पण त्या वेळी यशवंतरावांचे राजकीय जीवन नुकतेच सुरू झाले असल्यामुळे गांधी-जवाहरलाल यांच्या राष्ट्रीय तशाच लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेल्या प्रवाहाविरुद्ध उभे राहणे त्यांना श्रेयस्कर वाटले नाही आणि ते रॉयपंथीयांपासून अलग झाले. यशवंतरावांच्या जीवनातील हा पहिलाच महत्त्वाचा निर्णय होता. तो त्यांनी पूर्ण विचारांती घेतला असेल यात शंका नाही. कारण पुढे ज्या ज्या वेळी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले, संघटनेत दुफळी पडली आणि निरनिराळ्या गटांनी काँग्रेसचा त्यागही केला त्या वेळी यशवंतराव कधीही विचलित झाले नाहीत. काँग्रेसच्या अधिष्ठित नेतृत्वाला त्यांनी अव्यभिचारी निष्ठेने पाठिंबा दिला. त्या काळच्या राजकारणाकडे दृष्टिक्षेप टाकावा तर रॉय म्हणा, कम्युनिस्ट म्हणा, काँग्रेस समाजवादी, फॉरवर्ड ब्लॉक, शेतकरी कामगार पक्ष, किसान मजदूर पक्ष, किसान सभा, वगैरे कितीतरी प्रभावी पक्ष व पंथ आपापल्या निरनिराळ्या कार्यक्रमांच्या पायावर देशात उभे राहिलेले दिसून येतील. त्यांचा वाद जसा काँग्रेस व तिच्या नेत्यांशी असे त्याचप्रमाणे परस्परांमध्ये तर त्याहीपेक्षा तीव्र स्वरूपात तो दृग्गोचर होत असे. त्यातून त्यांच्यामध्येही दुफळ्या पडत असत आणि वैयक्तिक हेवेदावे, द्वेष आणि परस्परांवर विषारी हल्ले यांना तर ऊत आलेला दिसून येत असे. काँग्रेस समाजवादी पक्षातच पाहा ना ! जयप्रकाश नारायण एका बाजूला तर डॉ. लोहिया दुसर्या बाजूला आणि अशोक मेहता यांचा तिसराच पंथ अशी चिरफाड झालेली दिसून येते आणि मग समाजवादी पंथाचेही अगदी एकमेकांचे शिरकाण करू पाहणारे पक्षही तयार झाले. त्या पक्षांच्या अनुषंगाने नंतर कामकरी क्षेत्रात, किसानांच्या क्षेत्रात भिन्नभिन्न आघाड्याही स्थापन होणे अपरिहार्य होते. आश्चर्य म्हणजे काँग्रेसचा मोठ्या हिरीरीने त्याग केलेले नेतेही अधूनमधून काँग्रेसमध्ये परत येत असत. त्याचे मात्र मुख्य कारण असे होते की, अनुभवांती या पश्चात्तापदग्ध नेत्यांना कळून येत असे की काँग्रेसच्या बाहेर आपल्याला स्वतंत्र स्थान निर्माण करता आले नाही. या संदर्भातच एका काँग्रेस नेत्याने काँग्रेसचा त्याग करणार्या लोकांना मोठ्या मार्मिकपणे संदेश दिला होता "Depart in haste and repent at leisure" म्हणजे ''घिसाडघाईने सोडून जा आणि मग सावकाश पश्चात्ताप करा.''
यशवंतरावांच्या राजकीय जीवनाचा आलेख पाहिला तर त्यात ते कधीही द्विधाचित्त झालेले दिसून येणार नाहीत. निष्ठा हे त्यांचे राजकीय जीवनातील सामर्थ्य होय. अर्थातच ते कालांतराने ज्या उच्च पदावर चढले तेथे नुसत्या निष्ठेने काम भागण्यासारखे नव्हते. ती निष्ठा स्वातंत्र्याच्या चळवळीत मात्र त्यांना उपयोगी पडली आणि या चळवळीत गांधीजी नेहरू वा सरदार पटेल यांनी जे जे पवित्रे घेतले आणि त्या पवित्र्यांसाठी जो त्याग, कष्ट, यातना, बंदीवास, भूमिगत जीवन या दिव्यातून पार पडण्याचा जो जो त्यांनी संदेश दिला त्याला तोंड देण्याच्या बाबतीत यशवंतरावांनी कधीही माघार घेतली नाही. चळवळींमध्ये निष्ठा आणि त्यागवृत्ती हेच दोन महत्त्वाचे निकष असतात. या निकषांवर आपले अनुयायी कसे व किती प्रमाणात टिकू शकतात हे पाहण्यासाठीच गांधीजींनी १९४२ साली 'चले जाव' चळवळीचा पुकारा करताना 'करा वा मरा' असाच निकराचा संदेश दिला होता. यशवंतरावांनी प्राण पणाला लावून चले जाव चळवळीत भाग घेतला आणि राजकारणात ते तावून सुलाखून बाहेर पडले.
रॉय पंथापासून ते अलग झाले ते त्यांच्या दृष्टीने किती मोलाचे ठरले हे दुसर्या महायुद्धाच्या संदर्भात रॉय व काँग्रेस नेतृत्व यांच्यामध्ये जी मतभेदाची अनुल्लंघनीय दरी निर्माण झाली त्यातून प्रकर्षाने प्रत्ययास आले. दुसर्या महायुद्धाच्या बाबतीत रॉय यांनी अशी भूमिका घेतली की, हे युद्ध दोन साम्राज्यशाह्यांमधील युद्ध नव्हे, हे फॅसिझमविरुद्ध पुकारण्यात आलेले युद्ध आहे. रॉय यांची तत्त्वशुद्ध भूमिका अशी होती की, हिटलर व मुसोलिनी यांच्या फॅसिझमविरुद्ध प्राणपणाने लढणे हे प्रत्येक देशातील प्रत्येक लोकशाहीवाद्याचे कर्तव्य आहे आणि या युद्धात जे जे देश फॅसिझमविरुद्ध उभे ठाकलेले आहेत त्यांना सक्रिय सहकार्य देण्यापेक्षा आपल्यापुढे दुसरा पर्यायच उरलेला नाही, मग ते देश ब्रिटन वा फ्रान्स यांच्यासारखे साम्राज्यवादी देश का असेनात. रॉय यांना फॅसिझमची जी कल्पना होती, त्या तत्त्वज्ञानाबद्दल जी घृणा होती आणि फॅसिझमच्या रूपाने जगावर जे संकट कोसळले होते त्याचे परिणाम किती भयानक होतील त्याची जी जाणीव होती, त्यामुळे त्यांनी निःसंकोचपणाने जाहीर केले की, फॅसिझमचा पराभव करणे हे जगाचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे; आणि ते साध्य करण्यासाठी आपला शत्रू जो ब्रिटन त्याच्याशी सहकार्य करावयालाही आपण मागेपुढे पाहता कामा नये. रॉय यांनी त्याच वेळी दोन भाकिते केली होती. पहिले हे की फॅसिझमचा विजय झाला तर सारे जग काळ्याकुट्ट गुलामगिरीत कायमचे गाडले जाईल. दुसरे भाकित हे की फॅसिझमचा पराभव झाला तर साम्राज्यवादी राष्ट्रांना आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडेल. रॉय यांनी तात्त्वि समस्येच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचे भाकित केले की फॅसिझमचा खरा शत्रू सोव्हिएट युनियन हाच आहे; आणि युरोपखंडावर प्रभुत्व प्रस्थापित केल्यानंतर हिटलर सोव्हिएट युनियनवर हल्ला चढवील. रॉय यांची आकांक्षा जशी फॅसिझमच्या पराभवाने सफल झाली त्याचप्रमाणे त्यांची इतर दोन भाकिते भारत व इतर वसाहतींच्या स्वातंत्र्यातून साकार झाली. त्याचप्रमाणे हिटलरच्या सोव्हिएट युनियनवरील हल्ल्यातून प्रत्ययास आली.