दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने
१९८५ अखेर प्रकाशित झालेल्या प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे महाराष्ट्रातील विचक्षण वाचकांनी फार चांगले स्वागत केले आणि यथावकाश त्याची पहिली आवृत्ती संपली. त्यानंतरही या पुस्तकाला वाचकांकडून मागणी सुरूच होती. दुसरी आवृत्ती काढावी अशा सूचनाही महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मिळत होत्या. त्यानुसार आज ही दुसरी आवृत्ती आम्ही सर्व संबंधितांच्या हाती सोपवत आहोत.
ही आवृत्ती तयार करताना पहिल्या आवृत्तीतील मजकुराचे जसेच्या तसे पुनर्मुद्रण न करता त्याच्या जोडीला एका नव्या प्रदीर्घ प्रकरणाची जोड दिली आहे. पहिल्या आवृत्तीतील लेखनाला यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाची ताजी पार्श्वभूमी होती, त्यामुळे ते लेखन प्रयत्न करूनही पूर्वग्रहानुकूल, भावनिक आणि काहीसे तात्कालिक होणे टाळता आले नव्हते. आज यशवंतरावांच्या निधनाला वीस वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांच्या राजकीय कार्याचे व निर्णयांचे अधिक तटस्थ व साक्षेपी मूल्यांकन करणे आज तुलनेने सोपे झाले आहे. त्यांनी काहीएका ध्येयवादाने सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे पुढे काय झाले हेही तपासणे आवश्यक वाटले. त्यामुळे या आवृत्तीत 'यशवंतरावांनंतरचा महाराष्ट्र' असे एक नवे प्रकरण समाविष्ट केले आहे. यशवंतरावांनी केलेली काँग्रेसची पक्षबांधणी, सहकार, शिक्षण व लोकशाही विकेंद्रीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी जाणीवपूर्वक सुरू केलेले काही प्रयोग, महाराष्ट्राच्या भाषिक, भावनिक व प्रादेशिक एकात्मतेची त्यांनी केलेली पायाभरणी, मराठी भाषा व संस्कृती यांच्या समृद्धीचे त्यांनी केलेले डोळस प्रयत्न या सर्वच गोष्टींचे गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांत काय झाले आणि जे काही झाले त्याची संभाव्य कारणे कोणती व परिणाम काय झाले याचा शोध या नव्या प्रकरणात घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने अतिथी प्राध्यापक म्हणून बोलावल्यामुळे अभ्यास व लेखन यासाठी लागणारी सवड लाभली आणि हे दीर्घकाळ रेंगाळलेले काम मी पूर्ण करू शकलो; याबद्दल सर्व संबंधितांचे आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो.
प्रकाशकापेक्षा मित्र म्हणूनच जवळचे असलेले रा. बाबा भांड आणि 'साकेत' मधील त्यांचे सहकारी यांचा मी आभारी आहे.
लेखक
औरंगाबाद
१० एप्रिल ०४