यशवंतरावजींच्याबद्दल आजपर्यंत जे काही लिहिले गेले आहे, त्यापैकी बरेच वाचून झालेले असल्याने, तसेच प्रत्यक्षात चव्हाणसाहेबांचे सान्निध्य जवळ जवळ चाळीस वर्षे लाभल्याने लेखन करताना मला सुकर वाटले. साहेबांना मी जवळून पाहिलेले, त्यांचे मार्गदर्शन लाभलेले, आणि त्यांच्यापासून खूप शिकायला मिळालेले. त्यामुळे लिहायला खूप हुरुप-उत्साह वाटला, समाधान वाटले. यशवंतरावजींबरोबर काँग्रेस पक्षात काम करताना, पार्लमेंटमध्ये काम करताना कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, पार्लमेंटेरियन कसा असावा, प्रशासक कसा असावा याचे आदर्श उदाहरण पहायला मिळाले. त्याचबरोबर स्नेही कसा असावा, सहकारी कसा असावा, माणूस कसा असावा याचे आगळे दर्शन घडले, आगळा अनुभव मिळाला. पत्रकार या नात्याने १९४५ मध्ये त्यांचा माझा प्रथम परिचय झाला. १९४६ मध्ये ते खेर मंत्रिमंडळात गृहखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी झाल्यावर परिचय वाढत गेला. कालांतराने परिचयाचे रूपांतर स्नेहांत आणि सहकार्यांत झाले. यशवंतरावांनी अगदी धाकट्या भावासारखे मला वागविले हे माझे भाग्य असेच मी मानतो. अनेक वर्षे काँग्रेस संघटनेत पदावर, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्रीपदावर, केंद्र सरकारात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान अशा मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर राहूनही यशवंतराव स्वच्छ राहिले, साधे राहिले, चारित्र्यसंपन्न राहिले, याचा मला खूप अभिमान वाटायचा. त्याचबरोबर त्यांच्या माणुसकीच्या गहिवारांबद्दल कौतुक वाटायचे. एक नेता आणि प्रशासक हा साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी, माणूसप्रेमी असू शकतो हे अगदी विरळच ! यशवंतराव या विरळात उठून दिसणारे होते. 'मी यशवंतराव होणार' असे गुरुजींना शाळेत उत्तर देणारा यशवंता भावी आयुष्यात खरोखर यशवंतराव झाला. गुणवंत, कीर्तीवंत झाला, महाराष्ट्राचा नेता आणि देशाचा रक्षणकर्ता झाला. हे कसे घडले याबद्दल अनेकांना कुतुहल वाटणे स्वाभाविक आहे.
माझ्या सार्वजनिक जीवनात मी अनेक कार्यकर्ते आणि नेते पाहिले, अनेक मंत्री, मुख्यमंत्री पाहिले, अनेक मुत्सद्दी पाहिले, तथापि यशवंतरावजी हे मला सर्वांपेक्षा आगळे-वेगळे वाटले.  गरिबांबद्दल कणव वाटणारा, हरिजन-गिरिजनांबद्दल आत्मीयता वाटणारा, शेतकरी-कष्टकरी-कामगार यांच्याबद्दल आस्था बाळगणारा, कलावंत-लेखक-साहित्यिक-क्रीडापटू यांच्याबद्दल आदर-आपुलकी दाखवणारा, रसिक मनाचा, खंबीर, धैर्यवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान नेता मी प्रथमच पाहिला.  'माणूस' म्हणून यशवंतराव फार मोठे होते.  यशवंताचा 'यशवंतराव चव्हाण' होणार हे शब्द सार्थ करून दाखविणारी ही व्यक्ती महाराष्ट्राला तर ललामभूत ठरलीच पण त्याचबरोबर देशाचे तारु योग्य दिशेने पुढे नेण्यासाठीही ते सहाय्यक ठरले.
यशवंतरावांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाचा 'कृष्णाकांठचा - खूप उपयोग झाला.  १९१३ मधील जन्मापासून १९४६ च्या निवडणुकीतील यशापर्यंतच्या घटनांची नोंद त्यांनी स्वतःच केलेली असल्याने त्या घटनांना अधिकृतपणा प्राप्त झालेला आहे.  कराडचे माजी नगराध्यक्ष पी. डी. पाटील आणि ग्रंथालय व ग्रंथप्रेमी विठ्ठल पाटील यांचेहि लेखनाचे कामी चांगले सहकार्य मिळाले.  विठ्ठल पाटील म्हणजे चव्हाणसाहेबांचा चालता-बोलता इतिहास.  यशवंतरावांबद्दल त्यांना खूप आदर, प्रेम, आस्था.  यशवंतरावांच्या सानिध्यात, स्नेहात जी जी मंडळी आली, सहकारी म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांची यादी करून समक्ष भेटण्याचा व त्यांचे तोंडून घटनांची हकिकत ऐकण्याचा प्रयत्न मी केला.  तथापि अशी माणसे आता बोटावर मोजण्याइतकीच उरली आहेत असे आढळून आले.  सातारा-सांगली-कोल्हापूर-सोलापूर-नगर-जळगांव-धुळे-ठाणे या जिल्ह्यात तसेच मुंबई व दिल्लीस पण जाऊन आलो.  त्यावेळची बरीचशी कार्यकर्ती मंडळी, नेते मंडळी मला ठाऊक होती, परिचित होती.  कारण मी पण १९४२ च्या चळवळीत होतो,  येरवडा तुरुंगात होतो,  काँग्रेस संघटनेत होतो, पार्लमेंटचा सभासद पण होतो.  संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जवळून पाहिलेली असल्याने, घडलेले सारे रामायण माझ्या चांगले स्मरणात राहिले आहे.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			