यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ४०

शोकांतिकेची कारण-मीमांसा

महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतरावांची सर्वांगीण शोकांतिका झाली आहे, त्यांना सपशेल पराभव पत्करावा लागला आहे आणि त्यांच्या स्वप्नांची परिपूर्ती तर सोडाच; उलट, त्यांना सपशेल अनपेक्षित असलेल्या स्वरूपात १९८५ साली महाराष्ट्राला आपला रौप्यमहोत्सव साजरा करावा लागला आहे, याबद्दल दुमत संभवणार नाही.  

असे का व्हावे ?  या प्रश्नाचे पहिले उत्तर यशवंतरावांना उपलब्ध असलेल्या पक्षरचनेत शोधावे लागते.  त्यांनी रचलेले स्वप्न- आरेखन प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने त्यांच्या पक्षाची रचना मुळीच पोषक नव्हती.  स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही तत्त्वे व परिवर्तन-प्रक्रिया यांच्या फलस्वरूप समाजाच्या नव्या थरांतून या पक्षात भरती झाली असली, तरी पक्षाचा पाया मूलतः गटांच्या आर्थिक व राजकीय आकांक्षा हाच राहिला.  इथला बहुजन-समाज राष्ट्रसभेत आला, तोच मुळी सत्तांतराची शक्यता स्पष्ट दृष्टिक्षेपात आली, त्यानंतरच.  त्यामुळे प्राप्त परिस्थितीचा लाभ आपल्या संख्याबळाच्या जोरावर कसा पदरात पाडून घेता येईल, हेच त्याचे मुख्य व्यवधान राहिले.  व्यापक आणि तत्त्वनिष्ठ राजकारणासाठी लागणा-या ध्येयनिष्ठा, समर्पित वृत्ती आणि सहिष्णुता या नेतृत्व गुणांचा नीट विकास काँग्रेसच्या बांधणीत फारसा झालेलाच नव्हता.  त्यामुळे निश्चित कार्यक्रमाशी स्वतःला बांधून घेऊन कालबद्ध योजना हाती घेण्यापेक्षा गटबाजीचे व संधिसाधूपणाचे सत्ताकांक्षी राजकारण करण्याला अनुकूल असाच काँग्रेस कार्यकर्त्यांचा पिंड घडत गेला होता.  

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, सर्वोदयी गांधीवादी वगैरे गट बाहेर पडल्यानंतर; आणि काँग्रेस हाच एकमेव प्रबळ व संघटित पक्ष असल्याने तोच सत्तेवर राहणार, हे ओळखून नवे व्यवहारचतुर व आपमतलबी गट काँग्रेसमध्ये शिरल्यानंतर कपट-कारस्थाने, गटस्वार्थ व वैयक्तिक हेव्यादाव्यांपलीकडे जाऊन राजकारण करण्याची त्या पक्षाची क्षमताच शिल्लक उरली नव्हती.  पक्षाच्या या मर्यादा लक्षात न घेता चव्हाणांनी कार्यक्रमांची आखणी केली होती.  कार्यक्रम जितके अवास्तव व अव्यवहार्य असतात, तेवढी कार्यकर्त्यांमध्ये ढोंगबाजी शिरण्याची शक्यता वाढते.  यशवंतरावांच्या कार्यक्रमांचे हेच झाले.  तत्त्वतः यशवंतरावांच्या कार्यक्रमांना नकार देणे कुणालाच शक्य नव्हते.  पण ते अमलात आल्यास प्रबळ स्थानिक हितसंबंध अपरिहार्यतः दुखावणार आणि आपला राजकीय पायाच उखडणार, हे पक्षनेत्यांना ठाऊक होते.

संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन सुरू असताना यशवंतराव अमराठी शक्ती व राष्ट्रीय नेते यांच्या बळावर सत्तारूढ होते.  नंतर त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात पक्षाला पाया मिळवून देऊन महाराष्ट्र काँग्रेस जागवली, हे मान्य करीत असतानाच त्यांनी केलेली ही पक्षउभारणी पुरोगामी कार्यक्रमांच्या राबवणुकीसाठी अगदीच कुचकामी होती, हेही लक्षात घ्यायलाच हवे, व्यक्तिगत संबंध, पारंपारिक निष्ठा व सहकारी प्रयत्नातून अर्थलाभ हेच या पक्षसंघटनाचे आधार होते.  यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राच्या सत्तेवर संकलित काँग्रेस पक्ष दृढमूल केला.  त्यासाठी आवश्यक ती सर्व तंत्रे वापरली.  पण कार्यक्रमाधिष्ठित पक्षनेतृत्वाची फळी उभारणे मात्र त्यांना साध्य झाले नाही.  पक्षाचे ध्येय निवडणुकांपुरतेच सीमित राहिल्यामुळे पुरोगामी प्रवृत्तींची व परिवर्तनाग्रही मूल्यांची रुजुवात तो पक्ष करू शकला नाही.