• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ८-४

आता भारतात रॉय यांची ही भूमिका मान्य केली जाणे शक्यच नव्हते.  काँग्रेसच्या नेत्यांना फॅसिझमबद्दल आस्था नव्हती.  उलट गांधीजी आणि त्यांच्यापेक्षा पंडित नेहरू यांना फॅसिझमबद्दल घृणाच वाटत असे.  या घृणेपायी स्पेनमध्ये जेव्हा लोकशाही व फॅसिझम यांच्यामध्ये यादवी युद्ध पेटले तेव्हा पंडितजींनी लोकशाहीवादी स्पॅनिश सरकारच्या मदतीसाठी एक वैद्यकीय पथक स्पेनमध्ये पाठविले होते.  स्पेनचे लोकप्रिय सेनानी ला काबायेरो आणि त्यांना साथ देणारी 'ला पॅशानारिया' म्हणून जगप्रसिद्ध झालेली स्त्री हे दोघेही पंडितजींचे आवडते वीरपुरुष होते.  त्याहीपेक्षा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की फॅसिझमच्या वैभवाच्या काळात जेव्हा पंडितजी युरोपला गेले होते तेव्हा मुसोलिनीचे भेटीचे आमंत्रण त्यांनी झिडकारून दिले होते.  या पठडीतील गांधीजी व पंडितजी या दोघांनाही मनोमन ही इच्छा होती की, हिटलरचा पराभव व्हावा आणि ब्रिटनसहित दोस्त राष्ट्रांचा विजय व्हावा.

पण त्यांना ब्रिटनच्या लोकशाही निष्ठेची कसोटी पाहावयाची होती.  म्हणून गांधीजींनी ब्रिटिश सरकारला ही अट घातली की, भारताचे हार्दिक सहकार्य दोस्त राष्ट्रांना हवे असेल तर भारताला याच वेळी स्वातंत्र्याचे हक्क प्रदान करण्यात यावे.  ब्रिटनकडून या बाबती प्रतिसाद मिळाला नाही, उलट भारतामध्ये दडपशाहीचे राज्य सुरू झाले तेव्हाच गांधीजींनी 'चले जाव' चळवळीचा पुकार केला.  निष्ठावंत काँग्रेसजन म्हणून यशवंतरावांनी या आंदोलनात अटीतटीने भाग घेतला.  विचारात घेण्यासारखा प्रश्न हा आहे की, यशवंतराव जर त्या वेळी रॉयवादी पंथाबरोबर राहिले असते तर त्यांचे पुढे विकसित झालेले सारे राजकीय जीवन त्याच क्षणी उद्ध्वस्त झाले असते आणि रॉयवाद्यांबरोबर तेही राजकीय वनवासात गेले असते.

या प्रसंगी यशवंतरावांनी जी दूरदृष्टी दाखविली तिची फळे कालांतराने महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या राष्ट्राला चाखावयाला मिळाली.  यशवंतरावांनी राष्ट्रीय प्रवाहापासून अलिप्‍त न होण्याचा जो निर्णय घेतला त्यातूनच त्यांचे भवितव्य घडले आणि त्यांच्या अंगचे सारे गुण राष्ट्राच्या उपयोगी पडले.  वर मी म्हटले की निष्ठा आणि त्याग एवढ्या भांडवलावर राज्याच्या कारभाराची धुरा उचलणे शक्य नसते.  त्याच्या जोडीला मुत्सद्दीपणा, लोकसंग्रह करण्याची वृत्ती, राज्यकारभार सांभाळण्याची पात्रता, नवनवीन पायंडे पाडण्याची क्षमता, राष्ट्रीय धोरणात फेरबदल करण्याचे कौशल्य आणि विशेषतः विरोधकांनाही आपल्या ध्येयधोरणात सहभागी व्हावयाला लावणारी समन्वयवादी प्रवृत्ती यांचेही पाठबळ असावयाला पाहिजे.  यशवंतरावांनी या सर्व गुणांचा तर प्रत्यय आणून दिलाच, पण आपल्या ध्येयदृष्टीला व्यवहार्यतेची जोड देऊन एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून कीर्ती संपादन केली.  

अर्थात त्यांचा मार्ग हा निष्कलंक होता असे मुळीच नव्हे.  काट्याकुट्यांतून त्यांना उभा जन्म मार्गक्रमण करावे लागले.  कसोटीचे अनेक प्रसंग त्यांच्यापुढे उभे राहिले.  पण यशवंतराव हे अविचल राहिले याचे मुख्य कारण असे आहे की, त्यांनी नेतृत्वावर जी निष्ठा ठेवली ती प्रगट करताना लोकक्षोभाचीही त्यांनी क्षिती बाळगली नाही.  संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा प्रश्न जेव्हा उभा राहिला तेव्हा यशवंतरावांना अतिशय धैर्यानेच नव्हे तर धीमेपणाने आपले ध्येयधोरण आखावे लागले.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना महाराष्ट्राला हवी होती आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मराठी माणसांना अटीतटीने लढावयाची वेळ आली होती.  त्या वेळी महाराष्ट्रात इतके प्रक्षुब्ध वातावरण तयार झाले होते की, त्या आगीत खुद्द पंडितजींची प्रतिमा जळून जाईल की काय अशी भीती वाटू लागली होती.  पंडितजी हे यशवंतरावांचे दैवतच होते.  त्यांनी परिस्थितीचा अंदाज बांधला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे अंतरंग जळत असतानाही, देशाचे व्यापक हित आणि पंडितजींचे त्यातील स्थान यांचा विचार करून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रक्षुब्ध भावनांची तमा न बाळगता फलटणला भाषण देताना असे उद्‍गार काढले, ''मला संयुक्त महाराष्ट्र हवा आहे, पण संयुक्त महाराष्ट्रापेक्षाही पंडितजींची इभ्रत ही मला अधिक मोलाची वाटते.''  त्या क्षणी यशवंतरावांच्यावर जी आगपाखड सुरू झाली ती सहन करणे त्यांच्याखेरीज दुसर्‍या कोणत्याही नेत्याला शक्य झाले नसते.  यशवंतरावांच्या नेहरूनिष्ठेची त्या क्षणी जी प्रचीती आली तीतूनच कालांतराने पंडितजींचे हृदयपरिवर्तन झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांच्या हातून महाराष्ट्राला सादर केला गेला.  यशवंतरावांच्या स्वभावातील निर्धार, त्यांची सोशिकता आणि त्यांची मुत्सद्देगिरी यांचे जे दर्शन त्या वेळी घडले ते खरोखरीच विचारप्रवर्तक मानावे लागेल.