सत्ताकारणात प्रवेश
१९४६ च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्यानंतर राज्याराज्यांत काँग्रेसची अंतरिम सरकारे सत्तेवर आली. महाराष्ट्रात बाळासाहेब खेर मुख्यमंत्री होते. त्यांनी यशवंतरावांना संसदीय सचिव म्हणून घ्यायचे ठरवले. गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या खात्यात ते संसदीय सचिव झाले. महाराष्ट्राच्या भावी राजकारणाच्या दृष्टीने यशवंतराव व मोरारजी यांचे या टप्प्यावर घडून आलेले हे साहचर्य फारच परिणामगर्भ ठरले. या नेमणुकीतून चव्हाणांचे कार्यक्षेत्र विस्तारले, कार्यक्षम प्रशासनाचे पाठ त्यांना मोरारजींकडून मिळाले, आणि मोरारजींचा त्यांनी संपादिलेला विश्वास त्यांना पुढे दीर्घकाळ उपयुक्त ठरला. हे तर झालेच; पण गुजरात विरुद्ध महाराष्ट्र या स्पर्धेत महाराष्ट्राची बाजू बरीचशी कच्ची होण्यासाठीही ही युती पुढे कारणीभूत ठरलेली आहे, हे नाकारण्यात हशील नाही. आज मुंबई महाराष्ट्रात असली, तरी मराठी नाही, याची कारणमीमांसा थेट या दोन व्यक्तींच्या त्या साहच-यापर्यंत जाऊन पोचते. वस्तुतः यशवंतराव आणि मोरारजी यांचे राजकीय पार्श्वभूमी, नेतृत्वबांधणी, वैचारिक ठेवण वा सामाजिक-आर्थिक दृष्टिकोन यांपैकी कोणत्याही बाबतीत साधर्म्य नव्हते. तरीही चव्हाणांनी दीर्घकाळ सरकारी कामकाजात मोरारजींना एकनिष्ठ पाठिंबा दिला, याचे अनेक दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाले आहेत.
तसे पाहिल्यास गांधीजींचे नेतृत्व प्रभावी झाल्यापासूनच गुजराती मंडळी काँग्रेसच्या राजकारणात आघाडीला आली होती. काँग्रेसला पैसा पुरवून त्यांनी ती संघटना वेठीस धरायला सुरुवात केलीच होती. अ. भा. काँ. क. साठी मुंबईची गुजराती मंडळी निवडून येत असे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या कारभारात ती हस्तक्षेप करीत असे. मुंबई प्रदेश काँग्रेस तर त्यांची बटीकच झाली होती.
''पुढे (स. का.) पाटलांचा मुखवटा व मागे गुजराती भांडवलवाले हे तिचे स्वरूप १९३५ नंतर स्पष्ट दिसू लागले.... मुंबईच्या महाराष्ट्रीय मंडळीत मग एक न्यूनगंड उत्पन्न झाला. कॉर्पोरेशनमध्ये.... काँग्रेस पक्ष बहुसंख्य व त्यात महाराष्ट्रीय अल्पसंख्य. परिणामी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रीय प्रश्न हेटाळले, त्यांबाबत तो उदासीन होता. पण अधिक आश्चर्य म्हणजे त्याने भ्रष्टाचार व भांडवलवाले यांचे प्रस्थ वाढविले.'' ('पथिक'-२, : ५२७) अशा शब्दांत न. वि. गाडगीळ यांनी गुजराती वर्चस्वाचे दुष्परिणाम सांगितले आहेत.
दुस-या महायुद्धाच्या काळात गैरमराठी लोकांची प्रचंड प्रमाणावर आवक मुंबईत झाली होती, मराठी माणसांची प्रत्येक क्षेत्रातून हकालपट्टी झाली होती. त्यांना सर्व राजकीय व सार्वजनिक क्षेत्रांतून ढकलण्याचे कार्य महाराष्ट्र द्रोही काँग्रेसवालेच मुख्यत्वे करीत होते.