नेत्यावरी निष्ठा ही श्री. यशवंतरावजींच्या लेखी 'नेहरूनिष्ठा' या सदरातच सदा जमा असे. संरक्षणमंत्रिपदी निवड होत असताना ही निष्ठा हा त्यांचा गुण (प्लस पॉईंट) स्वाभाविकच ठरला. परंतु लालबहादुरजींच्या अचानक निधनानंतर हा गुणच दोष ठरून त्यांच्या भवितव्याला आगळी कलाटणी देणारा ठरला. १९६६ च्या जानेवारीत तृतीय पंतप्रधानाची निवड करण्याची धुमश्चक्री चालू असताना श्री. यशवंतरावजींना त्यांचा 'चारुदत्ती' स्वभावच नडला, असे आज निःसंदिग्ध शब्दांत म्हणता येईल. आजपर्यंत हा घटनाक्रम प्रकाशित न होऊ देणे हा पण त्यांच्या चांगुलपणाचाच एक पैलू होता. घटनाक्रम थोडक्यात असा होता की, चार मुख्यमंत्री (सर्व काँग्रेसी) श्री. यशवंतरावजींच्या निवासस्थानी त्या वेळचे महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली घट्टपणे बसून एकच मागणी आग्रहपूर्वक करीत होते की आपणच पंतप्रधानपदाच्या (संसदीय काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या) निवडणुकीसाठी उभे राहणे इष्ट. कारण मोरारजीभाई या पदासाठी उभे राहणारच व त्यांना आपल्याविना अन्य कोणी समर्थपणे टक्कर देऊ शकणार नाही. श्री. वसंतराव नाईक यांनी त्यांचे जे पूर्वीचे (सी.पी. ऍंड बेरार राज्यातील) संबंध पं. द्वारकाप्रसाद मिश्रा यांच्याशी होते ते पणाला लावून त्यांनाही यशवंतरावजींसाठी अनुकूल करून घेतले होते, यामुळे 'एक रेसकोर्स रोड' या निवासस्थानी काही तास जणू असे वातावरण निर्माण झाले की, आत्ता पंतप्रधानपद निर्विवादपणे यशवंतरावजींकडेच येणार. कारण कोणीही काँग्रेसी वरिष्ठ पुढारी त्या क्षणापर्यंत श्रीमती इंदिराजींच्या नावाचा वा उमेदवारीचा विचारही करीत नव्हते. नेमक्या अशा प्रसंगी वर उल्लेण केलेला गुण (नेहरूनिष्ठा) उफाळून येऊन मोठ्या थाटात श्री. यशवंतरावजी नेहरूकन्या श्रीमती इंदिराजींना भेटून त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आणि अवघ्या काही मिनिटांत तेथून परत येऊन तिष्ठत बसलेल्या चार मुख्य मंत्र्यांना सांगते झाले की, श्रीमती इंदिराजी या पदासाठी उमेदवार असून त्यांना माझा पाठिंबा राहणार आहे ! काही मिनिटांत ही कलाटणी का व कशी मिळाली ? याची चिकित्सा करताना दोष परिस्थितीकडे का व्यक्तीकडे, हे सांगणे वा याची चिरफाड करणे या घटकेला सोपे असले तरी त्या काही मिनिटांत जे घडले ते मात्र जणू श्री. यशवंतरावजींच्या जीवनातील (त्यापूर्वी घडलेल्या राजकीय जीवनातील अपघातात) अपघातात भर पडल्यागतच होते ! त्यांनी श्रीमती इंदिराजींची भेट होताच त्यांना वस्तुस्थिती सांगून नम्रपणे (नेहरूकन्या म्हणून) निवेदन केले की, चार मुख्य मंत्र्यांच्या व अन्य सहकारी मित्रांच्या आग्रहानुसार या पदासाठी निवडणुकीसाठी मी उमेदवारी घोषित करण्यापूर्वी आपणांस सांगण्यास आलो आहे. यावर श्रीमती इंदिराजींनी विचारणा केली की मला हे सांगण्याचे कारण काय ? त्यावर श्री. यशवंतरावजींनी त्यांना सांगितले की, एकतर ही घोषणा करण्यापूर्वी आपले समर्थन प्राप्त व्हावे व दुसरे म्हणजे आपण स्वतः उमेदवार नसल्यानेही मी उमदेवार आहे. हे उत्तर ऐकून क्षणार्धातच त्या म्हणाल्या की, तुम्हा मंडळींची इच्छा असेल तर मी उमेदवार आहे ! अर्थात यावर 'नेहरूनिष्ठ' यशवंतरावजींजवळ काहीच उत्तर नसल्याने त्याच पावली ते परतले व निवासस्थानी बसलेल्या मंडळींना मोजक्या शब्दात वरील संवाद सांगून मोकळे झाले ? हा एकून घटनाक्रम वेगवेगळ्या संदर्भात यशवंतरावजींसमोर स्मरण्याचा, त्याला उजाळा देण्यचा, उपक्रम मी करून पाहिला होता. परंतु प्रत्येक वेळी त्यांची याला प्रकाशित करण्याची अनिच्छा असल्यानेच आजपर्यंत कोठेही याचा उल्लेख केलेला नाही. कारण त्यांची अनिच्छा ही चांगुलपणाच्याच पोटी उद्भवलेली होती. आज मात्र त्यांच्या जीवितकार्याचे मूल्यमापन करण्यासाठीच हे सारे अनुभव उपयुक्त ठरावेत म्हणून येथे शब्दांकित करीत आहे कारण भावी पिढीला व एकूण ऐतिहासिक घटनाक्रमाचा अन्वयार्थ लावण्यास त्याचा उपयोग होऊ शकेल.
राजकीय रंगमंचावरील या 'चारुदत्त' व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात आणखी एका ठळक प्रसंगाची नोंद करणे उचित ठरेल. 'जनता' सरकारच्या विरुद्ध म्हणजेच मोरारजी मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा मान इतिहासाने जणू विरोधी पक्ष पुढारी या नात्याने श्री. यशवंतरावजींसाठीच राखून ठेवला होता. (ऐतिहासिक दृष्ट्या या राजकीय घटनाक्रमाला असाधारण महत्त्व आहे) कारण बरोबर या अविश्वास ठरावाच्या सुमारे वीस वर्षापूर्वी मुंबईत (द्वैभाषिक राज्यात) श्री. मोरारजींनीच मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून स्वतःचे अंग काढून घेऊन ऐनवेळी यशवंतरावजींचे नाव या पदासाठी सुचवून त्यांचेवरील आपला 'विश्वास' व्यक्त करून 'हिरे विरुद्ध चव्हाण' लढतीत श्री. यशवंतरावजींचे पारडे जड केले होते. शिवाय, हा अविश्वास ठराव अन्य एका परीने ऐतिहासिक ठरला. कारण तो मांडताना खुद्द श्री. यशवंतरावजींनाही पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती (हा त्यांचा स्वतःचाच अभिप्राय आहे) की यामुळे 'मोरारजी मंत्रिमंडळ' गडगडणार आहे ! परंतु त्यानंतर जे घडले ते अभूतपूर्वच होते. कारण ह्या अविश्वासाच्या ठरावावर मतदान न होताच ते मंत्रिमंडळ (जनता पक्ष फुटल्यामुळे) गडगडले ! अभूतपूर्व म्हणण्याचे अन्य कारण असे आहे की प्रत्यक्ष हे मोरारजी मंत्रिमंडळ गडगडण्यापूर्वी एक अखेरचा प्रयत्न म्हणून खुद्द पंतप्रधान मोरारजीभाईंनीच श्री. यशवंतरावजींना 'खाजगी' निरोप धाडला की 'आपण हातमिळवणी करू शकू तर मंत्रिमंडळ तर टिकेलच पण इतिहासालाही आगळी कलाटणी लाभेल' ! हा निरोप जणू पुरेसा आश्वासक नव्हता असे वाटून मोरारजीभाईंनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी व परराष्ट्रमंत्री श्री. अटलबिहारी वाजपेयी यांस श्री. चव्हाणांच्या भेटीस धाडले, या भेटीत श्री. अटलबिहारीजींनी स्वच्छ शब्दात श्री. चव्हाण यांस आश्वासन दिले की आपण जर श्री. पंतप्रधान मोरारजी देसाई यांचेशी सहकार्य करून, उपपंतप्रधानपद स्वीकारून मंत्रिमंडळाला गडगडण्यापासून वाचविण्यास सिद्ध असाल तर आम्ही (म्हणजेच 'जनता' पक्षातील जनसंघीय खासदार सुमारे नव्वद) मंडिमंडळात सामील न होता आपणांस पूर्ण पाठिंबा देऊ ! 'हा अखेरचा प्रयत्नही विफल ठरून' ते मंत्रिमंडळ गडगडलेच ! अशा प्रकारे इतिहासाला कलाटणी देण्याची संधी प्राप्त झाली असताना प्रांजळपणी व प्रामाणिकपणे चव्हाण यांनी एकच उत्तर दिले की 'माझे व मोरारजींचे वैचारिकदृष्ट्या कसे जमले असते ?' (We are not on the same wavelength) हा सारा ताजा इतिहास असल्याने आधुनिक भांबावलेल्या 'चारुदत्त' ने श्री. मोरारजींना जरी नकार दिला तरी नंतर श्री. चरणसिंगांना 'होकार' देऊन आपल्या स्वतःचे भवितव्य वा विधिलिखित आपल्याच चांगुलपणापायी वेगळ्या दिशेने भरकटू दिले ! आणि तरीसुद्धा सर्वांची सहानुभूती श्री. चव्हाण प्राप्त करू शकले ती केवळ वैयक्तिक चांगल्या व्यवहारामुळे. एकूण काय तर या सहानुभूतीलाही कारुण्याची झालर लागलेली होतीच !