जीवनवादी दृष्टिकोन
साहित्यासंबंधी यशवंतरावांचा दृष्टिकोण हा पूर्णपणे जीवनवादी होता. साहित्य हे लोकजीवनातूनच निर्माण होत असते आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साहित्यावर आणि साहित्याचा परिणाम लोकजीवनावर पडतच असतो, याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. साहित्याची व्याख्याच ते अशी करतात, की वैयक्तिक वा सामाजिक मानवी जीवनाच्या कोणत्याही पैलूची भाषेच्या मदतीने केलेली अभिव्यक्ती म्हणजेच साहित्य. त्यात स्वाभाविकच मानव आणि मानवोपयोगी प्रवृत्ती यांचे चित्रण घडते. ते म्हणतात,
''साहित्याचा समाजजीवनासाठी आरशासारखा उपयोग होतो. कारण या साहित्यात सर्वसाधारण लोकांच्या, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक प्रवृत्तीचे प्रतिबिंब सापडते. त्यातच साहित्याच्या उत्पत्तीचे व जनतेच्या अभिव्यक्तीचे रहस्य दडलेले आहे, हे सत्य असे आहे, की ज्याला समस्त मानवी इतिहासाचा पुरावा देता येईल.'' ('ॠणानुबंध' २०२). साहित्य हे त्यांच्या मते 'थर्मामीटरमधील पा-याप्रमाणे संवेदनशील' असले पाहिजे. साहित्यिक मूल्ये आणि सामाजिक- राजकीय मूल्ये त्यांना अविभाज्यच वाटतात. त्यांच्या मते साहित्याची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारीच असली पाहिजे. जे मानवी मूल्ये प्रतीत करते, तेच अक्षरवाङ्मय ठरते. (सह्याद्रीचे वारे, २९४).
कलेसाठी कला हा मुक्त 'स्वतंत्रतावादी' विचार यशवंतरावांना मुळीच मान्य नव्हता. एका संदर्भात ते म्हणतात,
''कुठलाही महाकवी किंवा कवी निव्वळ शब्दांचा जुळारी होऊन कवी होऊ शकत नाही. नादमाधुर्य म्हणजेच काव्य, असे आपणास म्हणता येणार नाही.... निव्वळ नादमाधु-यातूनच निर्माण होणा-या काव्यात जनतेचे मन काबीज करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकत नाही, त्या जुळणा-या सुंदर, नादमधुर शब्दांच्या पाठीमागे एक नवा सामर्थ्यवान संदेश देणारे मन आणि विचार असल्याशिवाय कवी किंवा महाकवी निर्माण होऊ शकत नाही'' (कित्ता, २७४).
शब्दांत लालित्य असावे, पण तो काही साहित्याचा आत्मा नसतो.
विचारांच्या पार्श्वभूमीवर भावविश्वात न्हाऊन निघालेली जिवंत अनुभूती व्यक्त होताना ललित रूपच घेते. मग ती अनुभूती कोणत्याही क्षेत्रातही का असेना !'' असे त्यांचे मत होते.
('ॠणानुबंध', ४).