प्रत्यक्ष चळवळीत
वारणेच्या काठी शिराळे पेट्यातील बिळाशी या गावी एक अभिनव प्रकार घडून आला. मोठ्या प्रमाणावर जंगल-सत्याग्रह होऊन एका परीने त्या भागातील ब्रिटिश सरकारचा अंमल संपला. सरकारने त्यास बंड ठरवले, तरी तो जनतेने पुकारलेला शांततामय असहकार होता. पाटील-तलाठ्यांना लोकांचे सहकार्य मिळेना, म्हणून त्यांनी राजीनामे दिले होते. 'जन-आंदोलनातून एकदा का ही नवी शक्ती निर्माण केली व सरकारला असलेल्या सहकार्याचा हात काढून घेतला, की राज्य कोलमडू शकते,' या गांधीजींच्या असहकार मूलमंत्राचे प्रात्यक्षिकच जणू बिळाशी प्रयोगातून यशवंतराव व त्यांचे सहकारी यांना पाहायला मिळाले ('कृष्णाकाठ,' : ७५) सरकारने दडपशाही सुरू केली. सरकारी अत्याचाराने चिडलेल्या लोकांना यशवंतरावांनी भूमिगतरीत्या भेटून धीर दिला. पोलिसी नजरा चुकवून भाषणे दिली. जिल्ह्यातील अन्यत्र चालू असलेल्या चळवळींची माहिती सांगून त्यांचा हुरूप वाढवला.
१९३२-३३ साली कारावासात केलेला अभ्यास, घडलेला विचारवंतांचा सहवास, डाव्या विचारसरणीबद्दल मनात असलेल्या अकर्षणाला लाभलेली वैचारिक स्पष्टता, मानवेंद्रनाथव रॉय यांच्या विचारांचा जवळून परिचय, इत्यादी संस्कारामुळे स्वतः यशवंतराव आणि त्यांच्या भोवताली जमलेला सातारा जिल्हा काँग्रेसमधील तरुणांचा गट पुरोगामी आकांक्षांनी प्रेरित झाला होता. प्रांतिक पातळीवरच्या व मध्यवर्ती नेत्यांना हा पुरोगामी दृष्टिकोन मान्य होणे शक्यच नव्हते. त्यांनी भाऊसाहेब सोमण व बुवा गोसावी यांच्याकरवी जिल्हा काँग्रेसमध्ये उजव्या गटाचे बहुमत घडवून पुढारीपणाची सूत्रे 'जैसे थे' वादी शक्तींच्या हाती सोपवली होती. १९३७ च्या निवडणुकीच्या वेळी या दोन प्रवाहांमधील संघर्ष अटळ ठरला.
या काळात प्रांतिक पक्षनेतृत्वाच्या जागी तशी पोकळीच होती. यशवंतरावांनी पुढील शब्दांत तत्कालीन स्थितीचे विश्लेषण केले होते :
''प्रांताच्या पातळीवर गांधींचा विचार न स्वीकारलेले जुने पुणेकर नाममात्र काँग्रेस पुढारी होते, त्यांनी अजून व्यवहार्यतः काँग्रेस सोडलेली नाही, पण त्यांचा काँग्रेसच्या जनआंदोलनावर विश्वास नाही... गांधीजींचे नेतृत्व मानणारे शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ यांचे नेतृत्व अजून निःशंकपणे प्रस्थापित व्हावयाचे आहे... त्यांची अजूनही नेतृत्व-संघटनेच्या दृष्टीने जिल्ह्याजिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची साखळी निर्माण झाली नाही....'' ('कृष्णाकाठ' : १६८).
चव्हाणांचे हे विश्लेषण वस्तुनिष्ठ होते. प्रत्येक जिल्ह्याप्रमाणेच साता-यातही पूर्वपार वृद्ध वकील किंवा डॉक्टर यांच्याकडेच काँग्रेसचे नेतृत्व चालत आलेले होते. जिल्ह्यात १९३० नंतरच्या काळात, कार्यकर्त्यांची जी पिढी प्रत्यक्ष चळवळींमधून निर्माण झाली होती, तिचे काम आणि कर्तृत्व या जिल्हा-पुढा-यांना जवळून ठाऊक नव्हते, त्यामुळे त्यांच्यामध्ये जवळीकही नव्हती. जुनाट पद्धतीनेच ती मंडळी निवडणुकांचा विचार करीत होती. मतांचे ठेकेदार असलेले जे कुणी प्रत्येक खेड्यात वा गावात जमीनदार, सावकार, व्यापारी, डॉक्टर वा वकील असतील, त्यांना गाठून मते मिळवणे हाच त्यांचा निवडणूक-प्रचाराचा अर्थ होता. ही परिस्थिती बदलायला पाहिजे, हे यशवंतरावांच्या मनाने घेतले.