यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ४६

पुन्हा प्रधानमंत्र्यांची निवड

या वेळी प्रधानमंत्रिपदासाठी इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, जगजीवनराम यांच्या जोडीला यशवंतराव चव्हाणांचेही नाव ठळकपणे पुढे आले.  महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी चव्हाणांचे नाव सुचवले.  यशवंतरावांनी सावधपणे नाईकांना सांगितले, की श्रीमती गांधी मंत्रिमंडळात आहेत.  त्यांच्याभोवती नेहरू घराण्याचे वलय आहे.  संपूर्ण भारतात त्यांची राष्ट्रीय नेत्या अशी प्रतिमा झाली आहे.  त्या उभ्या राहणार नसल्या, तरच निवडणूक लढण्याचा ते स्वतः विचार करतील.  चव्हाणांनी श्रीमती गांधींना स्वतःच विनंती केली आणि ''आपण प्रधानमंत्रिपदासाठी निवडणूक लढवणार असला, तर माझा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे,'' असे सांगितले; पण ''आपण उभ्या राहणार नसाल, तर मग आपण मला पाठिंबा द्यावा,'' असेही सुचवले.  (उद्धृत, द्वा. भ. कर्णिक, पूर्वोक्त, ७९).

चव्हाणांचा पाठिंबा मिळाल्यानंतर श्रीमती गांधी यांची उमेदवारी जवळपास पक्कीच झाली होती.  चव्हाण स्पर्धेतून दूर झाले, तरी मोरारजी होतेच.  'मतसाधारण' सूत्राचा पूर्वानुभव लक्षात घेता या वेळी ते तो मार्ग मान्य करणे शक्यच नव्हते.  खासदारांच्या मतस्वातंत्र्यावर तसे बंधन आणण्याऐवजी खुले मतदान होऊ द्वावे, असा आग्रह त्यांनी धरला.  पण राज्यांचे मुख्यमंत्री मोरारजींच्या विरोधात होते.  त्यांनी आपापल्या राज्यांतील खासदारांवर दडपण आणले.  यशवंतरावांनी याही वेळी मोरारजींचा अपेक्षाभंग केला.  त्यांनी मृदू पण ठाम शब्दांत मोरारजींना सांगितले की,

''तत्वतः मी इंदिरा गांधी यांच्याजवळ आहे.  नेतृत्वाची निवड करताना मतप्रणालीला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मला वाटते.  तुमच्याबद्दल कृतज्ञताभाव ठेवूनही मी तुम्हांला मत देऊ शकणार नाही.'' (उद्धृत, कित्ता, ८२).

कामराज, चव्हाण, जगजीवनराम आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री विरोधात असताना निवडणुकीत मोरारजी निवडून येणे शक्यच नव्हते.  श्रीमती गांधी भारताच्या तिस-या प्रधानमंत्री झाल्या.  उपप्रधानमंत्रिपद व अर्थखाते मोरारजींना देण्यात आले.