• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ४

१.  यशवंतराव :  नेतृत्वाची उभारणी

राजकारणात नेते अनेक असतात.  पण ज्यांच्या नेतृत्वाच्या जडणघडणीच्या अनुषंगाने अभ्यास करणे शक्य आणि आवश्यकही असते, असे नेते अपवादात्मकच असतात.  अनुवंश, अपघात वा यदृच्छा आणि कर्तृत्व यांच्या कमी-अधिक युतीतून सामान्यपणे नेतृत्व उदयास येत असते.  अनुवंशाधारे उभे राहिलेले नेतृत्व पुढे जरी कर्तबगारीतून मोठे झाले, तरी नेतृत्व-घडणीच्या दृष्टीने अभ्यासविषय सहसा ठरत नाही, कारण घराण्यात चालत आलेली सत्ता कालक्रमाने त्याच्या हाती आलेली असते.  उमेदवारी, टक्केटोणपे, धडपड वगैरेंमधून नेतृत्वाची पायाभरणी अशा वारसदारीतून नेतेपदी आलेल्या व्यक्तीला करावीच लागत नाही.  अपघातातून किंवा यदृच्छेने नेतृत्वाची संधी ज्यांना आकस्मिकपणे लाभते, त्यांनाही जाणीवपूर्वक आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण किंवा अंगच्या नेतृत्वगुणांची नीट जोपासना करण्याची उसंत मिळाल्याचे दिसत नाही.  एखाद्या चळवळीतून वा आंदोलनातून अचानक प्रकाशझोतात आलेल्या अशा व्यक्तींच्या नेतृत्वाचा उभारणीच्या अंगाने अभ्यास केलाच जाऊ शकत नाही.  सामान्यतः असे पुढारी राजकीय क्षितिजावर जितक्या अनपेक्षितपणे प्रकाशमान होतात, तितक्याच अभावितपणे इतिहासजमाही होतात.  स्वकर्तृत्वावर, प्रतिकूल परिस्थितीशी यशस्वी झुंज देत नेतृत्वाची पायरीपायरीने वाटचाल करीत मोठे होणारे नेतृत्व मागे आपल्या विकासाचा आलेख उभा करीत असते.  

यशवंतरावाच्या नेतृत्वरचनेत अनुवंशाचा भाग जवळपास नव्हताच.  पुढारी निर्माण होण्यासाठी जे कौटुंबिक पर्यावरण पैसा, प्रतिष्ठा, परंपरा वगैरेंच्या स्वरूपात पोषक ठरत असते, ते यशवंतरावांच्या वाट्याला आलेले नव्हते.  अपघात वा यदृच्छा थोड्याफार प्रमाणात त्यांना लाभलेल्या संधीच्या स्वरूपात त्यांच्या नेतृत्वाच्या उभारणीत साह्यकारी ठरली होती.  पण मुख्यत्वे त्यांचे नेतृत्व स्वकष्टार्जित होते.  त्यांनी हेतुपूर्वक आपल्या व्यक्तिमत्वाची पद्धतशीरपणे आकारणी केली होती.  त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाचा विकासक्रम अभ्यासणे शक्य होते.  तो तसा अभ्यासणे आवश्यकही ठरते, कारण एकतर त्या विकासातील काही बलस्थाने व दौर्बल्यस्थाने त्यांच्या राजकीय यशापयशाचे कार्यकारण स्पष्ट करू शकतात; आणि दुसरे अधिक महत्त्वाचे कारण असे, की बहुजनसमाजातून नव्या उमेदीने, नवी ध्येये व आकांक्षा घेऊन पुढे येण्याची धडपड करीत असलेल्या तरुणांना यशवंतरावांच्या नेतृत्वाच्या उभारणीतून बरेच काही शिकायला मिळू शकते.