मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे नेतृत्व मराठी जनसामान्यांपासून दुरावलेले असल्यामुळे आणि त्यांचा कारभारही अभिजनहितैषी (एलीटिस्ट) व भांडवलदार-धार्जिणा ठरल्यामुळे जेधेंच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र काँग्रेस असंतुष्ट होती. गुजराती व्यापा-यांसाठी ही राजवट म्हणजे पर्वणीच होती. ग्रामीण शेतकरी समाजाला न्याय वा दिलासा तिच्याकडून मिळण्याची शक्यताच नव्हती. मंत्रिमंडळाच्या या लोकहितविरोधी व गैरलोकशाही राजकारणावर जनतेच्या दृष्टीने अधिक प्रभावी दडपण आणण्याच्या हेतूने ज्या समविचारी आमदारांनी व कार्यकर्त्यांनी संघटित करण्याचे मनसुबे आखले, त्यांत केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव प्रभृती मुख्य होते. यशवंतराव चव्हाणही काही काळ त्यांच्यासोबत होते. परंतु या बहुजन-समाजवादी गटाला जेव्हा काँग्रेसबाहेर पडणे अपरिहार्य झाले, त्या वेळी चव्हाणांनी पाय मागे घेतला होता. समाजवादी गटही त्याच सुमारास काँग्रेस सोडून गेला. त्याच्याशी वैचारिक जवळीक असूनही चव्हाण त्यांच्यासोबत बाहेर पडले नाहीत.
चव्हाणांच्या या वर्तनाचा अन्वय राजकीय भाष्यकारांनी आपापल्या धारणांप्रमाणे लावला आहे. शेकापच्या नेत्यांचे खेर मंत्रिमंडळाविरुद्धचे आक्षेप चव्हाणांना मान्य होते; पण काँग्रेस-श्रेष्ठींशी लढा देण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे शेकापच्या प्राथमिक निर्मिती-प्रक्रियेत ते सहभागी झाले असले, तरी पुढे त्यांनी माघार घेतली, याची वेगवेगळी कारणे सांगितली गेली आहेत. सत्यशोधक चळवळीपेक्षा किंवा पत्री सरकार आंदोलनापेक्षा त्यांचा कल नेहमीच व्यापक राष्ट्रीय प्रश्नांकडे व पक्षाकडे राहिला असल्याचे सांगून चव्हाणांच्या परावृत्तीचे समर्थन त्यांच्या काही चरित्रकारांनी केले आहे. खेर यांच्या कार्यपद्धतीत बदल घडवायचा, तर ते काँग्रेसमध्ये राहूनच शक्य होईल, नवा पक्ष प्रादेशिक व जातीय आहे, तर काँग्रेस अखिल भारतीय पक्ष असून तिला नेहरूंचे समाजवादी नेतृत्व लाभले आहे; या मुख्य प्रवाहापासून आपण फुटू नये, असा विचार यशवंतरावांनी केल्याचे त्यांचे एक चरित्रकार सांगतात (रामभाऊ जोशी, 'यशवंतराव- इतिहासाचे एक पान,' ९६); तर वेगळा पक्ष काढल्यास राष्ट्राचे तसेच खुद्द बहुजनसमाजाचेही नुकसान होईल, अशी चव्हाणांची खात्री होती, (बाबुराव काळे, 'यशवंतराव चव्हाण', १२४), असे त्यांच्या दुस-या चरित्रकाराचे म्हणणे आहे. शेकापच्या पुढा-यांसह अनेकांना मात्र असे वाटते, की जेधे-मोरे-जाधव प्रभृती बहुजन-समाजाचे दिग्गज काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नेतृत्वाची तिथे जी पोकळी निर्माण होईल; आणि शेकाप-निर्मितीच्या हाद-यामुळे सावध झालेल्या काँग्रेस-श्रेष्ठींना ती पोकळी बहुजन-समाजाच्या पुढा-यांना हाताशी धरून भरून काढण्याची जी निकड भासेल, ती आपल्या पथ्यावर पडेल, अशा विचारानेच चव्हाणांनी इरादा बदलला असावा.
समाजवादी व शेकाप या दोन पक्षांचे काँग्रेसमधून बहिर्गमन, गांधी-हत्येतून उफाळलेला जातीय तणावांचा वणवा आणि प्रस्थापित काँग्रेस नेतृत्वाचे थिटेपण यामुळे महाराष्ट्र काँग्रेस अक्षरशः गलितगात्र झाली होती. ३० मार्च १९४८ रोजी यशवंतरावांच्या सूचनेवरून त्र्यं. र. देवगिरीकर यांनी मुंबई येथे तांबे आरोग्य भवनात मराठी काँग्रेसजनांची एक बैठक घेतली. आमदार व कार्यकर्ते मिळून एकाहत्तर जणांची उपस्थिती असलेल्या या बैठकीने नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी काँग्रेसने एकात्म व संघटित राहण्याचे आव्हानपत्रक प्रसृत केलेले होते. हे पत्रक यशवंतरावांच्या राज्यपातळीवरील नेतृत्वोदयाचे प्रतीक ठरले. या पत्रकास अन्य काँग्रेसजनांचा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी या बैठकीने यशवंतरावांवर सोपवली होती, असे द्वा. भ. कर्णिक म्हणतात ('यशवंतराव चव्हाण : ए पोलिटिकल बायॉग्राफी,' ३५). या बैठकीतूनच यशवंतरावांनी समविचारी साथीदारांची फळी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उभारली. जेध्यांनी काँग्रेसत्याग केल्यानंतर भाऊसाहेब हिरे महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष झाले. यशवंतरावांना प्रांतसचिवपद मिळाले. संसदीय सचिवपदावरून त्यांनी घेतलेली ही फार मोठी झेप होती. पक्षातले त्यांचे स्थान एकदम उंचावले. प्रांताध्यक्ष भाऊसाहेब हिरे व प्रांतसचिव चव्हाण हे दोघेही ग्रामीण जनतेतून आलेले राष्ट्रवादी नेते म्हणून सर्वांसमोर आले होते.