यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूचे होते, विरोधी नव्हते. संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याबाबत समितीपेक्षा त्यांचा मार्ग भिन्न होता. म्हणूनच त्यांनी द्विभाषिकाचा स्वीकार करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. द्विभाषिकाच्या काळातच चव्हाणसाहेबांच्या प्रोत्साहनाने मी ''विशाल सह्याद्रि'' दैनिक सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले. चोवीस वर्षे यशवंतराव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आम्ही ''विशाल सह्याद्रि'' खेडोपाड्यापर्यंत पोहोचवून लोकप्रिय केला. नंतर त्यांच्याच आग्रहामुळे मी दिल्लीला पार्लमेंटमध्ये गेलो. लोकसभेचा सदस्य या नात्याने दिल्लीचे राजकारण, इंदिरा गांधींचे राजकारण, विविध राज्यांचे नेते, वृत्तपत्रे यांच्याशी माझा परिचय झाला आणि सत्तेच्या राजकारणाचा अनुभव पण घेता आला. मा. यशवंतरावांची गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री या पदावरील कामगिरी प्रत्यक्ष पाहता आली. मराठी माणसाला अभिमान वाटेल असेच यशवंतराव वागले आणि बोलले. भारताच्या उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या या मराठी नेत्याची अखेर मात्र त्यांच्या मनाला आणि आमच्यासारख्या चाहत्यांचे मनाला व्यथा देणारी झाली.
एका विरोधी पक्ष नेत्याने यशवंतरावांचे जे वर्णन केले होते ते येथे मुद्दाम उद्धृत करीत आहे. विरोधी असूनही चव्हाणांचा तो चाहता होता. हा नेता एकदा आपल्या भाषणात म्हणाला, ''सुसंस्कृत नेतृत्व, कुशल प्रशासक, अफाट वाचन, कला-क्रीडा प्रेम, संगीत-साहित्याची आवड, लेखन शैली व वक्तृत्व शैली यांचा सुंदर मिलाप कोण्या एका व्यक्तीमध्ये पहावयाला मिळेल असे कोणी विचारले तर मी यशवंतराव यांचा निर्देश करीन. चव्हाणांच्या ठायी कुशाग्र बुद्धिमत्ता आहे, मुत्सद्दीपणा आहे, लोकसंग्रहही दांडगा आहे. एवढे असूनही गरिबांबद्दल कणव आहे, माणुसकीचा गहिवर आहे'' या उद्गारात मला अतिशयोक्ती वाटली नाही की यशवंतरावांची खुशामतखोरी वाटली नाही. यशवंतरावांनी अहंकाराचा वारा कधी लागू दिला नाही, संपत्तीचा मोह कधी बाळगला नाही. कित्येक वर्ष सत्तेत राहूनही भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला यशवंतराव चव्हाणांसारखा नेता विरळाच ! त्यांनी स्वतःचेच मोठेपणाला खतपाणी घातले नाही तर गुणी, हुशार, कर्तृत्वान, कार्यकर्ते जवळ केले, त्यांना संधी देऊन वाढविले, मार्गदर्शन करून मोठे केले. नेतृत्वाची दुसरी तिसरी फळी जाणीवपूर्वक तयार केली.
यशवंतरावांचे सान्निध्यात बरीच वर्षे घालविल्यामुळे, कित्येक घटना-प्रसंग-शिबिरे-चर्चासत्रे-जाहीर सभा आदि कार्यक्रमांना स्वतः जातीने हजर राहिल्यामुळे माझ्या स्वतःच्या नांवाचा उल्लेख कांही ठिकाणी करणे भाग पडले आहे. हा उल्लेख माझा मोठेपणा दर्शविण्यासाठी केलेला नाही. चव्हाणांबरोबर महाराष्ट्रात मी चौदा वर्षे होतो आणि दिल्लीत दहा-बारा वर्षे. काँग्रेस संघटनेत एकत्र होतोच पण त्याचबरोबर विशाल द्विभाषिकात, संयुक्त महाराष्ट्रात अधिक निकट होतो. दिल्लीतील वास्तव्यात यशवंतरावांना जेवढ्या जवळून मी पाहिले, त्यांच्या गुणांचा परिचय करून घेतला. कर्तृत्वाचा अनुभव घेतला, त्यांच्या वाचनाचे, संगीत श्रवणाचे, नाट्यावलोकनाचे वेड पाहिले तेवढे फार थोड्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले असेल. म्हणूनच कांही प्रसंगांचे, घटनांचे उल्लेख करताना मी माझा स्वतःचा उल्लेख टाळू शकलेलो नाही. वाचकांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये.