• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ११-१

दिल्लीत परतल्यानंतर मनात विचार केला की यशवंतरावजींना भेटून हे सर्व सांगणे सोपे काम नाही.  म्हणून सर्व निरोप लिहून काढावेत व सादर करावेत.  परंतु व्यावहारिक अडचण अशी होती की यांपैकी बव्हंशी पैलू 'गोपनीय' सदरातील होते म्हणून शेवटी प्रतयक्ष भेट घेऊन सांगणेच इष्ट असे ठरविले.  एका सायंकाळी त्यानुसार आधी वेळ ठरवून यशवंतरावजींना भेटलो.  भेटीअंती सुखद आश्चर्याचा धक्का अनुभवला.  कारण सुमारे चाळीस मिनिटे माझे कथन चालू होते व ते सर्व नव्या संरक्षणमंत्र्याने आत्यंतिक आस्थेने व अधूनमधून काही पूरक प्रश्न विचारीत मोठ्या धैर्याने श्रवण केले !   या प्रदीर्घ भेटीअंती त्यांना जेव्हा मी म्हटले की एवढा आपला वेळ न घेता सर्व लिहूनच सादर करणार होतो तेव्हा त्यांनी मलाच धीर देत आश्वासनपर सांगितले की, नाही; हे सारे आपण नीट स्मरणपूर्वक व नावनिशीवार तपशिलासह कथन केले तेच अधिक श्रेयस्कर झाले.  शब्दांति न करणेच उचित होते !  पराभवानंतरच्या परिस्थितीची गंभीरता व त्या समयी आवश्यक असेली सावधानताच त्यांच्या या धीरगंभीर व्यवहारातून प्रकट झाल्याचा पहिला अनुभव मला लाभला आणि त्यामुळेच त्यांच्या दिल्लीतील संपूर्ण वास्तव्यात आत्यंतिक आत्मीयता व विश्वासाने त्यांचेशी अगदी अनौपचारिकरीत्या आडपडदा न ठेवता 'संवाद साधणे शक्य होत असे.  राजकीयदृष्ट्या अवघड प्रसंगीही यामुळेच त्यांचा तोल जात नसे व 'सर्व विषयी सावधपण' अगदी न कळत प्रकट होत असे.  या सदरातले अनेक अनुभव अनेकांना दिल्लीत लाभलेले असल्याने त्यांपैकी काही ठळक व वेचक प्रसंगांचाच उल्लेख करणे समयोचित ठरेल.  ते केंद्रीय गृहमंत्रिपदी असताना श्रीशंकराचार्यांनी उपोषणास प्रारंभ करून नाजूक अवस्था निर्माण केली असतानाही यशवंतरावजींनी संसदेत व संसदेबाहेर वागण्याबोलण्यात जी सावधानता प्रदर्शित केली होती ती अशची नमूद करण्याजोगी आहे.  तत्कालीन द्वारकापीठाचे श्रीशंकराचार्य यशवंतरावजींच्या जुन्या (द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासूनचे) व घनिष्ठ परिचयाचे होते.  त्यांच्यामार्फत उपोषण करणार्‍या पुरीच्या श्रीशंकराचार्यांशी संधान बांधून उपोषणसमाधी साधावी की काय, अशी व्यूहरचना गृहमंत्री या नात्याने करण्याचा विचार चालू असताना यशवंतरावजींच्या आत्यंतिक विश्वासातले व ज्यांना ते अगदी धाकट्या भावासमान वागवीत असत असे निजी सचिव श्री. श्रीपाद डोंगरे, द्वारकापीठ श्रीशंकराचार्यांना नित्याच्या पद्धतीनुसार अगदी आदरपूर्वक भेटून आले होते.  असे चांगले संबंध व अनुकूल वातावरण असूनही प्रत्यक्ष व्यूहरचनेच्या कार्यवाहीची वेळ येऊन ठेपली तेव्हा यशवंतरावजीनी आपला मनोदय मजजवळ प्रकट केला की 'द्वारकापीठ श्रीशंकराचार्यांशी संपर्क करणेचे काम श्री. डोंगरे यांवर सोपवून चालणार नाही.  श्री. डोंगरे यांनी आपल्या चांगल्या स्वभावाने व व्यवहाराने द्वारकापीठाशी नित्य संपर्क ठेवला असला तरी त्यांचा हा चांगुलपणा राजकीय वाटाघाटींसाठी वा बोलणी करण्यासाठी उपयोगी नाही.  कारण अखेरीस हे राजकारण आहे !  स्वतःवरचे दायित्व दुसर्‍यावर न ढकलण्याचाच उदात्त गुण यातून प्रकर्षाने जाणवत नाही का ?  तिसरा प्रसंगही असाच बोलका आहे.  प्रथम पंतप्रधान श्री. जवाहरलालजींच्या निधनानंतर श्री. लालबहादूर शास्त्रीजींचा द्वितीय पंतप्रधान म्हणून शपथविधी ज्या दिवशी झाला त्याच रात्री यशवंतरावजींना जेव्हा त्यांची प्रतिक्रिया मी विचारली तेव्हा तात्काळ प्रसन्नपणे त्यांनी सांगितले की 'भारताचे भवितव्य शास्त्रीजींच्या हाती सुरक्षित आहे' (The future of country is safe in his hands).  अर्थात ही प्रतिक्रिया प्रकाशनार्थ नसल्याने मी या उद्‍गारांचे स्मरण त्यांनी श्रीमती इंदिराजी पंतप्रधान झाल्या त्या सायंकाळी देऊन पुन्हा यशवंतरावजींची प्रतिक्रिया विचारली.  राजकीय घडामोडींचा वेध घेऊन परिपक्वतेने प्रतिक्रिया व्यक्त करतानाही ते 'सावध' असल्याने त्या वेळी मजजवळ म्हणाले की 'आजच प्रतिक्रिया नको.  काही काळ थांबणेच इष्ट !'  नंतरचा सर्व घटनाक्रम ध्यानी घेता श्री. यशवंतरावजींचे 'सावधपण' किती सार्थ होते याचाच प्रत्यय येत नाही का?