यशवंतराव हे सत्तास्थानी सहजासहजी स्थानापन्न झाले असे मुळीच नव्हे. त्यांच्यामधे संयम होता तशची सहनशीलताही भरपूर होती. त्यांनी राजकारणात पावलेही संथपणे तशची सावधानतेचे टाकली. काँग्रेसच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला तो स्वयंसेवक म्हणून. स्वातंत्र्यासाठी जे लढे झाले त्यात त्यांनी निष्ठेने भाग घेतला आणि त्यातून त्यांना जे शिक्षण तसाच अनुभव मिळाला तो त्यांनी गाठी बांधला आणि कृपणाप्रमाणे जतन केला. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी लोकसंग्रह केला आणि प्रथम आपल्या जिल्ह्यात स्वतःसाठी स्थान निर्माण केले आणि हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. तसे पाहिले तर यशवंतरावांचे जीवन आर्थिक दृष्टीने गरिबीचे होते. काळे कांबळे जमिनीवर अंथरून त्यावर अंग टाकून झोपलेले मी त्यांना कराडला पाहिले आहे. पण त्यांची जिद्द दांडगी आणि उच्च शिक्षण मिळविण्याचा त्यांचा निर्धारही तसाच पक्का. त्यांनी चळवळीत भाग घेतानाच पद्व्या संपादन केल्या. पण अवांतर वाचनाची सवय तर त्यांच्या अंगी मुरल्यासारखीच झालेली होती. त्यांनी हे जे वाचन केले ते इतिहासाचे, अर्थशास्त्राचे, मार्क्सवादाचे आणि तत्त्वज्ञानाचे वाचन होय. काँग्रेसमधे सखोल वाचन केलेले फारच थोडे लोक दिसून येतील. पण म्हणूनच महाराष्टातच नव्हे तर अखिल भारतीय राजकारणात पाऊल टाकल्यानंतर एक विचारवंत म्हणूनच यशवंतरावांकडे मोठमोठे राजकीय नेतेही पाहू लागले. यशवंतरावांना गुरु लाभले ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे. पुढील काळात शास्त्रीबुवा त्यांचे गुरू झाले तसेच सल्लागारही झाले. शास्त्रीबुवांच्या सहवासात यशवंतरावांनी ज्ञान संपादन केले आणि त्याबरोबर त्यांची ज्ञानलालसाही वाढली आणि मग सत्तेचा उपयोग करण्याची वेळ आली तेव्हा साहित्य संस्कृती मंडळासारख्या संघटना स्थापना करण्याचीही त्यांना स्फूर्ती झाली. यशवंतरावांच्याबद्दल विचार करताना पंडितजींशी असलेले त्यांचे साम्य अधूनमधून डोळ्यांसमोर आल्यावाचून राहात नाही. ही काही तुलना नव्हे, पण गुरुस्थानी मानलेल्या एका युगपुरुषाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा जो यशवंतरावांनी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्याचा मोह मात्र मला आवरता येत नाही. पंडितजींनी आपल्या समोर देशाच्या सर्वांगीण उन्नतीचे चित्र उभे केले होते आणि म्हणून आर्थिक वा शेतीविषयक नियोजनाबरोबर विज्ञान, साहितय, कला आणि खेळ यांनाही उत्तेजन देण्याच्या योजना त्यांनी आखल्या. यशवंतरावांनी महाराष्ट्रात त्याच प्रकारच्या प्रथा रूढ करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे त्यांनी सामान्य जनतेचे जीवन समृद्ध करण्यावर भर दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांना फारच लवकर सोडावे लागले. कारण महाराष्ट्र-स्थापनेचा उत्सव साजरा करताना त्यांनी भाकित केले होते त्याप्रमाणे हिमालयाच्या संरक्षणासाठी त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या सह्याद्रीला उत्तरेकडे धावून जावे लागले. पण मुख्यमंत्री म्हणून थोडक्याच काळात त्यांनी जो ठसा उमटविला होता तो इतका दाट रुजला होता की त्यांनी हाती घेतलेल्या योजना त्यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदावर आरूढ झालेल्या नेत्यांना सिद्धीस नेणे भागच पडले.
यशवंतरावांचा महाराष्ट्रावर जो ठसा उमटला तो प्रत्येक क्षेत्रात चमकून उठल्याशिवाय राहिला नाही. नुसता काँग्रेसचा विचार केला तर महाराष्ट्रातील बहुजनसमाजाची पकड काँग्रेसवर प्रस्थापित करण्याचे श्रेय यशवंतरावांनाच द्यावे लागेल. त्यांनी बहुजनसमाजाला नुसते काँग्रेसमधे नेले नाही. त्यांनी बहुजन समाजाच्या हाती काँग्रेसची सूत्रे सुपूर्द करण्याची कामगिरी पार पाडली. यशवंतरावांची ही कामगिरी ते मुख्यमंत्री झाल्यानंतर काही लोकांच्या डोळ्यांत इतकी सलत गेली की माडखोलकरांच्या सारख्या प्रथितयश साहित्यिकाचे खवचटपणे यशवंतरावांना सवाल केला की ''हे मराठी राज्य आहे की मराठा राज्य आहे.'' खरे म्हटले तर यशवंतराव हे जातीयवादी भावनेपासून कटाक्षाने अलिप्त राहिले होते. पण बहुजनसमाजाचे राज्य म्हटले की बहुसंख्य लोकांना त्यात मानाचे प्रतिनिधत्व मिळणे क्रमप्राप्त आहे हे सांगावयाला नको. यशवंतरावांनी राज्याची जी घडी उभारली ती मात्र सर्वसंग्राहक स्वरूपाची होती. म्हणजे त्यात अठरापगड जातींना समान महत्त्व देण्यात आले होते. त्यांच्या डोळ्यांसमोर जे ध्येय होते ते म्हणजे उभ्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे होय. म्हणून त्यांनी उद्योगधंद्यांच्या स्थापनेला सर्व सोयीसवलती उपलब्ध करून दिल्या आणि त्यात गुजराती, पारशी, सिंधी, मुसलमान यांना प्राधान्य मिळत आहे त्याचे वैषम्य मानले नाही. त्याहीपेक्षा अधिक महत्त्व त्यांनी शेतीविकासाला दिले आणि बहुजनसमाजाला त्यात महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून सहकारी कारखाने, सहकारी बँका, सहकारी वितरण संस्था यांच्या स्थापनेला उत्तेजन दिले. यशवंतरावांनी महाराष्ट्राला अग्रेसरत्व मिळवून दिले ते विकेन्द्रीकरणाच्या प्रक्रियेला खरीखुरी चालना देऊन होय. यशवंतरावांचे भारतीय राजकारणात जे स्थान अढळ झाले आहे ते पंयायती राज्य व जिल्हा परिषदा आणि सहकारी साखर कारखाने यांच्या अलौकिक यशामुळेच होय. या तिन्ही क्षेत्रांत महाराष्ट्र हा आदर्श मानला जात आहे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.