यशवंतरावांच्या राजकीय जीवनात सं. म. समितीचा कालखंड महत्त्वाचा ठरला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या मुत्सद्देगिरीला समितीच्या पर्वात उजाळा मिळाला. ''या काळात यशवंतराव मुख्यमंत्रिपदी नसते तर महाराष्ट्रात समितीने काय गोंधळाची परिस्थिती निर्माण केली असती याची कल्पना करवत नाही'', असे उद्गार एका जबाबदार नेत्याने काढले होते ते अगदी खरे होते. यशवंतरावांचा धीरोदात्तपणा, दूरदर्शीपणा, त्यांचा निर्धार, संयम, त्यांना स्वतःला, काँग्रेसला आणि महाराष्ट्राला उपयोगी पडला. चव्हाणांनी योग्य ती पावले उचलली, द्विभाषिक राज्य यशस्वीपणे राबविले, अल्पसंख्य जमातीचा विश्वास संपादन केला, समितीच्या नेत्यांना सांभाळून घेतले म्हणूनच महाराष्ट्राचे नांव देशात राखले गेले. १९५६ ते ६० पर्यंतच्या पांच वर्षांच्या कालखंडात यशवंतराव ज्या पद्धतीने वागले, बोलले. त्यामुळे त्यांचे नेतृत्व व कर्तृत्व फुलले, त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सामोपचाराने, खेळीमेळीने सुटू शकला. १९५७ ची असेंब्लीची निवडणूक यशवंतरावांनी जिंकून दाखविलीच पण त्याचबरोबर लोकसभेची १९५८ मधील केशवराव जेधे यांचे निधन झाल्यामुळे लोकसभेच्या बारामती मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तात्यांचे चिरंजीव गुलाबराव जेधे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय यशवंतरावांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र काँग्रेसने घेतला. या मतदार संघाचे क्षेत्र मोठे होते. जुन्नर, आंबेगाव, खेड, दौंड बारामती असा लांबच्या लांब पट्टा होता. गुलाबराव अगदी नवीन, लोकांशी अपरिचित. तथापि तात्यांची उरलेली टर्म त्यांच्या चिरंजीवांना देण्याचा निर्णय भावनात्मक होता, आणि कार्यकर्त्यांना तो मनोमनी पटलेला होता. यशवंतराव, बाळासाहेब देसाई, बॅ. जी. डी. पाटील आदि मंत्र्यांनी, नेत्यांनी प्रचारासाठी तालुके वाटून घेतले. यशवंतरावांनी अनंतराव पाटलांना बोलावून घेतले आणि एकूण प्रतिक्रिया काय आहे, निवडणूक किती जड जाईल याबद्दल विचारले. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे शेकापचे ऍडव्होकेट वसंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार स्थानिक आणि बारामती, दौंड भागाशी विशेष संबंधित. सौ. शारदाबाई पवार यांचे सुपूत्र आणि एन. डी. पाटलांचे मेहुणे. त्यामुळे पारडे जडच होते. यशवंतरावांनी विचारले, ''काय होईल या निवडणुकीत'' अनंतरावांनी सांगितले, ''केशवरावांच्या नांवाचा आणि कार्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवाय. सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लावायला हवे. कारण समितीचे कार्यकर्ते निवडणूक जिद्दीने लढविणार असून काँग्रेसचा पराभव करण्याची त्यांचीर् ईष्या आहे.''
निवडणुकीच्या प्रचारात सरकारी मोटारीचा वापर करावयाचा नाही, सरकारी यंत्रणेचा वापर वा उपयोग करून घ्यायचा नाही, सरकारी बंगल्यात उतरायचे नाही याची यशवंतरावांनी स्पष्टपणे कल्पना दिली. त्यांनी ही बंधने स्वतःवरही लादून घेतली होती. त्यामुळे यशवंतरावांसाठी अनंतरावांनी त्यांचे एक स्नेही अशोक डहाणूकर यांची खाजगी गाडी आठ-दहा दिवसांसाठी मिळविली. ड्रायव्हिंगला स्वतः अशोक डहाणूकर तयार झाले. चव्हाणसाहेब, त्यांचा अंगरक्षक इन्स्पेक्टर विचारे, अनंतराव पाटील आणि अशोक डहाणूकर असे चौघेजण या गाडीतून दहा दिवस प्रवास करीत होते. एका गांवाहून दुसर्या गांवाला आणि एक सभा संपवून दुसर्या सभेला असा सारखा क्रम चालू होता. यशवंतराव कंटाळायचे नाहीत की थकायचे नाहीत. गाडीत चर्चा आणि अंदाज. एकदा बोलता बोलता चव्हाणसाहेब सहज म्हणाले, ''पवारांच्या घरातील एखादा तरुण मुलगा आपल्याला काँग्रेसमध्ये नाही कां आणता यायचा ?'' अनंतरावांनी झटकन सांगितले की, ''शरद पवार यांच्याबाबतीत प्रयत्न करता येईल. शरदराव पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असून विद्यार्थ्यांत, तरुणांत प्रिय आहेत. त्यांचे संघटनकौशल्य दिसून आले आहे. तरुणांत कामाची त्यांना आवड आहे. युवक काँग्रेसच्या दृष्टीने त्यांचा विचार करता येईल.'' पोटनिवडणुकीचा प्रचार संपला. मतदान झाले. काँग्रेसचे गुलाबराव जेधे चांगल्या मताने निवडून आले. थोड्याच दिवसांनी शरद पवारांनी युवक काँग्रेसच्या कामाची सुत्रे सांभळण्यास सुरुवात केली. चव्हाणसाहेबांचे प्रेम व विश्वास संपादन करून शरदराव एकेक पायरी वरती चढत गेले.