यशवंतराव हे महाराष्ट्राचे आणि भारताचे एक आधुनिक 'नायक' आहेत, हीरो आहेत, याबद्दल कुणाचे दुमत होणार नाही. हीरोची घडण कशी होते हा सनातन कुतूहलाचा विषय आहे. 'हीरो ऍण्ड हीरो-वरशिप' हे कार्लाइलचे पुस्तक प्रसिद्धच आहे. यशवंतराव चव्हाण या हीरोची जडणघडण कशी झाली याचे मनाला विचारांचे खाद्य देणारे दर्शन या पुस्तकात घडते, हे 'कृष्णाकाठ'चे आणखी एक विलोभनीय वैशिष्ट्य आहे. या आपल्या हीरोची, या पुस्तकात प्रकट झालेली एकदोन वैशिष्ट्ये पाहावी.
आपण कोण आहोत, याची जाणीव जसजशी हीरोला होते तसतसा, त्या विरुद्ध गोष्टी तो कटाक्षाने टाळतो. यशवंतरावांनी लहानपणापासून हे केलेले दिसते. व्यायाम, पोहणे, कुस्त्या, तमाशाचे फड, भजनीमंडळे अशा अनेक ओढी त्यांना होत्या. पण स्वतःचा सूर जसजसा सापडत गेला तसतसे त्यांनी हे सारे उद्योग व त्यांचे मोह मनातून दूर केलेले दिसतात. जे या मोहांचे तेच कार्यक्षेत्रांचे. शहर-जिल्हा-राज्य-देश अशी कार्यक्षेत्रांची मर्यादा जसजशी व्यापक होत गेली, तसतसा मर्यादित क्षेत्रांचा विचार त्यांनी मनामागे टाकलेला दिसतो. एकच उदाहरण पाहावे. निष्ठा, कष्ट यांच्या मदतीने त्यांनी कराडची शिवाजी शिक्षण संस्था मोठी केली. पण नंतर ते तीत गुंतले नाहीत. या खंडात या आपल्या संस्थेकरता त्यांनी फक्त एक परिच्छेद दिला आहे.
नायकाचे आणखी एक लक्षण म्हणजे स्वयंभूपणा. स्वयंभू नायक स्वयंपूर्ण असतो. तो दुसर्या कोणास नायक मानत नाही. पुढारी किंवा गुरू म्हणून कोणा एकदोघांचया नावाने गहिवरून येणे हे त्याचेबाबत घडत नाही. 'कृष्णाकाठ' मध्ये यशवंतरावांचे हे स्वयंभूषण अलगद प्रकट झाले आहे. गांधी, नेहरू, तर्कतीर्थ, मानवेन्द्रनाथ रॉय, एसेम अशा काही थोरांचा रास्त गुणगौरव त्यांनी केला आहे. पण या थोरांचे भक्ताने केलेले भजन नाही. एक त्यांच्या मातोश्री सोडल्या-आणि नंतर सौ. वेणूताई- तर त्यांचा कोणीही weak-point नाही. शेणोलीकर मास्तरांच्या, 'तू कोण होणार ?' या प्रश्नाला लहानपणीच यशवंतरावांनी उत्तर दिले होते : 'मी यशवंतराव चव्हाण होणार आहे.'
तसेच ते आज झाले आहेत. 'कृष्णाकाठचे यशवंतराव चव्हाण' एक खरे. नायकात, हीरोत एक अटळ एकटेपणा असतो. 'कृष्णाकाठ' वाचताना सतत जाणवते की लहानपणापासून यशवंतराव तसे एकटेच आहेत. अर्थात असा एकटेपणा ही नायकाची उणीव नसते. ते त्याचे वैभव असते.