोडीच्या धोरणामुळे त्यांचे वजन खूप कमी झाले. गृहमंत्री म्हणून त्यांच्या अधिकाराला प्रथम कात्री लावण्यात आली, नंतर त्यांची गृहमंत्रिपदावरून उचलबांगडी करून त्यांना अर्थखाते देण्यात आले. अर्र्थमंत्री म्हणूनही त्यांचे अधिकार मर्यादित होते. आणीबाणीच्या काळात आम्ही तुरुंगात असताना ते परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहात होते. पण यशवंतरावांचा लोकसभेतील ''परफॉर्मन्स'' आता पूर्वीसारखा राहिलेला नव्हता. यशवंतराव निस्तेज होऊ लागलेल्या तार्याप्रमाणे वाटत असत. इंदिरा काँग्रेसचा १९७७ च्या निवडणुकीत पराभव झाला व यशवंतराव विरोधी पक्षनेते बनले. ही नवी भूमिका त्यांना मानवणारी नव्हती. विरोधी पक्ष या नात्याने लक्षात राहण्यासारख्या त्यांनी दोन गोष्टी केल्या आणि या दोन्ही कृत्यांमुळे ते व आम्ही दोघेही संकटात सापडलो. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर ते बोलत असताना आणीबाणीबद्दल मी त्यांना थोडेसे डिवचले. तेव्हा त्यांच्या मुखातून इमर्जम्सी वॉज ऍन अबरेशन (अपकृती) असे प्रसिद्ध उद्गार बाहेर पडले. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध बिघडले. विरोधी पक्षाचे नेते या नात्याने त्यांचे दुसरे कृत्य म्हणजे त्यांनी जुलै १९७९ मध्ये लोकसभेत मांडलेला अविश्वासाचा ठराव. आमच्या पक्षाची स्थिती नाजूक आहे, तुम्ही हा ठराव मांडू नका. ''टाईम बॉम्ब'' आहे असे मी त्यांना आदल्या दिवशी टेलिफोनवर परोपरीने विनवले. पण ते म्हणाले, ''नाही, विरोधी पक्षनेता म्हणून माझे कर्तव्य मला पुरे करायचे आहे.'' सुरुवातीला इंदिरा गांधी देखील या ठरावाच्या बाजूला नव्हत्या. जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी अविश्वासाच्या ठरावाचे हे नाटक यशवंतराव करीत आहेत, असे त्यांचे मत होते. पण सत्य परिस्थिती काय आहे हे मला माहीत होते. त्यामुळे मोठा अनर्थ ओढवला. यशवंतराव चरणसिंगांच्या हंगामी मंत्रिमंडळात उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. पण ही कारकीर्द कोणालाच सुखाची झाली नाही. विरोधी पक्षाच्या तिकिटावर यशवंतराव नव्या लोकसभेवर निवडून आले. पण दोन वर्षांच्या अनुभवामुळे यशवंतरावांनी विरोधी पक्षाचा धसका घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय जीवनाच्या अखेरीस ''स्वगृही'' परत येण्याची इच्छा केली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर यशवंतराव या दुनियेत एक महिना देखील राहिले नाहीत ही नियतीची लीला आहे.
यशवंतरावांच्या राजकीय अपयशाची आणखीही काही कारणे आहेत. एक म्हणजे यशवंतरावांच्या स्वभावातील उणिवांमुळे दिल्लीच्या आपल्या प्रदीर्घ वास्तव्यात त्यांनी भारताच्या विभिन्न प्रांतांत मित्र व अनुयायी निर्माण केले नाहीत. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले. त्याला राष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त होऊ शकले नाही. ठरावीक मंडळींच्या सहवासात ते मोकळेपणाने बोलत, गप्पागोष्टी करीत. मात्र हातचे राखून, मोजूनमापून, जेवढ्यास तेवढेच बोलत. तसेच सत्तेच्या राजकारणात शिकारी कुत्र्याची, संधीचा वास येण्याची उपजत बुद्धी लागते व ती इंदिरा गांधींच्या तुलनेने कमी पडली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट जो निर्भयपणा, निर्दयपणा लागतो त्यात यशवंतराव त्यांच्यावरील बौद्धिक संस्कारामुळे कमी पडले. या सर्व कारणांमुळे त्यांना खाली मान घालून ''स्वगृही'' परतावे लागले.
शिवाय दिल्लीचा राजकीय रंगमंच फारच मोठा आहे. त्याचा आटोप येण्यासच वेळ लागतो. अंगात गुण असून भागत नाही, लोकरंजनाची कलाही लोकशाहीत लागते. या सत्याची प्रचीती घेणारे उत्तम उदाहरण म्हणजे यशवंतरावांचे सत्ताकारणातील अपयश.
यशवंतरावांना संगीत, नाट्य व साहित्य यांत रस होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकरंगी होते. त्यांचे आत्मचरित्र अपुरे राहिले याची खंत वाटते. त्याचा पुढील भाग मनाने राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर जर त्यांनी लिहिला असता तर तो निश्चितच रंगतदार झाला असता, यात शंका नाही.
अशा बहुरंगी व्यक्तित्वाचा अस्त, अखेर हीच दुःखद घटना असते. त्यामुळेच यशवंतरावांचे जाणे मनाला चुटपुट लावते.