यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३७

संयुक्त महाराष्ट्र समितीने निर्माण केलेल्या मराठी अस्मितेचा आणि त्या अस्मितेच्या ऐतिहासिक प्रतीकांचा पुरेपूर फायदा चव्हाणांनी उचलला.  शिवरायांच्या राज्याभिषेकाशी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठापनेची तुलना अनेक बाजूंनी करण्यात आली.  जणू त्या इतिहासाचे पुनरावर्ततन घडत आहे, असे कुणालाही वाटावे !!  सामान्य शेतक-याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, मराठा ही एक जात नसून पुरोगामी असा जातिसमूह आहे, इत्यादी विधानांमुळे महाराष्ट्र काँग्रेसची डळमळती प्रतिष्ठा सावरण्यास हातभार लागला.  महाराष्ट्रात सुमारे चाळीस टक्के सापेक्षतः एकसंध व सर्वत्र समप्रमाणात असलेल्या मराठा समाजाने काँग्रेस पक्षाला व नव्या राजवटीला आपले मानल्यामुळे त्यांचे बस्तान पक्के बसले.  शिवाजीपासून लोकमान्य टिळकांपर्यंत अखिल भारतीय राजकारणाला महाराष्ट्राने समर्थ नेतृत्व दिले, महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी व परिवर्तनाग्रही राहत आला आहे, विविध वैचारिक प्रवाहांचे बौद्धिम नेतृत्व महाराष्ट्रानेच देशाला बहाल केले आहे - अशी काही मिथके (मिथ्स) चव्हाणांनी प्रभावीपणे या काळात वापरली.  

अर्थात हे करण्यामागे चव्हाणांचा दृष्टिकोन संकुचित प्रादेशिक म्हणता येणार नाही.  त्यांना मराठा राज्य खरोखरच नको होते.  मराठी राज्यच अपेक्षित होते, प्रादेशिक परंपरेचा त्यांचा अभिमान राष्ट्रीय अभिमानाच्या कोंदणात चपखलपणे बसणारा होता, किंबहुना या त्यांच्या समंजस भूमिकेमुळेच यशवंतराव नेहरूंच्या विश्वासास पात्र ठरले होते.  महाराष्ट्राच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा यशवंतराव त्यांना अधिक निष्ठावंत, खंबीर व प्रगल्भ समजूतदार वाटले.  बाष्कळ बडबडीपेक्षा अबोल कृतिशीलतेवर भर देणे, सामदामादी तंत्राचा तारतम्य ओळखून वापर करणे, चोख आणि स्वच्छ कारभारास अग्रक्रम देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय संदर्भ मनात जागृत ठेवून कोणत्याही स्थानिक प्रश्नाचा विचार करणे हे यशवंतरावांचे गुण नेहरूंनी अचूक हेरले होते.

शिवसेना हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून उद्भवलेले विचित्र अपत्य होते.  यशवंतरावांनी शिवसेनेच्या संकुचित प्रादेशिकतेचा नेहमीच धिक्कार केला होता.  ही एक अपायकारक फॅसिस्ट चळवळ आहे, राष्ट्राची मूलभूत कल्पना आणि मानवी मुल्ये यांच्याशी ती विसंवादी आहे, हे आपले मत त्यांनी कधीच लपवून ठेवले नव्हते.  परप्रांतीय हितसंबंधांना व अन्य भाषिक नागरिकांना असुरक्षित वाटू नये, याची त्यांनी खास दक्षताही घेतली होती.

यशवंतरावांची धोरणे, त्यांची मुत्सद्देगिरी आणि ग्रामीण भागात त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक व राजकीय प्रक्रिया यांचा लाभ त्यांच्या पक्षाला १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत मिळणे क्रमप्राप्तच होते.  १९५७ च्या निवडणुकीत डागाळलेली आपल्या पक्षाची प्रतिमा यशवंतरावांच्या धोरणी नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसने पार पुसून टाकली.

मात्र यानंतर फार काळ महाराष्ट्राची धुरा प्रत्यक्षपणे सांभाळण्याची संधी यशवंतरावांना मिळाली नाही.  चीनच्या आक्रमणानंतर नेहरूंनी त्यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले.  तिथून व्यक्तिगतरीत्या चव्हाण एकापेक्षा एक महत्त्वाचे खाते सांभाळीत आपला राजकीय प्रभाव वाढवीत राहिले.  मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा वारसा पुढे चालू राहावा, असे नेतृत्व व परिस्थिती ते टिकवून ठेवू शकले नाही.