यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ८-७

यशवंतराव हे काँग्रेसमध्ये अखिल भारतीय नेतृत्वात चमकू लागले आणि त्याच वेळी चीनचे भारतावर आक्रमण झाले.  त्या युद्धाच्या संदर्भात संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्याविरुद्ध प्रक्षुब्ध वातावरण निर्माण झाले आणि वेळी संरक्षणमंत्री होण्याच्या पात्रतेचा एकच नेता पंडितजींच्या डोळ्यांसमोर आला.  तो नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण हे होत.  वस्तुतः यशवंतरावांना महाराष्ट्र सोडावयाचा नव्हता.  कारण मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर त्यांनी बर्‍याच महत्त्वाकांक्षी योजना आखल्या होत्या, त्या त्यांना आपल्या डोळ्यांसमोर पुर्‍या करावयाच्या होत्या.  साहजिकच त्यांनी नाइलाजाने पंडितजींचे आवाहन स्वीकारले.  काय आश्चर्य पाहा, ते दिल्लीला पोचतात न पोचतात तोच चीनने नेफामधून एकतर्फी माघार घेतली.  यशवंतरावांचा हा पायगुण भारताच्या दृष्टीने संकट निवारणाचा ठरला.  पण त्याबरोबर यशवंतराव अखिल भारतीय आघाडीवर आले एवढेच नव्हे तर जागतिक आघाडीवरही त्यांचे पदार्पण झाले.  कारण त्यानंतर लगेच त्यांना ब्रिटन, अमेरिका, रशिया, जर्मनी या राष्ट्रांबरोबर शस्त्रास्त्रांच्या आयातीविषयी किंवा संभाव्य लष्करी हालचालींविषयी वाटाघाटी कराव्या लागल्या.  यशवंतराव यांचा आत्मविश्वास असा की त्यांनी ही बोलणी अगदी समानतेच्या नात्याने केली.  त्यांनी एक पथ्य पाळले आणि ते म्हणजे पंडितजींशी जमवून घेऊन आपले ध्येयधोरण ठरविण्याचे.  संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर चीनच्या आक्रमणाबद्दल त्यांनी जी चिकित्सा केली ती अशी की हे कम्युनिझमचे या देशावरील आक्रमण होय.  म्हणून या आक्रमणाला विरोध करण्याच्या बाबतीत त्याच पंथाच्या सोव्हिएट युनियनची मदत होणार नाही.  यशवंतरावांच्या या भूमिकेला सोव्हिएट युनियनने दुजोराच दिल्यासारखा होता.  कारण क्रुश्चॉव्ह याने चीनचा बंधुराष्ट्र आणि भारताला मित्रराष्ट्र म्हणून संबोधिले होते.  पण पंडितजींचे मत निराळे पडले.  त्यांना जी गुप्‍त माहिती कळली होती तिच्यावरून त्यांनी असे मत बनविले होते की, चीनचे हे आक्रमण हा चीनचा राष्ट्रवादी आक्रमणाचा पवित्रा होता.  पुढे थाड्याच दिवसांत चीन व सोव्हिएट युनियन यांच्यामध्ये संघर्ष पेटला.  त्यातून पंडितजींच्या निष्कर्षालाच पाठिंबा मिळाला.  यशवंतराव यांनी पंडितजींच्या बाबतीत ही खूणगाठ बांधली की, त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीत अधिक गुप्‍त माहिती उपलब्ध होऊ शकते तेव्हा त्यांच्या मताला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे.  आपले निदान चुकले तर त्यात सुधारणा करण्याचा जो मनाचा मोठेपणा यशवंतराव दाखवीत आले त्यामुळेच दिल्लीच्या कारस्थानाने गजबजलेल्या केंद्रस्थानी यशवंतराव खंबीरपणे पाय रोवून बसू शकले.

राजधानीने आणि त्यातील नेत्यांनीही त्यांचा चांगला मान राखला.  दिल्लीच्या मुक्कामात यशवंतरावांनी संरक्षणानंतर, गृह, अर्थ, परराष्ट्रसंबंध अशी मुख्य मुख्य खाती सांभाळली.  त्यांचा गौरव असा की एकाही खात्याच्या बाबतीत त्यांना कधीही मान खाली घालावयाची वेळ आली नाही.  उलट प्रत्येक वेळी आणीबाणीच्या प्रसंगी पंडितजी, शास्त्रीजी आणि इंदिरा गांधी या तिन्ही प्रधानमंत्र्यांना यशवंतरावांचयावरच सार्‍या नाजूक जबाबदार्‍या सोपवाव्या लागल्या.  यशवंतरावांचे हे कर्तृत्व असाधारणच नव्हे तर अलौकिक मानावे लागेल.  इंदिराजींच्या कारकीर्दीत जेव्हा पार्लमेंट स्ट्रीटवर साधूंनी दंगल उडविली तेव्हा गुलझारीलाल नंदा यांना गृहमंत्रिपद सोडावे लागले.  कारण आणीबाणीची ती परिस्थिती होती.  पण यशवंतरावांकडे ते मंत्रिपद आले आणि त्यांनी गोंधळाची परिस्थिती फार चांगल्या रीतीने हाताळली.  यशवंतरावांचा हा दिल्लीतील वैभवाचा काळ होता.  काँग्रेसमधील श्रेष्ठी म्हणून त्यांची राष्ट्रीय नेत्यांत आधीपासूनच गणना झालेली होती.  मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांनी कामराज आणि बिधनचंद्र रॉय यांच्याबरोबरीने स्थान संपादन केले होते.  त्यानंतरच्या काळात केंद्रातील एक मानधन मंत्री म्हणून राष्ट्रीय व्यासपीठावर ते अधिकच प्रकर्षाने चमकू लागले.  इतके की पंडितजींच्या तसेच शास्त्रीजींच्या निधनानंतर प्रधानमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात यावी याबद्दल त्यांच्याशी खल केल्यावाचून दोन्ही तिन्ही वेळा निवड केली गेली नाही.  यशवंतरावांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी कधीही आपले स्वतःचे प्यादे पुढे सरकविण्याचा प्रयत्‍न केला नाही.  त्यांच्या अपरोक्ष मात्र त्यांचे नाव या ना त्या रीतीने प्रधानमंत्रिपदाच्या रस्सीखेचीत पुढे आणले जातच होते.  

आता राजकारणात हेवेदावे निर्माण होतातच.  यशवंतरावांना इतके मोठेपण प्राप्‍त झाले होते की त्यांना हितशत्रूंचा ताप होणे क्रमप्राप्‍त होते.  यशवंतराव तसे सावध आणि तितकेच अबोल.  पण वावड्या उडविणार्‍या लोकांना आळा कोण घालू शकणार ?  मला आठवते हैदराबाद काँग्रेसमधेच एक वावडी उडविण्यात आली की यशवंतराव आणि सिंडिकेट यांचे साटेलोटे जमले असून सिंडिकेटने त्यांना भावी प्रधानमंत्रिपद देण्याचे आमिष पुढे केले आहे.  या वावड्या हितशत्रूंकडून उडविल्या जात असत.  दुसरे हितशत्रू सत्तास्थानी असलेल्या प्रमुख लोकांमधे कलुषित वातावरण तयार करण्याचा प्रयत्‍न करीत असत.