• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ५९

महाराष्ट्रात समांतर काँग्रेस

मधल्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस-इंदिरा काँग्रेस युतीच्या सरकारातून शरद पवारांनी राजीनामा देऊन समांतर काँग्रेस स्थापन केली.  तिला महाराष्ट्र विधानसभेतील चाळीस आमदारांची साथ होती.  जानेवारी १९७९ मध्ये समांतर काँग्रेसचा मेळावा शरद पवारांनी घेतला.  पवारांच्या या उपक्रमाला यशवंतरावांची मूक संमती आहे, हे उघड गुपित होते.  यशवंतराव व अन्य इंदिराविरोधक यांच्यावर इंदिरा काँग्रेसमध्ये विसर्जित होण्यासाठी येत असलेले दडपण थोपवणे शक्य झाले.  आणि महाराष्ट्रातला हा नवा प्रयोग कोसळू नये, म्हणूनच जुलै १९७९ च्या प्रारंभी देवराज अरस यांनी सर्व काँग्रेसजनाचा जो मेळावा घेतला, त्यास यशवंतराव हजर राहिले नाहीत.  शरद पवारांनी जनता पक्षाशी मैत्री करून महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार मधल्या काळात स्थापन केले होते.  आणि 'आमची काँग्रेस हीच खरी काँग्रेस असून देवराज अरस यांचा प्रयत्न इंदिरा काँग्रेसला जाऊन मिळण्याचा आहे.  त्यांना हवे तर त्यांनीच आम्हाला येऊन मिळावे', असे विधान शरद पवारांनी केले होते.  एवढ्या आत्मविश्वासपूर्वक बोलणारा आणि थोड्याफार का होईना निवडणूक-यशाची खात्री बाळगणारा समांतर काँग्रेस हा एकमेव इंदिराविरोधी गट होता आणि इंदिरा गांधींच्या अधिकारशाहीविरुद्ध सातत्याने स्पष्ट भूमिका तो घेत होता.  यशवंतरावांना हा एवढाच दिलासा होता.  एरव्ही स्वर्णसिंग काँग्रेसचा सर्वत्र-दक्षिण भारतात असोत वा उत्तर भारतात-जिथे जिथे पोटनिवडणुका झाल्या, तिथे पराभवच झाला होता.  राजकीय शक्ती म्हणून हा पक्ष टिकणे असंभव होते.  उलट, इंदिरा काँग्रेसची सर्वत्र सरशी होत होती.

जनता-शासन डळमळीत

जनता पक्षाचे सरकारही आतून फुटलेलेच होते.  समाजवादी गट आणि जनसंघ गट यांच्या कुरबुरी दुहेरी सदस्यत्वाच्या प्रश्नावरून सुरूच होत्या.  चरणसिंग व मोरारजी यांचेही आपसांत फारसे सख्य नव्हते.  इंदिरा गांधींना दूर ठेवून जनता पक्षातील फुटीचा लाभ कसा घेता येईल, याचा विचार यशवंतराव सावधपणे करीत होते.  चरणसिंग अर्थमंत्री होते व त्यांच्या अंदाजपत्रकामुळे देशातील असंतोष वाढला होता.  भाववाढ झाली, संघटित क्षेत्रांत आंदोलने उभी राहिली.  सरकारी अकार्यक्षमता जनतेच्या नजरेस येऊ लागली.  प्रत्येक घटकपक्ष आपापल्या भवितव्याची काळजी वाहू लागला.  जनसंघ व इंदिरा गांधी यांना वगळून काँग्रेसवाल्यांनी एकत्र यावे, असा प्रयत्न काहींनी सुरू केला, तर जनता पक्षात राहिल्यामुळे आपल्या नेतृत्वाच्या पायाखालची वाळू सरकत आहे, हे लक्षात आल्याने चरणसिंग जनता पक्षाच्या चौकटीबाहेर नव्या युतीच्या शोधात निघाले होते.  यशवंतरावांनी हे सर्व पाहिले.

- आणि १९७९ च्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी लोकसभेसमोर जनता सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव ठेवला, नंतरच्या दोन दिवसांतच अनेक खासदार जनता पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडले.  राजनारायण, मधू लिमये, बहुगुणा, वगैरे १०० जणांनी जनता (एस) नावाचा पक्ष स्थापन केला.  जनता पक्षात जे प्रादेशिक व ग्रामीण शेतकरी वर्गांचे प्रतिनिधी होते, ते चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले होते.  स्वर्णसिंग काँग्रेसमध्येही याच वर्गाचे प्राबल्य असल्यामुळे या पक्षाची साथ चरणसिंगांना मिळणार, हे स्पष्ट झाले.  मोरारजींना विरोधी पक्षांपेक्षा स्वपक्षातील बंडखोरांनीच जेरीस आणले.  त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, तरीही पक्षनेतेपद स्वतःकडेच ठेवले.